स्वतःला बदलताना...

15 Jul 2020 09:53:06
बुधवार, दि. १५/ ७/ २०२०
 
साधारण पंधरा वर्षांपूर्वी मी स्टीफन कोव्ही यांनी लिहिलेल्या 'सेव्हन हॅबिटस् ऑफ हायली इफेक्टीव्ह पिपल' या पुस्तकाचा आधार घेऊन त्या पुस्तकाच्या संपूर्ण सादरीकरणाचा पूर्ण एक दिवसाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी करीत असे. कालांतराने त्यात नंतर आठव्या सवयीची पण भर पडली. माणसे या भौतिक जगात रूढार्थाने मोठी होतात. तेव्हा त्यांनी मोठे होताना स्वतःमध्ये कोणता असा बदल केलेला असतो? सामान्य माणूस ज्याप्रमाणे जीवन व्यतीत करत असतो त्याचप्रमाणे तर ही मोठी माणसे पण जीवन व्यतीत करत असतात. जीवनातल्या रोजच्या संघर्षाला भिडत असतात. पण मग काय असे नेमके असते की ज्यामुळे ती माणसे मोठी होतात? त्यांचे व्यक्तिमत्व विशेष परिणामकारक होते. त्यांच्या वर्तनामागे अशी कोणती बरी प्रेरणा असते?
 
Change_1  H x W
 
आपल्या उद्देशपूर्तीसाठी ज्ञान, कौशल्य आणि तीव्र इच्छा यांचा सामायिक घटक म्हणजे सवय अशी आपण ढोबळमानाने 'सवय' या संकल्पनेची व्याख्या करू शकतो. ज्ञान म्हणजे तात्त्विक धारणा! काय? का? कुठे? यासारख्या अनेक प्रश्नांची उकल. कौशल्य म्हणजे कसे करावे? याची मीमांसा आणि तीव्र इच्छा म्हणजे एखादे वर्तन प्रत्यक्ष करण्याची तळमळ. जीवनात एखादी सवय अंगी बाणताना या तिन्ही गोष्टींचा समसमा संयोग होणे अत्यावश्यक आहे. या तिन्ही घटकांच्या संयोगातून जी सवय लागते ती अतिशय परिणामकारक असते. आणि म्हणूनच आपल्या जुन्या चुकीच्या सवयी बदलून नवीन सवयी अंगीकारण्याची मानसिक तयारी व तद्वत वर्तन स्वतःला बदलताना असणे अत्यावश्यक आहे. या सात सवयींमध्ये अनुक्रमे...
 
1) परिपूर्ण साधनांनी सिद्ध रहा. (Sharpen the saw)
2) अग्रक्रमी बना. (Be proactive)
3) ध्येय निश्चित करून आरंभ करा. (Begin with an end in mind)
4) प्राथमिकता जाणून त्याप्रमाणे पहिली गोष्ट करा. (Put first thing first)
5) जिंकू- जिंकू विचार करा. (Think win- win)
6) प्रथम इतरांना समजून घ्या व नंतर तुम्हाला समजून घेण्याची अपेक्षा करा. (Seek first to understand, then to be understood)
7) सुसंगती (Synergize)
 
यासारख्या सवयींचा अंतर्भाव करणे अत्यंत अत्यावश्यक आहे. या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. यातील पहिल्या तीन सवयींमुळे तुमच्या आत्मविश्वासात झालेली मोठी वाढ दिसेल व तुम्हाला स्वतःलाच स्वतःचीच नव्याने अधिक खोलवर ओळख होईल. इतरांना तुमच्याबद्दल काय वाटते? याची तुम्हाला फारशी पर्वा राहणार नाही. इतरांच्या कमजोरीवर तुमचं भावनिक आयुष्य उभं राहणार नाही. त्याचप्रमाणे स्वतःला बदलणे तुम्हाला अधिक सोपं आणि हवंहवंसं वाटेल. पुढच्या तीन सवयी या- जन विजयाच्या सवयी आहेत. त्यामुळे चांगले नातेसंबंध सुधारतील. अधिक खोलवर, अधिक घट्ट, अधिक सर्जनशील व धाडसी होतील. यातील सातवी सवय मनापासून अंगीकारली तर पहिल्या सहांचे पुनर्नवीकरण होईल व ख-या अर्थाने तुम्हाला स्वावलंबी बनवेल व परस्परावलंबनासाठी सक्षम होता येईल. या सर्व सवयी अंगी बाणवल्या तर आपला प्रवास हा परावलंबनाकडून स्वावलंबनाकडे व तिथून परस्परावलंबनाकडे होईल हे निश्चितच! आणि त्यामुळे आपले व्यक्तित्व निश्चितच प्रभावशाली होईल यात यत्किंचितही शंका नाही. या सात सवयी म्हणजे स्वतंत्र किंवा तुकड्यातुकड्यांचे उत्तेजक सूत्र नाही. विकासाच्या नैसर्गिक नियमांशी सुसंगत राहून वैयक्तिक प्रभाव आणि नातेसंबंधातील परिणामकारकता वाढवणारा हा एक वर्धिष्णु एकसंघ मार्ग आहे.
 
क्रमाक्रमाने त्या आपल्याला परावलंबित्वाकडून स्वावलंबनाकडे आणि मग तिथून परस्परावलंबत्वाकडे नेऊन सातत्याने आपल्याला प्रगल्भ करीत असतात. प्रगल्भता हा अनुभवाने कमावलेला दृष्टिकोन आहे आणि एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की संपूर्ण जगच बदलून जाते. स्वतःमध्ये बदल करण्यासाठी किंवा स्वतःला बदलवण्यासाठी कोणीही दुस-याचं मन वळवू शकत नाही. प्रत्येकजण बदलाच्या दरवाजाची रखवाली करत असतो आणि हा दरवाजा आतूनच उघडता येतो. वाद किंवा भावनिक आवाहन करून आपण दुस-याचा दरवाजा उघडू शकत नाही. सात सवयींमध्ये अंतर्भूत असलेली तत्त्वं खरोखर समजण्यासाठी आणि प्रत्यक्षात आणण्यासाठी तुमचा बदलाचा दरवाजा उघडा ठेवा, एव्हढेच मी अंततः नमूद करू इच्छिते.
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई
Powered By Sangraha 9.0