चैतन्याचा झरा

Source :    Date :13-Jul-2020   
|
सोमवार, दि. १३ /७ /२०२०
 
मध्यंतरीच्या काळात समाजसेवकांच्या समाजसेवेबद्दल एक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यात आला. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा अनेक उपेक्षित क्षेत्रात विविध व्यक्ती समाजसेवेचे व्रत घेऊन सेवा बजावण्याचे कार्य करीत आहेत. यातील ब-याचशा व्यक्ती या निःस्पृहपणे कोणत्याही प्रसिद्धीची हाव न बाळगता अत्यंत सचोटीने व प्रामाणिकपणे आपल्या कार्यावर निष्ठा ठेवून कार्य पूर्णत्वास नेत असतात. सेवा म्हणजे काय? सेवाभाव म्हणजे काय? सेवेने काय साधते? असे अनेक प्रश्न माझ्या मनात रुंजी घालत होते. त्या प्रश्नांची उकल करण्याच्या दृष्टीने माझे विचार मी प्रस्तुत लेखात मांडले आहेत.

service_1  H x  
सेवा म्हणजे काय? ज्यामुळे एखाद्याचे आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक हित होईल ती सेवा! आपल्याला जास्तीत जास्त शक्य असेल तेव्हढी, परतफेडीची अपेक्षा न ठेवता दुस-याला मदत करणे म्हणजे सेवा. समाजसेवेचे अनेक मार्ग आहेत. कोणत्या प्रकारे करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न. मनुष्याला उपयोगी आल्याशी कारण! समाजसेवा ही संकल्पना आधुनिक राष्ट्रांच्या उभारणीमधील एक मूलभूत घटक आहे. सामाजिक सेवा म्हणजे संघटित कार्यरचना जिच्यामार्फत मुख्यतः सामाजिक संसाधनांचे संवर्धन, संरक्षण व सुधारणा साध्य करण्याचे योजनाबद्ध प्रयत्न केले जातात. समाजातील प्रत्येक नागरिकाचे प्राथमिक हक्क म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता व रोजगाराची उपलब्धी! या गरजा पूर्ण करण्यासाठी शासकीय व सहायक अशा स्वयंसेवी संस्था किंवा यंत्रणांची जरूरी असते.
 
साधारणतः अतिमहत्त्वाच्या सोयी व सुविधांचा पुरवठा शासनाला करावा लागतो. अविकसित प्रदेशात व विकसनशील समाजात विकासाच्या प्रारंभिक काळात सेवा व कल्याणकारक योजनांची राष्ट्र उभारणीसाठी फार मोठी गरज असते. पारंपरिक समाजात सेवाकार्य हे कुटुंब, जातिसंस्था व धार्मिक संस्थांद्वारे पुरवले जाई. मात्र समाजसेवा ही संकल्पना नैतिक मूल्य, सदाचार व दानाच्या कल्पनांशी निगडीत होती. प्रत्येक धार्मिक शिकवणीनुसार दया, करुणा व गरजूंना मदत करण्यावर भर दिलेला आढळतो. ज्या समुदायात व्यक्ती आपले जीवन व्यतीत करते, तेथे सामाजिक कर्तव्य व जबाबदारीची जाणीव ठेवून समाजऋण फेडले पाहिजे, ही सकारात्मक भावना समाजसेवा या संकल्पनेच्या मुळाशी आढळते. वैदिक वाङ्मयात स्मृती व पुराणे यामध्येही दानाच्या स्वरूपात केलेल्या समाजसेवेचा उल्लेख आढळतो. सामाजिक सेवा या संज्ञेचा प्रमुख रोख हा सामान्य जनतेच्या जीवनमानात योग्य ते कल्याणकारी बदल घडवून आणून समाजाचे आर्थिक बळ वाढवणे व संसाधनांचे न्याय्य वाटप करून, विषमतेचे प्रमाण कमी करणे हे होय. सामाजिक विकासाशिवाय आर्थिक विकासाला योग्य परिमाण मिळू शकत नाही व या दोहोत संतुलन राखण्यासाठी मूलभूत सामाजिक सेवा निर्माण कराव्या लागतात.
 
पूर्णवेळ समाजसेवा नोकरदार/ प्रापंचिक माणसाला स्वतःचे आयुष्य नुसतेच जगताना नाही तर मनापासून उपभोगताना करता येऊ नये काय? मला तसे वाटत नाही. जबाबदारीच्या जाणीवेतून सर्वांनीच काहीतरी सेवा करावी असे वाटते. जिथे आवडते तिथे, ज्या विषयात आवडते त्या विषयात आणि सुरवातीस अगदी जेव्हढा वेळ देता येईल तितकाच ..... संकटकाळी आपल्याला एखाद्या व्यक्तीने मदत केली, सेवा दिली तर त्याची आपणही परतफेड करायला हवी. त्याच व्यक्तीला परतफेड करावी असे नव्हे तर दुस-या एखाद्याला अडचणीत असलेल्याला रंजल्या गांजलेल्याला मदत करून समाजसेवेची ही साखळी अविरतपणे चालू राहिली पाहिजे. एका हाताकडून दुस-या हाताकडे तिथून तिस-या हाताकडे तिथून पुढे आणखी पुढे. फक्त हात बदलत जातील. समाज सेवेतील चैतन्य जिवंत राहिले पाहिजे. समाज सेवेच्या चैतन्याचा झरा सदैव अहर्निशपणे वाहता राहायला हवा!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई