स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णूनगर प्राथमिक डोंबिवली पश्चिम
सुवर्णमहोत्सवी वर्ष उद्घाटन सोहळा
एकादशीला पंढरी मेळा वैष्णवांचा,
विठुनामाचा गजर, घोष ग्यानबा तुकोबाचा...
स्वामी विवेकानंद विष्णूनगर प्राथमिक नगरी रंगला,
सोहळा सुवर्ण महोत्सवी वर्ष उद्घाटन समारंभाचा...
बालगोपाळ सजले धजले, झाले सोहळ्यात दंग,
पन्नाशीची वारी मुखी निरंतरतेचा अभंग..!!!
"सुवर्ण महोत्सव" हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या, वास्तूच्या आणि अविस्मरणीय घटना स्मृतीच्या बाबतीत अलौकिकच म्हणावा लागेल.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर प्राथमिक शाळेचा सुवर्ण महोत्सवाचा उद्घाटन सोहळा रंगला विठू नामाच्या गजरात ... राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित डोंबिवली नगरीतील सर्वतोमुखी असलेली आणि सर्व दूर ख्याती पसरलेली नामांकित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर प्राथमिक शाळा आज आपल्या वयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. शिक्षणप्रेमी कै.श्री. व सौ. अंतुरकर दांपत्याने सन १९७० मध्ये दसऱ्याच्या दिवशी लावलेले "शिशु विकास मंदिर" हे इवलेसे रोप सन १९७२ मध्ये "राष्ट्रीय शिक्षण संस्थे" मध्ये विलीन झाले आणि स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगर प्राथमिक शाळेने अल्पावधीतच डोंबिवली शहराच्या पूर्व-पश्चिम भागात आपला नावलौकिक मिळवला. सन१९७२ ते २०२२ हा पन्नास वर्षांचा सुवर्ण महोत्सवी प्रवास... प्रत्येकाच्या मनाच्या कप्प्यात हळुवार जपलेला हा स्मृतिगंध उलगडला जात होता तो सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उद्घाटनपर सोहळ्यामध्ये..! उद्घाटनाचा सोहळा आयोजित केला होता शुक्रवार दिनांक ८ जुलै २०२२ रोजी आणि प्रमुख पाहुण्या होत्या पर्यावरण स्नेही, पर्यावरणवादी माननीय सौ. रूपाली शाईवाले. ह्या प्रसंगी शाळेच्यामुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा बेडसे, संस्थेचे सह-कार्यवाह श्री. प्रमोद तथा भाई उंटवाले, शाळा समितीचे अध्यक्ष श्री. नरेंद्र दांडेकर, सदस्य श्री. बापट इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच शाळेच्या सर्व माजी शिक्षिका, मुख्याध्यापिका, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. रायसिंग सर व पर्यवेक्षक श्री. हिवाळे सर, पालक वर्ग, शिक्षक- कर्मचारी वृंद, विद्यार्थी हितचिंतक, शिक्षणप्रेमी सभागृहात उपस्थित होते.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व देवी शारदा आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांचे पूजन करून उद्घाटनपर सोहळ्याचा आरंभ झाला. ईशस्तवन आणि स्वागत गीताने कार्यक्रमाला आगळीवेगळी लय प्राप्त झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. सुनंदा बेडसे यांनी आपल्या प्रास्ताविकामधून गेल्या पन्नास वर्षांचा कालपट सर्वांसमोर उभा केला व संपूर्ण वर्षभर शाळा अनेकविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती दिली.या नयनरम्य कार्यक्रमास लाभलेल्या पाहुण्या माननीय सौ. रुपाली शाईवाले! कल्याण आणि डोंबिवली येथील पर्यावरण दक्षता मंडळाच्या प्रकल्प समन्वयक म्हणून कार्यरत असलेल्या बहुआयामी व्यक्ती. पर्यावरण संरक्षण, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण पूरक पद्धतीने सण साजरे करणे, वृक्षारोपण, निसर्ग भटकंती, पक्षी संवर्धन, स्वच्छ खाडी चळवळ, खारफुटी संरक्षण या क्षेत्रात जनजागृती करणाऱ्या रूपालीताई समाजातील सर्व स्तरांशी आणि विशेषतः शालेय मुलांशी जोडल्या गेलेल्या आहेत. पाहुण्यांचा अतिशय समर्पक शब्दात परिचय करून दिला सौ. मेघा कांबळी बाईंनी.
सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औपचारिक उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन ह्या दिवसाचे स्मरण ठेवून आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रातिनिधीक स्वरूपात पाहुण्यांच्या हस्ते कुंडीमध्ये एका रोपट्याची लागवड करण्यात आली. जून- जुलैमध्ये वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी वाढदिवसा प्रित्यर्थ वृक्षारोपण केलेल्या १०५ कुंड्या शाळेला सप्रेम भेट दिल्या आणि समाजासमोर एक अतिशय आगळावेगळा असा आदर्श ठेवला या बरोबरीनेच दहा तारखेला येऊ घातलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने लहान मुलांनी संतांची वेशभूषा आणि मोठ्या मुलांनी भक्ती गीत असे कार्यक्रम याप्रसंगी आयोजित करण्यात आलेले होते. दोन्ही कार्यक्रमातील मुलांनी केलेले सादरीकरणाने खरोखरच उपस्थित समुदाय भक्तीरसामध्ये नाहून निघाला.संपूर्ण आसमंत विठ्ठल, विठ्ठल या नामघोषाने दुमदुमला होता. प्रमुख पाहुण्यां सौ.रुपाली ताईंनी केलेल्या भाषणामध्ये झाडांना पाणी हवे आहे की नको आहे हे कसे ओळखावे, ओला कचरा व सुका कचरा यातील फरक नेमका कसा? विद्यार्थी दशेत असतानाही तुम्ही पर्यावरणाची कशी काळजी घेऊ शकता इ.विविध विषयांवर विद्यार्थ्याना व उपस्थितांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे सह- कार्यवाह माननीय प्रमोद तथा भाई उंटवाले यांनी संस्थेतर्फे मनोगत व्यक्त करताना सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शाळेला शुभेच्छा दिल्या आणि वर्षभरातील आयोजित कार्यक्रमांसाठी संस्था सर्वतो परिने शाळेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील याची शाश्वती दिली .शिक्षिका श्रीमती रंजना मोरे यांनी आभार व्यक्त केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मेघा कांबळी यांनी केले.