卐 वास्तू देवो भव 卐

27 Jun 2020 10:54:01
शनिवार, दि. २७/ ६/ २०२
 
काल सहजच दुपारच्या फावल्या वेळेत यु-ट्यूबवर व्हिडिओ धुंडाळत असताना वास्तू शास्त्राविषयी माहिती देणारा व्हिडिओ दृष्टीस पडला. परंतु तो खूपच त्रोटक असल्याने मला तो बघून त्या विषयीची परिपूर्ण माहिती काही मिळाली नाही. म्हणूनच माझ्यासारख्या जिज्ञासू विद्यार्थ्याचे डोके शांत कसे राहणार? म्हणून त्याविषयी माहिती संकलित करण्याचा प्रयत्न केला असता जे काही मला उमगले ते प्रस्तुत लेखात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, तुम्हाला किती उमगतेय!
 
vastu_1  H x W:
 
 माणसाला अन्न, वस्त्र, निवारा या अत्यंत जरुरीच्या तीन मूलभूत गोष्टी देणारी 'अवनी' म्हणजेच धरतीमाता! अन्न व वस्त्र या दोन प्राथमिक गरजा भागल्यानंतर माणूस विचार करतो तो निवा-याचा. ज्या ठिकाणी तो स्वतःच्या निवा-याची सोय करतो, मग ते अगदी चंद्रमौळी झोपडीपासून ते सर्व सोयी- सुविधायुक्त राजमहालापर्यंत! काहीही व कशीही असली तरी प्रत्येकाला आपली मठी अतिशय प्रिय असते. स्वर्गापेक्षा प्रिय असलेल्या आपल्या घरात प्रत्येकजण समाधानाने नांदत असतो व म्हणूनच वास्तूला देवतेचे स्थान देऊन प्रत्येक धार्मिक कार्यात तिला अग्रपूजेचा मान दिलेला आहे. मानवाच्या बुद्धिनिष्ठ व विज्ञानाधारित विचारप्रणालीमुळे मूलभूत गरजांना माणूस फक्त गरज एव्हढ्याच पातळीवर ठेवू शकला नाही. निवा-याच्या बाबतीत विचार करायचा झाला तर जसजशी माणसाची प्रगती होत गेली तसतसे अनेक पैलू या निवा-याला लाभत गेले आणि प्रत्येक संस्कृतीच्या दृष्टिकोनाप्रमाणे विविध राष्ट्रांमध्ये वास्तूला विविध आकार प्राप्त झाले.
 
वास्तविक पाहता 'स्थापत्य अभियांत्रिकी ' म्हणजेच वास्तुशास्त्र! परंतु हल्लीच्या काळात वास्तुशास्त्र व वास्तू ज्योतिषशास्त्र या दोन विषयांमध्ये गल्लत केल्याने वास्तु ज्योतिषशास्त्राचा उदो उदो होत आहे. काही जुन्या भारतीय ग्रंथात वास्तुनिर्मितीचे उल्लेख आहेत. विश्वकर्मा हा आद्य वास्तुविशारद मानला जातो. इजिप्तच्या 'इम होतेप' याने आश्चर्यकारक वास्तुनिर्मिती केली. पाच हजार वर्षांपूर्वीच्या या वास्तू आजही पाहावयास मिळतात. मोहोंजोदडो- हडाप्पा येथील नगररचनाही तितक्याच जुन्या आहेत. त्यातील वास्तुशास्त्रही थक्क करणारे आहे. या सर्वांचा मुख्य गाभा वास्तुशास्त्रच आहे. भारतीय वास्तुशास्त्राला ऋषींची परंपरा आहे. ऋग्वेद- अथर्ववेदात याची बीजे आहेत. तर मत्स्य पुराण, अग्निपुराणातही वास्तुशास्त्रासंबंधित संदर्भ सापडतात. मानसारम्, समरांगण, सूत्रधार, अपराजित पृच्छाः, मनुष्यालय चंद्रिका इत्यादी ग्रंथ विशेषत्वाने वास्तुशास्त्राचे विस्तृत विवेचन करतात. संपूर्ण भारतीय संस्कृतीचा गाभा अथवा सूत्र आरोग्य हेच असून भारतीय वास्तुविद्याही याला अपवाद नाही. वास्तू म्हणजे चार भिंती, खिडक्या, दारं एव्हढंच नव्हे! भारतीय वास्तुशास्त्राने प्रकाश, हवा, बांधकामातील पक्केपणा, सौंदर्य यांच्या पलीकडे जाऊन व्यापक विचार केला. हे सर्व तर वास्तूमध्ये हवेच, पण वास्तूने आपल्याला 'आरोग्य' द्यावे आणि असे हे आरोग्य भौतिक सुखसमृद्धीही घेऊन येईल.
 
