शुक्रवार, दि. १०/ ७/ २०२०
ऑगस्ट महिना जसजसा जवळ येऊ लागतो तसतसे महिन्याच्या पहिल्या रविवारी येणा-या मैत्री दिवसाचे वेध लागू लागतात. लहानथोर, आबालवृद्ध सगळेचजण या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. मैत्री म्हणजे काय असतं? एकमेकांचा विश्वास असतो? अतूट बंधन असतं? की हसता खेळता सहवास असतो?
मैत्री म्हणजे मैत्री असते, व्याख्या नाही तिच्यासाठी|
ते अतूट बंधन नसतं, त्या असतात रेशीमगाठी||
मैत्री असावी पहाडासारखी, गगनाला भिडणारी|
मैत्री असावी समुद्रासारखी, तळाचा थांग नसणारी||
मैत्री हे एक नाते आहे जे आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट नाते बनवू शकतो. रक्ताच्या नात्यापेक्षाही हे नाते अगदी सहजसुलभ व तरल असते. मैत्रीत स्त्री- पुरुष हा भेद नसतो. मैत्री हे एक अनमोल नाते आहे. प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते. कारण प्रेम तर सगळ्यांना एकदातरी रडवते आणि मैत्री ही दुःखातही हसवते. इतिहासात डोकावून पाहिले असता तेनाली रामन आणि महाराज कृष्णदेवराय, तसेच बिरबल आणि राजा अकबर हे अतूट मैत्रीची साक्ष देतात. सर्वसाधारणतः मित्र हा आपल्या मनाच्या जवळचा असतो व तो आपली सुख- दुःख, समस्या, संकटे न सांगताच जाणून घेतो. मुख्य म्हणजे आपल्या मनातील भावना मित्राजवळ व्यक्त करताना आपल्याला संकोच वाटत नाही. त्याच्याजवळ आपल्या चुकांची कबुली देण्यास आपले मन कचरत नाही. सुप्रसिद्ध लेखक खलिल जिब्रान यांच्या मते मैत्री हक्क नसून ती एक गोड जबाबदारी असते . वास्तविक पाहता चांगले मित्र मिळणे कठीण, मिळाले तर ते गमावणे कठीण आणि विसरणे तर त्याहीपेक्षा कठीण. आपल्यातील गुण- अवगुण ओळखतो तोच खरा मित्र! मित्र आपली काळजी घेणारा दैवी आविष्कारच असतो.
प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांनी मैत्रीविषयी एके ठिकाणी सुंदर लिहिले आहे. ते म्हणतात, ''रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असंही काही नाही. एव्हढंच कशाला, रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री!" जिथे प्रेम, भावना, विश्वास, समजूत, त्याग, रुसणं, हसणं, निःस्वार्थ, आदर, काळजी येतं, या सर्वांचा मिलाप म्हणजे मैत्री. आजकालच्या काळात पेनफ्रेंड, आध्यात्मिक फ्रेंड, फोन फ्रेंड, फेसबुक फ्रेंड असे मैत्रीचे आधुनिक आभासी प्रकार आहेत. ते मला तरी अगम्य आहेत. माझ्यामते मित्र हे मित्र असतात. अगदी शुद्ध- निर्मळ! म्हणूनच सूर्याच्या अनेक नावापैकी एक नाव मित्र असे आहे.
मैत्री कशी असावी? गरीब मित्र सुदामा आणि भगवंत योगेश्वर श्रीकृष्णासारखी निःस्वार्थी मैत्री! सुदाम्याने दिलेल्या मूठभर पोह्यात प्रेम शोधणारी! मैत्री अशी असावी तर श्रीकृष्ण- द्रौपदीसारखी पवित्र! कृष्णाच्या सान्निध्यात द्रौपदीसारखी आतल्या गाठीची स्त्री आपोआप उमलते. श्रीकृष्णाने भर राजसभेत तिची लाज राखली, रक्षण केलं. अशी पवित्र मैत्री. मैत्री असावी तर अश्वत्थामा आणि अर्जुनासारखी निःसंकोच! लहानग्या अश्वत्थाम्याने आपल्याला अवगत असलेली युद्धाची विद्या अर्जुनाला भरल्या मनाने, उदारपणाने खेळाच्या पावित्र्यात दिली. मैत्रीचे बंधन निभावण्यासाठी वेळप्रसंगी भावंडांशीसुद्धा युद्ध पुकारलेल्या कर्ण- दुर्योधनासारखी कर्तव्यतत्पर मैत्री! पोटच्या पोराचं लग्न न लावता कोंढाण्याचा कौल घेणारी अन् सिंहगडावरून थेट स्वर्ग जिंकणारी मैत्री शिवाजीराजे आणि तानाजींची! जीवापाड प्रेम आणि जीवघेणी दुष्मनी करणारी मैत्री संताजी- धनाजीची! देशस्वातंत्र्यासाठी लढणा-या फासाचा दोर पहिला माझ्या ग्ळ्यात घाला म्हणून भांडणारी मैत्री असावी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्यासारखी!
शेवटी मैत्री म्हणजे काय हो? मैत्रीला कधीही प्रदर्शनाची गरज नसते. संकटसमयी मैत्री निभावण्याची जेव्हा वेळ येते, त्यावेळी कोणाची आपल्याला साथ लाभते तो खरा मित्र आणि मैत्रीण! त्यातले मैत्र केवळ अनमोल! शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारी आणि मरणानंतर अमर राहते ती मैत्री! कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे नाजूक, पण लोखंडाच्या तारेहून मजबूत ती मैत्री! तुटली तर श्वासानेच!
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई