पुराण मातीचे...

Source :    Date :24-Jun-2020   
|
बुधवार, दि. २४/ ६/ २०२०
 
 
सध्या भारत- चीनच्या सीमेवर तणावाचे वातावरण आहे. आधीच जगभराला कोरोनासारखा महाभयंकर रोग देण्यासाठी कारणीभूत ठरलेला चीन भारताशी युद्ध सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे सर्वत्र भारतीय जनतेला चिनी बनावटींच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तद्वत् जर बहिष्कार घातला नाही तर देशद्रोही ठरण्याची भीती आहेच. म्हणून फावल्या वेळात घरात कोणत्या चिनी बनावटीच्या वस्तू आहेत याची पडताळणी करत असताना विविध आकाराच्या चिनी मातीच्या बरण्या दृष्टीस पडल्या. मोहक आकाराच्या वेगवेगळ्या बरण्यांबरोबरच त्यांच्यात साठवलेले चटकदार कैरीचे व लिंबाचे लोणचेसुद्धा तितकेच आवडीचे असल्याने चिनी माती म्हणजे काय? तिचे उगमस्थान काय? याविषयी अभ्यास सुरू केला असता लक्षात आले की चिनी मातीची भांडी व चीन यांचा प्रत्यक्षात काहीही संबंध नाही. तेव्हा जीव त्या चिनी मातीच्या भांड्यात पडला.
 
 
Soil Types_1  H
 
 
खरे पाहता, मृदा- माती या पर्यावरणातील घटकाला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. निसर्गातील मूळ खडक हा मृदा निर्मितीचा महत्त्वाचा घटक असतो. प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकांच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे विदारण होते. त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते. उदा. महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावरील बेसाॅल्ट या मूळ खडकाचे विदारण होऊन काळी माती तयार होते. तर दक्षिण भारतातील ग्रॅनाईट व नीस या (जांभा) मूळ खडकापासून तांबडी माती तयार होते. तर पठाराच्या पश्चिम भागात घाट माथ्यावर आढळणारी जाडी भरडी माती (मुरुम) ही विदारण क्रिया व कमी पाऊस यांच्या परिणामातून तयार होते. वेगाने वाहणा-या नद्यांनी वाहून आणलेला गाळ नदीच्या मुखाशी साचतो व त्यातून तयार होते ती किनारपट्टीवरील गाळाची मृदा व सोप्या शब्दात चिकण माती, जिच्यापासून भातुकलीची खेळणी बनवतात. तसेच शेतीसाठी फारशी सुपीक नसलेली अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात आढळणारी पिवळसर तपकिरी माती होय. विविध प्रकारची खेळणी व विशेषतः गणपती बाप्पाच्या मूर्ती बनवण्यासाठी वापरतात ती गुजरातमध्ये आढळणारी पांढरी शाडूची माती जी खूप मळून घेतल्यानंतर चिकटपणा व ताठरपणा धारण करते. आता चिनी मातीचा विचार करता चिनी माती हे 'केओलिनाइट' या प्रकारचे एक औद्योगिक खनिज आहे. हे चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर सापडते. म्हणून त्याला चिनी माती असे म्हणतात. भारतामध्ये उच्च प्रतीच्या चिनी मातीचे साठे बिहार, कर्नाटक, केरळ, दिल्ली व जबलपूरजवळचे भाग, पश्चिम बंगाल, ओरिसा, गुजरात, राजस्थान व तामीळनाडू या राज्यात आहेत. पण या चिनी मातीची भांडी मात्र उत्तर प्रदेशातील खुर्जा या गावी तयार होतात. दिल्लीपासून जवळ असलेल्या खुर्जा या गावातून लोणचे, तिखट, मीठ बरेच दिवस टिकावे यासाठी लागणा-या खास बरण्या भारतभरात विकायला जातात. त्याचप्रमाणे विजेचे फ्यूज सर्किट, इन्सुलेटर, प्रयोगशाळेतील उपकरणे, विमानाचे स्पेअर पार्ट, टर्बाईन राॅकेट, न्यूक्लिअर फ्यूजन, अंतराळातील लागणारे सामानही चिनी मातीचेच बनते आणि तेही आपल्या भारतात! तेव्हा मंडळी, चिनी मातीच्या बरण्यातील लोणची बरणी न फोडता आनंदाने खा व अस्सल भारतीय असल्याचा बाणा जपा.
भारत हा कृषिप्रधान देश असल्याने मातीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी मृदा तपासणी करून खताच्या व विविध प्रकारच्या औषधांच्या उपयोजनास महत्त्व प्राप्त झाले आहे. माती परीक्षण करूनच खतांचे व्यवस्थापन केल्याने शेतक-यांची लाखमोलाची जमीन चिरकाल, चिरंजीवी व शाश्वत ठेवता येते. अन्न सुरक्षा व सुरक्षित अन्न यामध्ये संतुलन साधता येते. अंततः ही मातीच आपल्याला शाश्वत व चिरंतन आधार देत असते. काबाडकष्ट करून अविरत मेहनतीने मिळवलेले यश पचवण्यासाठीसुद्धा पाय मातीचेच असावे लागतात व ध्येयपूर्तीस्ठी पाय मातीतच घट्ट रोवून उभे राहावे लागते. अन्यथा आपली स्वप्ने, इच्छा मातीमोल ठरण्याचीच भीती जास्त. म्हणूनच 'मातीला आकार द्यावा तशी मूर्ती घडते' या उक्तीप्रमाणे आपल्या मनावर सदैव सकारात्मक, होकारार्थी राहण्याचा संस्कार करू या. अन्यथा जिद्दीने व पराकोटीच्या प्रयत्नांनी यश मिळवण्याच्या ईर्षेलाच मूठमाती द्यावी लागेल.
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई