राष्ट्रीय शिक्षण संस्था, डोंबिवली
आणि
स्वामी विवेकानंद कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय, डोंबिवली
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
सोमवार, दि. १८ जानेवारी २०२१ व मंगळवार, दि. १९ जानेवारी २०२१
अहवाल
राष्ट्रीय शिक्षण संस्था, डोंबिवली आणि स्वामी विवेकानंद कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. १८ जानेवारी २०२१ व मंगळवार, दि. १९ जानेवारी २०२१ रोजी दोन दिवसीय आॅनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही Zoom व Live Streaming on You Tube वर आयोजित केली होती. विषय होता : ब्लूम वर्गीकरण पद्धतीवर आधारित अधिक चांगल्या पद्धतीने बहुपर्यायी प्रश्न लिहिणे (Writing Better MCQ's based on Bloom's Taxonomy). मा. डाॅ. चित्रा सोहनी या प्रमुख वक्त्या म्हणून या प्रसंगी उपस्थित होत्या. संस्थेच्या विविध शाळांतील प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षक, रात्र महाविद्यालयातील प्राध्यापक, इतर शाळा व महाविद्यालयातील शिक्षक- प्राध्यापकवर्ग, समाजातील शिक्षणप्रेमी, अभ्यासक, संशोधक इत्यादी 200 व्यक्तींनी यात सहभाग घेतला.
सोमवार, दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता कार्यशाळेला प्रारंभ झाला. सुरवात कु. नक्षत्रा जावडेकर हिने गायलेल्या ‘जय शारदे वागीश्वरी’ या सरस्वती वंदनाने झाली. नंतर रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई यांनी स्वागतपर भाषण व मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी या दोन दिवसीय कार्यशाळेचे महत्त्व स्पष्ट केले. त्याचा उपयोग वक्त्यांच्या नंतर होणाऱ्या व्याख्यानातील मुद्यांच्या आकलनासाठी फार चांगल्या प्रकारे झाला.
त्यानंतर संस्थेचे कार्यवाह मा. डाॅ. दीपक कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. त्यावेळी त्यांनी ब्लूम कोण? त्याची वर्गीकरण पद्धती काय आहे? याबाबत थोडक्यात माहिती दिली. त्यामुळे कार्यशाळेसाठी पायाभूत बैठक तयार झाली. संस्थेचे अध्यक्ष मा. डाॅ. सुभाष वाघमारे यांनी यावेळी बीजभाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी कार्यशाळेची उपयुक्तता सर्वांसमोर मांडली व या कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल कौतुकोद्गार काढून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
डाॅ. सुमंत औताडे यांनी प्रमुख वक्त्यांची समर्पक शब्दांत ओळख करून दिली. तर अगदी मोजक्या शब्दांत डाॅ. सुरेश चंद्रात्रे यांनी आभार प्रदर्शन केले.
आपल्या व्याख्यानात मा. डाॅ. चित्रा सोहनी यांनी ब्लूमच्या शैक्षणिक वर्गीकरण पद्धतीवर प्रकाश टाकला. इ. स. १९५६ साली ब्लूम या शिक्षण तज्ज्ञाने मांडलेले विचार कसकसे विकास पावले ते सांगितले. शैक्षणिक अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन कसे शिक्षण असायला हवे हे पिरामिडच्या आकृतीच्या साहाय्याने समजावले. व्याख्यानाच्या दरम्यान त्या सरवासाठी लिंक्स पुरवत होत्या. त्यामुळे व्याख्यान समजण्यास मदत झाली व सत्र खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार, दिनांक १९ जानेवारी २०२१ रोजी बरोबर १०.३० वा. सत्राला सुरवात णली. कालच्या व्याख्यानाचा उत्तरार्ध मा. डाॅ. चित्रा सोहनी यांनी पूर्ण केला. यावेळी त्यांनी बहुपर्यायी प्रश्न कसे तयार करावेत, त्यासाठी कोणते तर्क वापरावेत, वाक्यरचना अर्थपूर्ण कशी करावी, शब्दांची मर्यादा कशी आखून घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच शब्दरचना क्लिष्ट नसावी, प्रश्न लांबलचक नसावा, ‘यापैकी नाही’ किंवा ‘वरीलपैकी सर्व’ अशी उत्तरे असलेले प्रश्न शक्यतो टाळावेत, प्रश्न तयार करताना आपण त्यातून विद्यार्थ्यांचा कोणता गुण तपासणार आहोत हे स्वतःशी नक्की केले पाहिजे अशा अनेक मौलिक सूचना केल्या. मधूनमधून प्रात्यक्षिक करण्यासाठी लिंक्ससुद्धा दिल्या गेल्या. Power Point Presentation चा अतिशय सुंदर वापर करून त्यांनी हे व्याख्यान दिले. ते आदल्या दिवसाप्रमाणे अधिक रंजकदार व माहितीपूर्ण झाले.
या कार्यशाळेला शिक्षक व प्राधयापकवर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन दिवसाच्या या कार्यशाळेचे संपूर्ण सूत्रसंचालन प्रा. अमित जोशी यांनी केले. धन्यवाद
....डाॅ. श्रीनिवास आठल्ये
ग्रंथपाल
स्वामी विवेकानंद कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय, डोंबिवली
शनिवार, दि. २३ जानेवारी २०२१