“ एक दिवस आली ती सुंदर पहाट
सगळीकडे शुकशुकाट,विजांचा कडकडाट ,ढगांचा गडगडाट,
भवानीमातेच्या मंदिरात शिवनेरी गडात
जन्मली एक वात जी करणार होती मुघलांचा नायनाट,
मराठ्यांचा सरदार ,हिंदवी स्वराज्याचा आधार ,
निश्चयाचा महामेरू ,बहुत जनांसी आधारु ,अखंडस्थितीचा निर्धारु
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन."
“राष्ट्रीय शिक्षण संस्था ” संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर प्राथमिक शाळेत मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2020 रोजी श्री शिवछत्रपती महाराज यांची 390 वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
महाराजांच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमांचे प्रतीक असलेले महाराष्ट्रातील प्रेरणास्थळ म्हणजे विविध किल्ले!
इयत्ता पाचवी अ ब क च्या विद्यार्थ्यांनी सौ सावकारे, श्री संतोषकुमार पाटील , सौ रेखा महाजन या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तोरणा ,प्रतापगड ,रायगड, सिंहगड, राजगड, पुरंदर या किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या. या प्रतिकृती उभारण्यासाठी विद्यार्थ्यांनी दगड ,विटा ,माती इत्यादी साहित्यांचा पुरेपूर वापर केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील संघभावना ,एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती वृद्धिंगत झाली. तसेच मातीत खेळायला मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरून ओसंडून वाहत होता.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा बेडसेबाई सर्व शिक्षक वृंद आणि इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आणि पालक वर्गांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि त्यानंतर मैदानावरील किल्ल्यांना भेट दिली. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी बनवलेल्या किल्ल्यांची भौगोलिक वैशिष्ट्ये ही सांगितली.
भूमी मयुरेश लिमये या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीने सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती सांगून उपस्थितांची मने जिंकली.
आजच्या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते डॉक्टर हेडगेवार सभागृहातील महाराजांच्या प्रतिमेमागील पुठ्ठ्याची आकर्षक बनवलेली किल्ल्याची प्रतिकृती.
शिशूवर्ग व बालवर्गातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज ,जिजामाता ,येसूबाई यांच्या वेशभूषेत येऊन भेट दिली आणि शाळेचा परिसर “जय भवानी, जय शिवाजी” “हर हर महादेव ” या जयघोषाने दुमदुमून गेला.
विद्यार्थ्यांचा हा जोश….. महाराजांच्या प्रति असलेल्या या अभिमानाने राष्ट्रीय शिक्षण संस्थेने नियोजन करून दिलेल्या या उपक्रमाची यशस्वी सांगता झाली.
कितीक झाले आणि होतील राजे असंख्य जगती
परी न शिवबासमान होईल या अवनीवरती
राजे छत्रपती ! राजे छत्रपती !! राजे छत्रपती !!!