'सुख' म्हणजे नेमकं काय असतं?

Source :    Date :28-Jun-2020   
|
रविवार, दि. २८/ ६/ २०२०
 
 
 मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? मिळालंय म्हणेस्तोवर हातात काही नसतं!' अशा शब्दांचे गाणे एका नाटकात ऐकल्याचे आठवते. तर सुख म्हणजे आत्ता होते आणि आत्ता गेले असे ज्याच्याबद्दल वाटते ते सगळे, असा त्याचा सर्वसमावेशक व्यापक अर्थ! सुख हे खरेच असते का? हे अगोदर तपासून पाहावे लागेल. बोटांना चावणारा बूट पायातून काढल्यावर किती सुख मिळते! आणि पायात असताना असते ते दुःख! बस्स, सुख हे असेच आहे.

happiness_1  H  
 
सुख म्हणजे नक्की काय असते? हा प्रश्न आपल्यापैकी सर्वांनाच पडत असतो. प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळी असते. पण शरीरशास्त्राच्या दृष्टीने सुखी माणसाच्या मेंदूत करड्या रंगाचे द्रव्य जास्त असते. जपानमधील कपोटो विद्यापीठातील वाटारू साटो व त्यांच्या सहका-यांच्या मते सुखाची भावना व जीवनातील समाधानाची भावना या मेंदूतील न्यूराॅन्सची एक यंत्रणा सुखाच्या अनुभूतीस कारण असते. पण अजूनही ती पूर्णपणे सापडलेली नाही. तिथेच सुखाचे मोजमाप होत असते. ते मात्र वस्तुनिष्ठ पातळीवर असते. मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तीच्या मेंदूचे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग केले असता विश्लेषणाअंती असे दिसून आले की ज्या लोकांच्या प्रेक्युमिअस या मेंदूतील भागात करड्या रंगाचे द्रव्य अधिक आहे त्यांना सुख किंवा समाधानाची अनुभूती जास्त मिळते. यापूर्वी अॅरिस्टाॅटल या तत्त्ववेत्त्यापासून सगळ्यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं, यावर विचार मांडले असले तरी व सुखी माणसाचा सदरा शोधूनही सापडणार नसला तरी वैज्ञानिकांनी सुखाची संकल्पना मूर्त स्वरूपात काहीशी शोधली आहे. अनेक अभ्यासांत दिसून आले आहे की ध्यानधारणेने मेंदूतील प्रेक्युनिअस हा करड्या रंगाचा भाग वाढतो व त्यामुळे मेंदूत सुखाच्या भावनेची वस्तुनिष्ठ अनुभूती मिळावी यासाठी शास्त्रोक्त कार्यक्रम तयार करता येऊ शकतात, असा साटो या शास्त्रज्ञाचा दावा आहे.
 
सुख पाहता जवापाडे| दुःख पर्वताएव्हढे|| म्हणणा-या संत तुकाराम महाराजांनासुद्धा सुख तीळ जवसाएव्हढे कणभर भासते तर दुःख मात्र पर्वताएव्हढे पहाडाएव्हढे मोठे वाटते. नेटका प्रपंच करतानादेखील आपणांस प्रश्न पडतो की 'मी सुखी आहे काय?' सुखाची परिभाषा प्रत्येकाची वेगवेगळी असते. सुख मिळवण्यासाठी आपण आपला प्रत्येक क्षण वेचत असतो. या जगातील सर्व भौतिक सुखे प्राप्त केल्यानंतर कधी कधी माणूस अधिक सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. काहींना ज्ञानमार्गातूनसुद्धा फार मोठे सुख प्राप्त होत असते. मार्ग कोणताही असो सुख मिळवणे महत्त्वाचे असते. सुख हे व्यक्तिनिष्ठ तुलनात्मक संकल्पना असते. ज्यात मला सुख मिळेल त्यात दुस-या व्यक्तीला मिळेलच असे नाही. शाश्वत सुख व अशाश्वत सुख असे दोन सुखाचे प्रकार सांगितले जातात. सर्वसाधारणतः भौतिक गोष्टीपासून मिळणारे सुख हे अशाश्वत सुख तर परमेश्वराचे चिंतन- मनन करून मिळणारे सुख व्यक्तिनिष्ठ सुख जरी असले तरी ते शाश्वत सुख या गटात मोडते. सुख हे ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर अवलंबून असतं असं मला वाटतं. एखाद्या गोष्टीच्या हव्यासासाठी आपण दुःखी होऊन ती मिळवण्याच्या मागे लागतो व ज्या क्षणी ती मिळते तो सुखाचा क्षण व नंतर नवीन एखाद्या गोष्टीची हाव वाटली की परत आपण दुःखी! सुख म्हणजे फुलपाखरासारखं! मोहक, चंचल! निसटतंच हातात येते. पण ते पकडताना बोटातून उडाले म्हणून दुःखी झालो तर बोटांना त्याच्या लागलेल्या रंगाकडे दुर्लक्ष करीत परत दुःखी होतो. म्हणून सुख हे भोगण्यापेक्षा समजण्यात अधिक असते असे मला वाटते.
 
जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तूच शोधूनी पाहे| या समर्थ रामदासांच्या उक्तीला अनुसरून म्हणावेसे वाटते की सुख काही कोणत्या वस्तूचे नाव नाही. सुख उपभोगणे हा विषय नसून ती वृत्ती आहे. नशीबवान, भाग्यवान होता येईल की नाही माहीत नाही. पण चांगले विचार, उत्तम मानसिक आरोग्य व कृतिशील सत्कर्माचा आचार याने 'सुखवान' नक्कीच होता येईल. म्हणूनच अंततः म्हणावेसे वाटते-- 
                                             ख-या सुखाचा चेहरा नाही कोणी पाहिला|
                                             जो तो हाकारितो त्यांना... या सुखांनो या||
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई