चमत्कारिक चमत्कार |

04 Jul 2020 08:54:45
शनिवार, दि. ४/ ७/ २०२०
 
|कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेनंतर विठुरायाला काहीही चमत्कार करून संपूर्ण विश्वावरचे संकट नाहीसे करण्यासाठी साकडे घातले. वेळोवेळी पांडुरंग आपल्या भक्ताच्या मदतीसाठी धावून येतो. अशा आशयाच्या कथा आपल्या पुराणात भरपूर प्रचलित आहेत. परंतु असा चमत्कार खरोखरीच होतो का हो? की केवळ या सुरम्य कल्पनाच? की भोळी भाबडी माणसे घटनेमागची शास्त्रीय कारणे माहीत नसल्याने त्याला चमत्कार असे संबोधतात? की याला श्रद्धेय लोकांचा अदृश्य शक्तीवरचा अगाध, प्रगाढ विश्वास म्हणायचा? अशा व यासारख्या चमत्काराशी निगडीत अनेक प्रश्नांची उकल करण्याच्या दृष्टीने माझे अभ्यासपूर्ण विचार प्रस्तुत लेखात मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
 
miracles_1  H x
 
ढोबळमानाने चमत्काराची व्याख्या करावयाची झाल्यास आपल्याला असे म्हणता येईल की चमत्कार म्हणजे अशा सर्व घटना किंवा प्रसंग ज्या निरीक्षकाच्या बुद्धीला, जाणीवेला, ज्ञात माहिती स्त्रोत वापरून ज्ञात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची परिमाणे लावून बघितली असता अनाकलनीय असतात. प्रसिद्ध ग्रंथ बायबल कोशात चमत्कार म्हणजे लौकिक जगातील परिणाम जे मनुष्याच्या किंवा निसर्गाच्या ज्ञात शक्तीपेक्षा वरचढ आहेत. त्यामुळे ते अलौकिक स्त्रोताकडून होतात असे म्हटले आहे. बुद्धिप्रामाण्यवाद, नियतीवाद, कर्मफल आणि विधिलिखित या सर्वांच्या मर्यादा सोडून चमत्कार भासत असतात. थोडक्यात, जी घटना घडली आहे पण सदसद्विवेकबुद्धी वा सारासार विचार केला की आपल्याला पटत नाही ती गोष्ट किंवा घटना म्हणजे चमत्कार! चमत्काराचे दोन प्रकार आहेत १) नैसर्गिक चमत्कार २) मानवनिर्मित चमत्कार! नैसर्गिक चमत्काराचा विचार करता एका पेशीपासून दुसरी पेशी निर्माण होते किंवा जिवंत सजीवाच्या शरीरात जीव अथवा चेतना असते व मृत व्यक्तीत ती नसते याचे उदाहरण देता येईल. जादूगाराने केलेली हातचलाखी, भानामतीचे प्रकार वगैरे मानवनिर्मित चमत्कार म्हणावे लागतील.
 
जर्मन लेखक मॅनफ्रेट बार्टल म्हणतात, "चमत्कार हा असा शब्द आहे जो लोकांना लगेच दोन गटात विभागतो. एक गट चमत्कारावर विश्वास ठेवणा-यांचा तर दुसरा विश्वास न ठेवणा-यांचा." विविध धर्मांच्या इतिहासावरून निर्विवादपणे दिसून येते की चमत्कार आणि चमत्काराच्या कथा मानवाच्या धार्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. मानवाच्या शक्ती फारच मर्यादित असल्याने अदृश्य शक्तींचे अस्तित्व आणि कर्तृत्व मान्य केले की कुठलाही चमत्कार सहजशक्य वाटतो. खरे पाहता चमत्काराचे दावे हे अन्य कोणत्याही शास्त्रीय दाव्याइतकेच तपासाला, चाचणीला, चिकित्सेला उपलब्ध असणे गरजेचे आहे. पण दुर्दैवाने असे होताना दिसत नाही.
 
ज्या व्यक्तींचा योगाभ्यासाचा दांडगा अभ्यास आहे व ज्यांचे शरीर यौगिक पातळीवर विकसित झाले असेल तर कधी कधी त्या व्यक्तीकडून तथाकथित चमत्कार शक्य असतात. परंतु त्यापाठी योगाभ्यासाची, साधनेची शास्त्रीय बैठक असते. माझ्या मते पृथ्वीवरील हे जग आणि संपूर्ण विश्वच केवळ भौतिक आहे. यात घडणा-या सर्व घटना भौतिक आहेत व त्या भौतिक नियमाबरहुकूमच घडतात. त्यात काही भौतिक, रासायनिक प्रक्रिया असते जी आपल्याला ज्ञात नसते आणि म्हणूनच अज्ञानापोटी सामान्य माणूस त्याला चमत्कार असे संबोधतो. शेवटी चमत्कार ही एक सापेक्ष गोष्ट असते. ज्याला त्यामागील कारणे माहीत असतात त्याला 'चमत्कार' हा चमत्कार वाटतच नाही व अन्य माणसे मात्र चमत्कारापुढे नमस्कार करायला लगेच सिद्ध होतात, एव्हढेच नमूद करावेसे वाटते.
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई
Powered By Sangraha 9.0