मंगळवार, दि. ९/ ६/ २०२०
व्रत बांधिलकीचे! पद्मश्री पुरस्कार विजेत्या सुभासिनी मिस्त्री यांच्या कर्तृत्वाची कहाणी होती ती. एका स्त्रीने मनात आणलं तर ती काय करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुभासिनी मिस्त्री! अत्यंत गरीब घरात जन्मलेल्या या सुभासिनीचे १२व्या वर्षी लग्न झाले व वयाच्या २४व्या वर्षी चार मुले पदरात असताना तिच्या नव-याचे औषधपाण्याच्या अभावी दुर्दैवी निधन झाले. अतिशय गरिबी व त्यामुळे पैसे नसल्याने तिच्या नव-याला इस्पितळात प्रवेश नाकारला गेला व त्यामुळे त्याचा मृत्यू ओढवला. त्याच वेळी सुभासिनीने आपल्या आयुष्याचे ध्येय निश्चित केले की ज्या गावात स्वतःच्या नव-याला मरण आले त्याच गावात हाॅस्पिटल काढीन की जिथे सगळ्या गरजूंचे उपचार होतील व एकही माणूस उपचार मिळाले नाहीत म्हणून मृत्युमुखी पडणार नाही. अथक प्रयत्न आणि अपार कष्ट करत या बाईने हन्सपुफुर या गावात १९९२ साली १०,००० रुपयांना जमीन खरेदी केली व गावक-यांना मदतीचे आवाहन केले. मदतीचे अनेक हात पुढे आले व त्यातूनच २५० रुग्णशय्यांचे ह्युमॅनिटी हाॅस्पिटल उभे राहिले व आज हे सर्व वैद्यकीय सोयी व सुविधांनी युक्त हाॅस्पिटल मानवसेवेच्या यज्ञात अविरतपणे आहुती देत आहे. साधा वेष व पायात स्लिपर घालून मा. राष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारल्यानंतरसुद्धा कोणताही गर्वाचा लवलेश ना सुभासिनीच्या चेह-यावर होता, ना त्यांच्या बोलण्यात! ज्यावेळी माझ्या हाॅस्पिटलमधून पहिला रुग्ण बरा होऊन बाहेर गेला त्याचवेळी सर्वोच्च पुरस्कार मिळवल्याची भावना त्यांनी बोलण्यातून व्यक्त केली.
चार दिवसांपूर्वीच वट पौर्णिमा होऊन गेली व भारतीय संस्कृतीप्रमाणे आपल्यातील अनेक सुवासिनींनी वडाच्या झाडाची किंवा झाडाच्या फांदीची व यंदा तर कहर म्हणजे टाळेबंदीच्या काळात दोन्ही उपलब्ध नसल्याने वडाच्या झाडाच्या चित्राची रांगोळी काढून पूजा केली. व्रत-वैकल्य, परंपरा, श्रद्धा म्हणून याचा जरूर आदर करावा. पण मला जास्त भावल्या त्या दुस-याचा सत्यवान कोरोनाच्या रोगावर मात करून आरोग्यसंपन्न व्हावा, दीर्घायुषी व्हावा म्हणून हाॅस्पिटलात काम करणा-या महिला डाॅक्टर व परिचारिका! या ख-या 'सावित्री' वंदनीय आहेत. सत्यवान- सावित्रीची कथा आपणा सर्वांना ज्ञात आहेच. पण एक सहज डोक्यात विचार येतो की मनोभावे पूजा करणा-या, परंपरांचा वारसा चालवणा-या या सावित्री आज खरोखर वेळ आली तर नव-याच्या मदतीला धावतील की गडबडून जातील? इस्पितळात प्रवेश नाकारल्याने नव-याचा मृत्यू होतो व त्याचे परिमार्जन करण्यासाठी अशी वेळ कोणावर येऊ नये म्हणून दुस-याच्या 'सत्यवाना'साठी हाॅस्पिटल उभारणा-या सुभासिनी ख-या सावित्री वाटतात. नव-याने टाकल्यानंतर काळजावर दगड ठेवून स्वतःच्या मुलीला देवस्थानच्या ताब्यात देऊन अनेक अनाथ मुलींची माय होणा-या व वृद्धापकाळात नव-याने इच्छा व्यक्त केल्यावर त्याचा मरेपर्यंत आईच्या भावनेने सांभाळ करणा-या सिंधुताई सपकाळ या ख-या सावित्री! व त्या निश्चितच आदरास पात्र ठरतात.
वट पौर्णिमेची पूजा हे आहे बांधिलकी कशी पूर्णत्वास नेता येते याचे प्रतीक. हे आहे जबाबदारी कशी निभावायची याचे मूर्तिमंत उदाहरण. वचनबद्धता कशी फळास आणता येते त्याची ही पौराणिक कथा. बांधिलकी- वचनबद्धता- जबाबदारी ही मूल्ये कशी अबाधित राखायची याचे प्रशिक्षण. अन्यथा आजच्या काळात केवळ 'मी- माझे- मला' या भावनेने अंध झालेल्या व्यक्ती आपल्याला समाजात भरपूर दिसतात. केवळ पत्नीच्या पैशावर डोळा ठेवून तिच्याशी क्रूरपणे वागणा-या आधुनिक 'सत्यवाना'बद्दल काय बोलावे? केवळ स्वतःच्या आनंदासाठी लहर फिरली म्हणून बायकोचा त्याग करणा-या 'सत्यवानां'ची पूजा कोणत्या व्रताने करायची? सगळ्यात महत्त्वाची आहे ती बांधिलकी- वचनबद्धता- जबाबदारी- आणि ही सर्वच नात्यात, सर्वच व्यवसायात अधिक मोलाची आहे.
परंतु आज या कोरोना विषाणूच्या वैश्विक महामारीच्या काळात जेव्हा वैद्यकीय व्यावसायिक जीवाचे रान करून रुग्णांची सेवा करत आहेत, त्याचवेळी त्यांचे समव्यावसायिक आज आपले दवाखाने, इस्पितळे बंद ठेवून पण आहेत. वैद्यकीय आणीबाणीच्या काळी जर हे डाॅक्टर सेवा पुरवणार नसतील तर यांचा उपयोग काय? त्यांची नोंदणी का रद्द करू नये? सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून अल्प दरात शिक्षण घेऊन जर जनतेला तुम्ही सेवा देणार नसाल तर तुमची वचनबद्धता कोठे गेली? रुग्णांप्रती असलेली डाॅक्टरांची बांधिलकी कोठे जाते? डाॅक्टरी पेशा स्वीकारताना सेवा देण्याच्या घेतलेल्या शपथेची जबाबदारी कोठे जाते? काही इस्पितळे सहजपणे आज रुग्ण नाकारत आहेत व त्यामुळे कित्येक रुग्ण उपचाराअभावी मृत्युमुखी पडत आहेत. काही मोठी हाॅस्पिटले संधीचा फायदा घेऊन कोरोनाच्या रुग्णांची आर्थिक लुटमार करीत आहेत. सध्याच्या काळात हाॅस्पिटले बंद ठेवणे, रुग्ण नाकारणे वा त्याची आर्थिक पिळवणूक करणे, हे अतिशय निंद्य असून वैद्यकीय पेशाला कलंक लावणारे आहे. ज्याप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातील योद्ध्यांना जनतेने त्यांचे सर्व हक्क समाज म्हणून सुपूर्द करायला हवेत त्याचप्रमाणे या वैद्यक व्यावसायिकांनी त्यांची कर्तव्ये बजावताना कुठेही कुचराई करता कामा नये. सरकारी असो, खाजगी असो, कोणताही भेदभाव न करता अखंडीतपणे रोग्यांना सेवा मिळायलाच हवी. तरच जबाबदारी- बांधिलकी- वचनबद्धता या मूल्यांची जोपासना होईल. म्हणूनच सर्व वैद्यक क्षेत्रातील बांधवांना आवाहन आहे की रुग्णांना विनाशर्त सेवा देणे सुरू करा. आज तुमच्या मदतीची समाजाला, राष्ट्राला अत्यंत गरज आहे. आणि मंडळी, तुम्हीपण तुमचा वावर सुरक्षितपणे करा, स्वतःला रोगापासून वाचवा, कोरोनाला हरवा!
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई