|| गुरु विणा नाही नर नारायण ||

05 Jul 2020 09:45:21
रविवार, दि.५/ ७/ २०२०
 
आज आषाढ पौर्णिमा! म्हणजेच गुरुपौर्णिमा! महर्षी व्यासांनी लोकांना वेदाचे ज्ञान दिले. ते आपले आद्य गुरू आहेत. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते. आपण ज्याच्याकडून ज्ञान प्राप्त करतो त्या गुरूंप्रती आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. आपण कोणाचेतरी शिष्य आहोत या भावनेत एक कृतज्ञता वाटते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरू शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरूंची प्रार्थना करावयाची तो हा दिवस होय!

Guru_1  H x W:  
 
समर्थ रामदास स्वामी म्हणतात, 'जे जे जातीचा जो व्यापारू, ते ते त्याचे तितके गुरू| याचा पाहता विचारू, उदंड आहे||' या उक्तीला अनुसरून खरं सांगायचं तर आयुष्यात अनुभवासारखा गुरू नाही असे मला वाटते. असे म्हणतात की दुस-याने दिलेली धनाची पुंजी व शिकवलेली अक्कल कधीही पुरेशी नसते. म्हणूनच धडपडत, ठेचकाळत घेतलेल्या अनुभवाच्या जोरावर मिळवलेल्या शहाणपणाचे महत्त्व अतिशय जास्त असते. सर्वसाधारणतः कोणताही गुरू किंवा शिक्षक म्हणा आधी सिद्धांत शिकवतो व नंतर प्रात्यक्षिक घेतो. पण याच्या बरोबर उलट अनुभवासारखा गुरू आधी प्रात्यक्षिक करवतो व नंतर सिद्धांत शिकवतो व त्यामुळेच कायमस्वरूपी तो मनुष्याच्या मनावर व मेंदूवर कोरला जातो. तुमच्या स्वतःच्या आयुष्याचा अनुभव हाच तुमचा गुरू! कारण प्रचितीचे झगमगीत तेजोवलय त्याच्या पाठीशी उभे असते. प्रत्यक्ष अनुभव हाच मोठा शिक्षक असतो. तो कोणापेक्षाही अधिक चांगले शिकवतो.
 
एखादा प्रयोग करून अथवा परीक्षा देऊन किंवा उपभोगून जेव्हा ज्ञान प्राप्त होते तेव्हा त्या ज्ञानाला अनुभव असे म्हणतात. अशी ढोबळमानाने अनुभवाची व्याख्या करता येईल. प्रत्यक्ष ज्ञान किंवा बोध म्हणजे अनुभव; जे आठवण किंवा स्मृतीपेक्षा निराळे आहे. संस्कारातून मिळालेल्या ज्ञानाला स्मृती असे म्हणतात तर प्रत्यक्ष प्रयोगातून मिळालेल्या ज्ञानाला अनुभव म्हणतात. यथार्थ अनुभव व अयथार्थ अनुभव असे अनुभवाचे दोन प्रकार आहेत. अनुभव हे माणसाने आयुष्यात मिळवलेले असे एक फळ आहे की जे त्याला आयुष्यभर कामी येते. आपल्या अनुभवातून मिळवलेले ज्ञान आपण कितीही इतरांना वाटले तरी कधी क्षय पावत नाही. उलट ते सदैव वर्धिष्णू असते.
 
प्रा. शिवाजीराव भोसले असे म्हणतात, चिमणीचे पिल्लू चाळीस दिवसांत आकाशात भरा-या घेते आणि माणसे चाळीस वर्षांची झाली तरी उत्कर्ष करू शकत नाहीत. कारण चिमणीच्या पिल्लांना पंख आतून फुटलेले असतात आणि माणसांना पदव्या बाहेरून लावलेल्या असतात. म्हणून आतून ज्ञानाचे पंख निर्माण करणारे आणि पंखात बळ देणारे अनुभवजन्य शिक्षण विद्यार्थ्यांना दिले गेले पाहिजे. घरात बसून पाऊस बघितला तर पावसात भिजण्याच्या सुखाची प्रचिती येते काय? पदार्थांची छायाचित्रे बघून जिभेची तृष्णा आणि चोचले पुरवता येतील का? या सा-या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी येतील. कारण इथे कुठेही रसरशीत जिवंत अनुभव नाही. भारतीय संस्कृतीत अनुभवजन्य ज्ञानाला आत्यंतिक महत्त्व दिले गेले आहे. कपोलकल्पित कथा, ऐकीव दंतकथा, अनुभवरहित बोल आणि अनुभवशून्य कथनाचा जगातल्या बहुतेक सर्व विचारवंतांनी आणि संतांनी धिक्कार केला आहे. संतांच्या मुखातून बाहेर पडलेल्या सहज उद्गारांना अभंगांचे महत्त्व प्राप्त झाले. कारण त्या तत्त्वज्ञानाला अनुभूतीचा स्पर्श होता. तुकाराम महाराज सांगतात, 'नका दंतकथा, येथे सांगो कोणी| कोरडे ते मानी, बोल कोण|| अनुभव येथे, व्हावा शिष्टाचार| न चलती चार, आम्हापुढे|| अनुभव हाच शिष्टाचाराचा दंडक व्हावा, असा आग्रह ते धरतात. जीवनातील सर्व अनुभवांसाठी स्वागतशील असणा-या माणसाचेच जीवन अधिक समृद्ध आणि सुखी होत असते. भूतकाळातील अनुभवांची शिदोरी पाठीशी असेल तर वर्तमानात वागताना आणि भविष्याचे वेध घेताना ही शिदोरी उपयुक्त ठरते.
 
अनुभवसंपन्न माणसाची यश नेहमी पाठराखण करत असते. मनुष्याला त्याच्या आंतरिक जीवनातले अलौकिक अनुभव त्याला परिपक्व आणि परिपूर्ण बनवत असतात. जीवनाचा खरा अर्थ त्याला समजावून सांगत असतात. हे अनुभव ज्याचे त्याने घ्यायचे असतात. हे सारे करीत असताना मिळालेल्या आनंदाची, समाधानाची अनुभूती वेगळी असते. तिची गुणवत्ता, पातळी व स्तरही वेगळा असतो. जीवनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी अनुभवाच्या इयत्ताही चढत्या क्रमाने पार करणे गरजेचे असते. हे ज्यांना जमते त्यांना शांततेच्या, आनंदाच्या आणि समाधानाच्या शोधार्थ वणवण करीत भटकावे लागत नाही.
 
म्हणूनच स्व- अनुभवासारखा दुसरा गुरू होणे नाही आणि म्हणूनच समर्थ रामदास आपल्या परखड शैलीत बजावतात, 'प्रत्ययाचे ज्ञान| तेचि ते प्रमाण| येरे अप्रमाण| सर्वकाही|| म्हणूनच आपले जीवन अनुभवसंपन्न करा एव्हढेच या गुरुपौर्णिमेच्या पुण्यपर्वावर अधोरेखित करावेसे वाटते.
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई
Powered By Sangraha 9.0