निसर्ग नियमानुसार आपले घर कसे बांधायचे याचे शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र! नैसर्गिक ऊर्जांचा अधिकाधिक वापर घरात व्हावा, हा भारतीय वास्तुशास्त्राचा हेतू दिसतो. माती, पाणी, उजेड, वारा, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय तत्त्व या सर्व नैसर्गिक तत्त्वांचा अभ्यास करून त्यांचा योग्य तो मिलाप करून वास्तूची रचना करणे म्हणजे खरे वास्तुशास्त्र. भूकंपप्रवण क्षेत्र, समुद्रकिनारे, डोंगराळ मार्ग, वा-याची दिशा, पावसाचे प्रदेश अशा गोष्टींचा विचार वास्तू बांधताना केला गेला पाहिजे. त्यामुळे आधुनिक वास्तुज्योतिषी सांगतात त्याप्रमाणे एकच एक नियम सर्वत्र लागू पडत नाही. खरे पाहता विचारवंतांनी आधुनिक काळामध्ये स्वीकारलेला बुद्धिप्रामाण्यवाद आणि तर्कशक्ती यांच्या आधारावरच या वास्तुशास्त्राचा विचार करावा लागतो
 
 मनुष्याच्या जीवनात येणारे विविध चढउतार, अपयश, आजारपण, आर्थिक संकट, अपमृत्यू यासारखे कठीण प्रसंग आले की माणूस हतबल होऊन अतार्किक विचार करू लागतो व वास्तुदोष शोधू लागतो व ज्योतिषांनी सांगितलेले महागडे उपाय करू लागतो. परंतु या वेळेस आवश्यकता असते ती तर्कसंगत विचार करण्याची. ज्या वास्तूत आनंदाचे क्षण अनुभवले, यशाची विविध शिखरे पादाक्रांत केली ती वास्तू अचानक दूषित कशी होते? आणि वास्तू पूर्व- पश्चिम असावी, प्रत्येक खोलीत खिडकी असावी व ती पूर्व- पश्चिम असावी हे सांगण्यास ज्योतिषी कशास हवा? स्वयंपाकघरासमोर प्रसाधनगृह असू नये हे जाणवून द्यायला ज्योतिषी काय कामाचा? संत तुकडोजी महाराज यांनी वर्णिल्याप्रमाणे 'पाहून सौख्य माझे| देवेंद्र तोही लाजे| शांती सदा विराजे| या झोपडीत माझ्या||' अशी वास्तूला मंगल व पवित्र उपयोग्यता मिळवून देणे आपल्याच हाती नाही का? वामनरूपी बटूच्या अवतारात अवतीर्ण झालेल्या भगवान विष्णूंनी केवळ त्यांच्या दोन पावलांत पृथ्वी व स्वर्ग पादाक्रांत केले ही आख्यायिका खरी असली तरी आपल्यासारख्या सामान्य माणसाला सुखासमाधानाने, आनंदाने, सौख्याने नांदण्याकरीता आपली काडी काडी जमा करून बांधलेली वास्तूच पुरेशी आहे. आणि त्यात वैभवलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, वीरलक्ष्मी, संतानलक्ष्मी आणि मुख्य म्हणजे आरोग्यलक्ष्मी या अष्टलक्ष्मी एकत्रपणे एकत्र नांदणे हे वरदान आहे.
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई
Powered By Sangraha 9.0