चालली चैतन्याची सळसळ... कुणास्तव ?
देवाघरच्या फुलांचा-मुलांचा
सफळ संपूर्ण शाळा प्रवेशोत्सव...
मे महिन्याची दाहकता संपते. जून महिन्याचं आगमन होतं. दूर कुठे क्षितिजावर भरून येणारा ढग नजीक ठाकलेल्या समृद्धतेचा संदेश घेऊन येतो. आणि या धुंद वातावरणाने भारलेल्या शाळकरी मुलांची मनेही मंतरलेली असतात. माऊलीच्या दुग्धापरी आलेल्या मृगाच्या तुषारांचा पहिला शिडकावा आणि त्यामुळे मनामनात जाऊन दरवळणारा मातीचा सुगंध... शाळकरी मुलांना मनाने कधीच शाळेत घेऊन गेलेला असतो. त्यावर शिक्कामोर्तब होते ते शाळेच्या नूतन प्रवेशाने ! डोंबिवली शहरातील सर्वतोमुखी असणार्या स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, विष्णुनगरच्या प्राथमिक विभागाने जगव्याप्त कोरोनाच्या भयावह परिस्थितीतही आभासी प्रणालीद्वारे मंगळवार दिनांक १५जून, २०२१ रोजी सर्व विद्यार्थ्यांना शाळेत नूतन वर्गात प्रवेश देऊन सन २०२१-२०२२ ह्या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा केला. मुले प्रत्यक्ष शाळेत येऊ शकत नाहीत हे खरं असलं तरी आज प्रत्येक विद्यार्थ्याचं घर सरस्वतीचं मंदिरच झालंय. आणि हे ज्ञानदानाचे कार्य कोरोनाचे समूळ उच्चाटन होऊन जोवर सर्वच क्षेत्रात सुगीचे दिवस येत नाहीत तोवर असेच अव्याहतपणे चालू राहाणार हा आशावाद उराशी जपत सर्वांनाच सकारात्मक संदेश दिला.
शाळेच्या मुख्याध्यापिका आणि आम्हां सर्वांच्या मार्गदर्शिका श्रीमती सुनंदा बेडसे बाई यांनी ह्या आभासी प्रणालीद्वारे घेण्यात येणार्या ह्या शाळा नूतन प्रवेशोत्सवाची सर्वंकष आखणी केली. सातत्याने नाविण्यपूर्ण उपक्रम राबवणार्या सर्वच शिक्षकांनी हा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम नेहमीच्याच जबाबदारीने व उत्साहाने पार पाडला.
कोरोनामुळे मनावर आलेली मरगळ, मानवी अस्तित्वाच्या बाबतीत निर्माण झालेले प्रश्नचिन्ह, दिवसरात्र छळणारी आर्थिक चणचण आणि मनात गोठलेले उद्याच्या शाश्वततेचे भय ह्या परिस्थितीत संपन्न झालेल्या ह्या कार्यक्रमामुळे विद्यार्थी, पालक, समाज व शिक्षक ह्या सर्वांच्याच अंतरात प्रतिकुल काळातही आपण स्वप्रयत्नाने अनुकुलता निर्माण करू शकतो ह्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.
ह्या कार्यक्रमाची आखणी करताना काही उद्दिष्ट्ये डोळ्यांसमोर ठेवलेली होती. त्यात प्रामुख्याने विद्यार्थीरूपी कोवळ्या कळ्यांच्या मनावर भयावह कोरोना परिस्थितीचे मळभ दूर करणे, त्यांच्यामध्ये शिक्षणाची जागरुकता आणि ओढ निर्माण करणे, त्यांचा गुणवत्ता विकास घडवून आणणे आणि शिक्षणाचा हा प्रवाह समाजातील सर्वच घटकांपर्यंत पोहोचवून कोणालाही शिक्षणासारख्या मूलभूत मानवी हक्कापासून वंचित न ठेवणे ह्यांचा समावेश होता.
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना व्हाॅट्सअॅपच्या प्रभावी माध्यमाद्वारे खालील व्हिडीओज् पाठवून त्यांना शालेय नूतन प्रवेशोत्सवाच्या चैतन्यमय शुभेच्छा दिल्या.
इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा नूतन प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे सह-कार्यवाह श्रीयुत प्रमोद उंटवाले सर उपस्थित होते. कोरोना काळात विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास टिकून राहण्यासाठी मान. श्री . उंटवाले सर यांनी बोधपर गोष्ट सांगितली. तर श्रीयुत वाळुंजकर सरांनी सायबर सिक्यूरीटी ह्या विषयावर विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.
सर्वच वर्गांमध्ये विद्यार्थ्यानी राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा, स्तोत्र, बोधकथा, कविता,पाढे यांचे उत्तम रितीने सादरीकरण करून पुढील काळात येणार्या कोणत्याही संकटांना, खडतर आव्हानांना सामोरे जाऊन यशस्वी होण्याच्या आत्मविश्वासाचेच प्रत्यंतर घडवून आणले.
ह्या आभासी प्रणालीचा सर्वात मोठ्ठा फायदा कोणता ? तर प्रत्यक्ष वास्तवात काही गोष्टी नसतानाही कल्पनेने त्या आहेत अशी मनाची भावावस्था जगण्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते आहे ज्यायोगे भविष्यातील जीवनविषयक अनंत समस्यांचे निराकरण करण्यास उपयुक्त होणार आहे.
कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरम् ने झाली.
या लाडक्या मुलांनो..
तुम्ही मला आधार
नव हिंदवी युगाचे
तुम्हींच शिल्पकार...
स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, विष्णुनगर प्राथमिक शाळेने आपल्या लाडक्या फुलां-मुलांशी आपले हितगूज सांगितले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !!