आषाढी एकादशी म्हणजे शके ११ शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशी. आपले महाराष्ट्र राज्य म्हणजे संतांची कर्मभूमी आणि आषाढ महिना म्हंटला कि पंढरपूरच्या वारीला विठूमाऊलीचा नामघोष करत भागवत धर्माचा झेंडा, टाळ, मृदंग, ढोलकी, वीणा घेऊन वारकरी बंधुभगिनी निघतात.
आषाढी एकादशी म्हणजे भक्ती व समतेचा अभूतपूर्व संगम. एकादशी म्हणजे चतुर्भुज देवी शक्ती जिच्यात सर्व देवतांचे तेज एकवटलेले आहे. म्हणूनच एकनाथ महाराज म्हणतात
अनंत व्रताचिया राशी । पाय लागता एकादशी ।।
श्रीतीर्थक्षेत्र पंढरपूरला पृथ्वी तलावरील वैकुंठ म्हंटले जाते. म्हणूनच प्रत्येक वारकरीच्या मनात श्री संत नामदेवांचा अभंग दुमदुमतो
पंढरीचा वास, चंद्रभागेचे स्नान । आणिक दर्शन विठोबाचे ।।
हेचि मज घडो जनजन्मांतरी । मागणे श्रीहरी नाही दुजे ||
अश्या या वारीतून आपणास संघटित, आत्मसंयम , स्वयं शिस्त , त्यागीवृत्ती तसेच सर्वधर्म समभाव इ. गुण शिकण्यास मिळतात. ह्या गुणांची आमच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवण होण्यासाठी इ. १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेण्यात आले. संतांची ओळख व्हावी म्हणून इ १ ली व २ री च्या विद्यार्थ्यांना विविध संतांची वेशभूषा करणे हा उपक्रम घेण्यात आला. तसेच संस्कार व वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात घेता इ ३ री ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करणे हा उपक्रम घेतला. त्याप्रमाणे भक्तीरस, उपासना, संतांचे अभंग आणि त्यातून आपल्याला मिळणारा जीवन उपयोगी उपदेश याचे ज्ञान व्हावे म्हणून इ ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांना भक्तीगीत, अभंग, भजन सादर करणे हा उपक्रम घेण्यात आला.या उपक्रमाचे संपूर्ण लेखन शब्दरूपात सौ.वर्षा पाटील यांनी केले. इयत्ता १ ली व २ री चे व्हिडिओ संकलन सौ. सुजाता वारके आणि इयत्ता ३ री व ४ थी चे व्हिडिओ संकलन सौ. मानसी पवार यांनी केले. तसेच इयत्ता ५ वी ते ७ वी चे व्हिडिओ संकलन श्री शिवाजी हुलवळे यांनी केले. .