या सुरांनो या

03 Jul 2020 08:49:21
शुक्रवार, दि. ३ / ७ / २०२०
 
सध्याच्या दिवसांत व्हाॅटस् अॅपवर एका व्हिडिओने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. बालवयातील दोन बंधूंचा गाणे गायलेला व्हिडिओ प्रचंड वाहवा मिळवत आहे. वारंवार तो व्हिडिओ इकडून तिकडून माझ्यापर्यंत पोहचत होता व मी तो खूपवेळा बघतही होते. परत परत तेच तेच बघून माझ्या मनात प्रश्न आला, का बरे आपण हे वारंवार बघतो? गाणे नेमके कसे बरे ऐकावे? गाणे कसे सुरेल गावे हे शिकवणारे शंभर गुरू भेटतील, पण गाणे कसे ऐकावे? हे शिकवणारे विरळाच! म्हणूनच गाणे का व कसे ऐकावे? या विषयावर संशोधन करून जे मला कळले ते मी प्रस्तुत लेखात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
 
 
Music_1  H x W: 
 
गाणे का गावे? हा प्रश्न डोक्यात आल्यावर सहजच उत्तर येते, गाणे आनंदासाठी 'गावे' आणि आनंद म्हटला की प्रत्येकाचा आनंद वेगवेगळ्या गोष्टीत असतो. म्हणून आपलं गाणं आपणच गावे आणि प्रत्येक प्रकृतीप्रमाणे त्याची आवड, निवड, स्वभाव, बुद्धिमत्ता, समजदारी आणि अनुभवही वेगळा! 'गाणे ही एक अनुभूती आहे.' ती कशी अनुभवायची हे एका वाक्यात सांगणे कठीण आहे. प्रत्येकाचे अनुभव, त्याच्यावर झालेले संस्कार, विचार, त्यातून तयार झालेले त्याचे भावविश्व आणि त्या भावविश्वात रममाण झालेली माणसे कोणत्या गाण्यातून कधी केव्हढा आनंद मिळवतील हे एक गूढच आहे. त्यामुळे आनंद कुणाचा कुठल्या प्रकारच्या संगीतात असेल हे वर्तवणे कठीणच. जुने सिनेसंगीत, नाट्यसंगीत, भावगीत, अभिजात संगीत, कर्नाटक संगीत, पाश्चिमात्य संगीत, फ्रेंच ऑपेरा यापोकी कोणाला काहीही आवडू शकते. अगदी जगभरातल्या संगीतात बारा प्रमुख स्वर आहेत. पण सर्वांचे संगीत वेगवेगळे भासते. कारण प्रत्येकाचा आवाज, सूर, गमक वेगवेगळा असतो.
 
भारतीय संगीतापुरता विचार करावयाचा झाल्यास गाणे ऐकण्याचे उद्दिष्ट फक्त आनंद नसून ते आत्मसात करण्याचा असेल, तर त्यांनी त्यांचा आनंद जरा सखोल घ्यावयाचा आहे. त्यांनी आपला आनंद कुठल्या प्रकारच्या संगीतात आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक बाजाचे आणि शक्य तितक्या आवाजाचे गाणे ऐकणे आवश्यक आहे. कारण कानाने जे ऐकाल ते गळ्याला किंवा आपल्या अभिव्यक्तीतून पुनरावृत्त कराल. म्हणून ऐकणे हा संस्कार खूपच महत्त्वाचा आहे. बाळ लहान असताना आपल्या आईच्या अंगाईच्या सुरात व थोपटण्याच्या तालात निजते. आईची अंगाई ही सूर आणि बेसूर या पलीकडची भावना किंवा अनुभूती असते. पण त्या आवाजाचा संस्कार आपल्या मेंदूवर आपले काम कायमस्वरूपी कोरून जातो आणि अगदी स्वतःच्या वृद्धापकाळातसुद्धा हा संस्कार तितकाच ताजातवाना असतो. गाणे ऐकता येणे ही ईश्वरी देणगी आहे आणि ज्याला ही देणगी लाभली आहे तो गाऊपण नीट शकतो आणि ज्याची अभ्यास व मेहनत करायची तयारी आहे तो पट्टीचा गायकही होऊ शकतो.
 
मनुष्य हा भावनाप्रधान असल्याने आपल्या त्या वेळच्या भावनांशी मिळतेजुळते गाणे ऐकले की चटकन मनापर्यंत पोचते व लगेचच मुखातून 'वाह' अशी दाद येते. असे गाणे भावून जाते. तो सूर, शब्द, ताल, राग या सगळ्याचा एकत्रित परिपाक असतो. गाणे आनंदासाठी ऐकणे व विद्यार्थी म्हणून ऐकणे यात परत तफावत असते. उद्दिष्टानुसार गाणे ऐकण्याची पद्धत बदलते. आनंदासाठी गाणे ऐकताना केवळ गाणे हृदयापर्यंत भिडणे महत्त्वाचे असते. तर विद्यार्थी म्हणून ऐकताना त्यातले सूर, जागा, ताना, मात्रा या सर्वांचा बारीकपणे विचार करावा लागतो. एरवी कधीतरी काव्याच्या प्रेमात पडून तर कधीतरी सुरांच्या मोहात अडकून, कधीतरी कुणाला नाचून त्या तालासुरात भान हरपावयाचे असते तर कधीतरी संथ मंद सुरांवर झुलायचे असते.
 
थोडक्यात काय, गाण्यातला आनंद प्रत्येकाने आपापला शोधावा व अनुभवावा! त्याला स्थळ, काळ, प्रकार, ऋतू, कशाचीही मर्यादा नाही. फक्त एकच लक्षात ठेवावे, ते आनंदाचे गाणे असावे; रडगाणे मात्र नसावे! सुरांमध्ये सूर्याचा तेजस्वी प्रकाश असावा; पण शीतलता मात्र चंद्राचीच असावी. तरच मनावर हळूवार फुंकर घालण्याचे व त्यातून निखळ आनंद निर्मितीचे काम गाणे करू शकेल हे मात्र निःसंशय!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई
Powered By Sangraha 9.0