उपवासाची सुखांतिका की शोकांतिका?

02 Jul 2020 09:59:21
गुरुवार, दि. २/ ७ /२०२०
 
कालच आषाढी एकादशी झाली. आपल्यापैकी ब-याच जणांनी 'एकादशी आणि दुप्पट खाशी' या न्यायाला अनुसरून साबुदाणा खिचडी, बटाट्याची भाजी, दाण्याची आमटी, वरी तांदळाचा भात, भाजणीचे थालीपीठ, साबुदाणा वडा, काकडीची कोशिंबीर, श्रीखंड, खसखसची खीर, अळीवाचे वा डिंकाचे लाडू, खजुराच्या वड्या वगैरे वगैरे पदार्थांवर यथेच्छ ताव मारून 'उपवास' केला असावा. माझ्या अंदाजानुसार आपल्या महाराष्ट्रात जेव्हढ्या उपवासाच्या पदार्थांची रेलचेल आहे तेव्हढी अन्य कुठल्याही प्रदेशात नसावी. धन्य त्या घरोघरीच्या अन्नपूर्णा! सर्व प्राणीमात्रांना जगण्यासाठी अन्न खावे तर लागतेच, पण खाण्यासाठीच जगणारा मात्र माणूस हाच एकमेव प्राणी या भूतलावर असावा. उपवासाच्या प्रथेमध्येसुद्धा वैविध्य आहे. आषाढी व कार्तिकी एकादशी, महाशिवरात्र यासारखे उपवास वार्षिक असतात. तर प्रदोष, संकष्टी चतुर्थी यासारखे उपवास मासिक असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक आठवड्यातील सोमवार, गुरुवार किंवा शनिवार यासारखे उपवास साप्ताहिक असतात. पांढरे बुधवार, अळणी मंगळवार किंवा सोळा सोमवार यासारखे एखाद्याने केलेले उपवास हे विशेषच म्हणायला हवेत. आणि काही उपवास हे तर खास बायकांसाठीच असतात बरं का! उदा. वटपौर्णिमा, हरतालिका व हल्ली ज्याचा जास्त उदो उदो होतो ते मार्गशीर्षातील गुरुवार! आपल्या ऊठसूट चरण्याच्या प्रकृतीला थोडा तरी आळा बसावा या उद्देशाने उपवासाची संकल्पना मांडली गेली असली तरी उपवासाचे पदार्थ पाहता या संकल्पनेला पूर्णपणे हरताळ फासल्याची जाणीव होते. वास्तविक पाहता ठरावीक काळानंतर हलका व कमी आहार घेऊन पचनसंस्थेस विश्राम देणे अपेक्षित असताना 'कळतंय पण वळत नाही' असा प्रकार बहुतेकांच्या बाबतीत दिसून येतो. उपवासाला खायला काय चालते आणि काय ' चालत नाही' हा तर संशोधनाचाच विषय असून एखाद्या प्रदेशात जे चालते ते दुस-या प्रदेशात बिलकूल चालत नाही. यावरून उपवासपंथीयांमध्येसुद्धा एकवाक्यता नाही, असे दिसून येते. आपल्या समाजामध्ये फार कमी खरोखर आरोग्यदायी उपवास करणारेही लोक आहेत. जरी ते अल्पसंख्य असले तरी त्यांच्या उपवासाच्या पद्धती खरोखरच अनुकरणीय आहेत. साधारणतः अशा व्यक्ती १२ तास अन्न पूर्ण वर्ज्य करतात व फक्त द्रव पदार्थ पितात. पाणीदार व कमी गोड फळे खातात. अशांपैकी आहाराने उपवास केल्यास त्याचा आरोग्यास उत्तम फायदा होतो, हे निःसंशय!
 
आयुर्वेद असे सांगते की लंघन (उपवास) हा शरीराला निरोगी करतो. उपवासामुळे शरीराच्या चयापचय संस्थेवर सतत पडणारा ताण कमी होतो व शरीराची अंतर्गत स्वच्छता होते. आठवड्यातून एकदा उपवास हा शरीरास शुद्धिकारक व आपल्यास हितकारक आहे. उपवासादरम्यान भरपूर थंड पाणी पिणे, दिवसा झोप, उच्च शारीरिक कष्टाची कामे, कुसंगती, वाईट विचार, पोटभर खाणे, मैथुन इत्यादी टाळावे असे आयुर्वेद सांगते. उपवास ही संयमाची सुरवात आहे. उपवासामुळे व्यक्तीचा मनोनिग्रह वाढतो व मनाच्या विविध षड्रिपूंवर नियंत्रण ठेवणे त्यामुळे सहज शक्य होते. त्यामुळे कमी व हलका आहार घेऊन उपवास केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. त्याचप्रमाणे आठवड्यातून प्रत्येक व्यक्तीने किमान एक दिवस जरी उपवास केला तरी अन्नधान्याची खूपच बचत होणे शक्य आहे.
 
उपवास विचार फार प्राचीन काळापासून केला गेला आहे. उपवास ही धार्मिक आचरणातील शिस्त आहे. पापकर्मापासून निवृत्त झालेल्या माणसाचा सद्गुणांसह वास म्हणजे उपवास! उपवास हा पापक्षालनाचा मार्ग म्हणून त्याचे धर्मात महत्त्व अधोरेखित केले आहे. उपनिषद काळात जाणत्या लोकांना उपवासाचे महत्त्व ज्ञात होते. बृहत् अरण्यात परमेश्वराच्या जवळ जाण्याचे जे अनेक मार्ग सांगितले आहेत त्यात उपवासाचाही उल्लेख आहे. वेदवचनाचा आधार घेऊन यज्ञ, दान, तप व उपवास हे परमेश्वर प्राप्तीचे मार्ग आहेत असे शास्त्र सांगते. व्युत्पत्ती शास्त्रदृष्ट्या उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसणे असा आहे. एखाद्या शुभ दिवशी देवाच्या, गुरुच्या, सत्पुरुषाच्या सान्निध्यात बसणे याचा अर्थ उपवास असा आहे. त्याचबरोबरीने मित आहार व हलका आहार घेऊन शारीरिक व मानसिक शुद्धी करायची!
 

daan_1  H x W:  
 
वाचकहो, पण एव्हढ्या सगळ्या उपवासाच्या पुराणाचं कौतुक कोणाला हो? रोज तुपाशी खाणा-याला एखाद्या दिवसाच्या उपवासाचे कौतुक! पण दुर्दैवाने आपल्या समाजातील बहुतेक अर्धपोटी किंवा उपाशी राहणा-यांचं काय हो? त्यांना कसले हो उपवासाचे कौतुक सोहळे? आणि समाजातील अशा अर्धपोटी किंवा उपाशी असणा-या आपल्या समाजबांधवांना किमान पोटभर जेवण मिळवून देण्याची जबाबदारी आपली नाही का? म्हणूनच आपण जर सर्वांनी किमान पंधरा दिवसांतून एके दिवशी एकभुक्त राहण्याचा निर्धार केला तर या उपाशी समाजबांधवांचे पालनपोषण होणे सहज शक्य आहे. धार्मिक संस्कार म्हणून नाही तर सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आजपासून चालू होणा-या चातुर्मासात पंधरा दिवसांतून एकदा खरोखरीचा उपवास करू या, एव्हढेच आवाहन या लेखाच्या माध्यमातून करावेसे वाटते.
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई
Powered By Sangraha 9.0