आभासी प्रणालीच्या माध्यमातून जागतिक योग दिन संपन्न .

Source :    Date :25-Jun-2021
                            "जागतिक योग दिन " 
  yog din_1  H x  
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते |
तस्माद्योगाय युज्यस्व योग: कर्मसु कौशलम् ||
           योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे, तर अनादी अनंत तत्त्वाला स्पर्श करत अध्यात्मिक, प्रगतिशील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे. सर्वांना प्रगतीपथाकडे घेऊन जाणारा मार्ग म्हणजे योग .आपल्या जीवनाची आदर्श दिशा ठरवण्यासाठी सहाय्य करतो तो योग. शरीर आणि मनाचे उत्तम प्रतीचे शुद्धीकरण आणि आत्म-नियमन करतो तो योग. आदर्श जीवन प्रणाली म्हणजे योग. जीवन जगण्याचा संतुलित, संपन्न ,सुलभ, सुयोग्य मार्ग म्हणजे योग. मानवीय चेतनेच्या विकासासाठी योग हे विकासवादी प्रक्रियेचे रूप आहे. तन मन धन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग.
         
          योग आपल्या जीवनातील मानसिक ताण-तणाव कमी करून आपल्या शरीरातील सर्व शारीरिक नाड्यांचे शुद्धीकरण करतो तो योग .योग करण्याने सात्विक, वैचारिक पातळीचा उच्चांक गाठला जातो.जागतिक स्तरावर शांतता, सलोखा आणि एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी योग अत्यंत प्रभावी माध्यम आहे. आपल्या मनाची एकाग्रता वाढवण्याचे काम योगामुळे होते .योगामुळे आपल्या शरीराच्या सर्व स्तरांवर तंदुरुस्त ,अंतर्यामी शांतता, रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
         अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी ,साधू संत यांनी आपल्या जीवनामध्ये योग आणि योग साधना यांना जीवनाचा अविभाज्य भाग बनविल्याचे आपल्या लक्षात येते .त्याच बरोबर वेळोवेळी आपल्या साधुसंत आणि ऋषीमुनींनी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे .भारतातील योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून योगासनांचे लाभ त्यांनी ही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत.
             जागतिक योग दिन हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. आज जगभरात कोरोनाचं सावट असताना योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे .सोमवार दिनांक २१/०६/२०२१.जागतिक योग दिनाचे औचित्य साधून
'घरी योग आणि कुटुंबासह योग' या संकल्पनेवर आधारित आमच्या शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा भाईदास बेडसे यांनी कार्यक्रमाची योजना आखून कार्यक्रमाची रूपरेषा शिक्षकांसमोर मांडली. शाळेकरिता काहीतरी नवीन करण्याचा मानस असणारा शिक्षक वर्ग यांनी योगदिनाचा कार्यक्रम प्रत्यक्षात येण्याकरिता यशस्वी नियोजन केले. कोरोना चे सावट असल्याकारणाने कोरोना चे सर्व नियम पाळून आभासी पद्धतीने Google meet Youtube चे लाईव्ह प्रक्षेपण करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
       
              कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय योग शिक्षिका गायत्री शेटे  (शाळेच्या माजी विद्यार्थिनी) उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रधार श्री. दत्ताराम मोंडे यांनी उपस्थितांचे शब्द सुमनांनी स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात केली. योग शिक्षिका यांनी सूर्यनमस्काराचे, विविध आसनांचे आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर विद्यार्थी ,पालक आणि शिक्षकांकडून सूर्यनमस्कार, विविध आसने आणि प्राणायाम करवून घेतले. ताडासन, उष्ट्रासन, पश्चिमोत्तानासन, धनुरासन इत्यादी आसने सगळ्यांनी मनापासून केली. अनुलोम-विलोम, भ्रामरी ,दीर्घ श्वसन आणि ओमकाराचे उच्चारण इत्यादी प्राणायामाचे प्रकारही करवून घेण्यात आले.प्रात्यक्षिक केल्यामुळे सगळ्यांचे चेहरे प्रफुल्लीत आणि आनंदी दिसत होते.कार्यक्रमात शाळेतील जवळजवळ 60% ते  70% टक्के विद्यार्थी व  पालक उपस्थित होते.त्याचप्रमाणे शाळा समितीचे सन्माननीय ध्यक्ष डॉ.श्री.धर्माधिकारी सर देखील उपस्थित होते. सन्माननीय योगशिक्षिका यांनी प्रत्येक आसनांचे फायदे समजावून सांगितले. सूर्यनमस्कार प्राणायाम आणि आसने आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग व्हायला हवा असं त्यांनी समजावून सांगितले.कार्यक्रमाला दिशा देण्यासाठी सन्माननीय कार्यवाह डॉ.श्री.दीपक कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले .संपूर्ण कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सौ.भूमिका महाजन यांनी सांभाळली .शेवटी योग प्रार्थना होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
          स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्यायेन मार्गेण महीं महीशाः
     गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु ॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।