आईपण!

23 Jun 2020 09:35:58
मंगळवार, दि. २३/ ६/ २०२०
 
आज माझ्या आईचा हिंदू पंचांगाप्रमाणे स्मृतिदिन आहे. आषाढातला जोरात कोसळणारा पाऊस सुरू झाला की तिच्या आठवणींनी मन कातर होते. त्यातच यंदा संचारबंदीमुळे सर्वच कुटुंबिय घरात असल्याने देश विदेशातील कुटुंबियांनासुद्धा सहभागी करून घेऊन ऑनलाईन स्नेहसंमेलने चालू असतात. साथीच्या वाढत्या संक्रमणामुळे जरी भौगोलिक अंतर जास्त असले तरी सर्व कुटुंबिय मनाने जास्तच जवळ येत आहेत व ऑनलाईन स्नेहसंमेलनाद्वारे आनंदाची लयलूट करीत आहेत. अशाच एका प्रसंगात माझ्या आईची आठवण निघाली व सर्वच जण आपापले अनुभव/ आठवणी सांगत गेले.
 
 
mother_1  H x W
 
इयत्ता पहिलीत असताना शाळेत बाईंनी शिकवलेल्या अक्षरातील 'ज्ञ' काढता न आल्यामुळे खट्टू झालेली मी आईने हाताला धरून पाटीवर अक्षरे गिरवून दिल्यामुळे माझा अ ते ज्ञ म्हणजेच 'अज्ञानाकडून ज्ञानाकडे' प्रवास कसा झाला ते मला कळलेच नाही. माझी आई द्विपदवीधर शिक्षिका होती. ज्याप्रमाणे तिचे मन पूर्वापार चालत आलेल्या रुढी परंपरा जपण्यात रमत असे, तितकेच ते नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाशी जमवून घेण्यातही गुंतत असे. आपल्या मुलांवर जरी जीवापाड प्रेम असले तरी त्यांचे फाजील लाड न करता ती कशी स्वयंपूर्ण होतील याच विचाराने तिचे सदैव प्रयत्न असत. ज्या काळात स्वयंशिस्त, सकारात्मक विचार, व्यक्तिमत्व विकास, स्वयंपूर्णता असे शब्द प्रचलित नव्हते तरी तेव्हापासूनच ही सर्व मूल्ये तिच्या शब्दकोशात होती व ती आम्हीही अंगीकारावी याकडे तिचा कटाक्ष असे. मला स्वतःला बहीण नसल्याने ती वेळप्रसंगी माझी बहीण होत असे. तर कधी कधी माझी मैत्रीणसुद्धा! बालपणापासून ते प्रौढावस्थेत गेल्यानंतरसुद्धा प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विचार शेअर करण्याचे हक्काचे स्थान होते ते माझे. तिच्या नुसत्या घरात असण्यानेच घर व माझे मन भरलेले असायचे. जरी तिच्याशी शाब्दिक चकमक उडत असली तरी त्यात एक अनोखी मजा होती. ती गेली तेव्हापासून मनातील तो कोपरा सदैव रिता आणि रिताच राहीला.
 
का बरे एव्हढे आईपण मोठे असते? स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी! असे का म्हणतात? काय दडलंय एव्हढं आईपणात की परमेश्वर आईच्या रूपात आपल्या सहवासात येतो. पोटात जीव अंकुरलाय हे समजल्यावर आपण आई होणार या जाणीवेने स्त्रीचे मन आपसूक गिरक्या घेत सुटते व स्त्रीची आई होते. बाळ जन्माला येतानाच्या प्रसववेदना ती सहन करते फक्त पोटात वाढणा-या बाळाला एकवार पाहण्यासाठी. जगरहाटीची चिंता नसलेला एक इवलासा जीव निरागसपणे आपल्या अमृतकुंभातील दूध प्राशन करताना अनुभवणं, हे तिच्यासाठी स्वर्गीय सुख असतं. आई झाल्यावर ती 'बाळा, होऊ कशी उतराई' म्हणत मातृत्व देणा-या बालकाचे आभार मानते. स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, हौस, मौज या सर्वांचा बळी देऊन अहोरात्र काबाडकष्ट करून केवळ बाळाच्या सुखासाठी- वृद्धीसाठी झटणा-या माता बघितल्या की नतमस्तक व्हायला होते. ऋग्वेदामध्ये अनेक ठिकाणी मातेची महती वर्णन केलेली आहे. तिला सर्वांहून अधिक घनिष्ट आणि प्रिय मानले गेले आहे. अथर्ववेदामध्ये म्हटले आहे- 'मात्रा भवन्तु सन्माना:|' वसिष्ठ ऋषींनी मातेचे श्रेष्ठत्व वर्णन करताना म्हटले आहे- 'दहा उपाध्यायांपेक्षा एक आचार्य श्रेष्ठ आहे शंभर आचार्यांपेक्षा पिता श्रेष्ठ आहे आणि एक सहस्त्र पित्यांपेक्षा एक माता ही अधिक श्रेष्ठ आहे.'
 
असे हे महन्मंगल मातृत्व- आईपण हे केवळ आईला बाळाच्या जन्मामुळेच प्राप्त होते का हो? नक्कीच नाही. कारण आईपण- मातृत्व या संकल्पनेची व्याप्ती एव्हढी अमर्यादित आहे की नात्यांची कोणतीही कुंपणे त्याला घालता येत नाहीत. कारण मातृत्व- आईपण हे केवळ नात्यात नसून ती आहे एक भावना! ज्यात त्याग, समर्पण, शुभचिंतन, पराकोटीची काळजी, माया, ममता, वात्सल्य, उत्कर्षाची आस या भावना अंतर्भूत आहेत. जर का केवळ जन्म देऊन आईपण मिळाले असते तर यशोदा- कृष्ण यांच्या नात्याला काय संबोधायचे? शेकडो अनाथ बालकांना आपले म्हणून त्यांची माय- माई बनणा-या सिंधूताईंना काय म्हणायचे? लाखो अनाथ, गांजलेल्या माणसांची सेवा करून त्यांना माणसांत आणणा-या मदर तेरेसा यांच्याहून आई वेगळी असते का हो? आईच्या ममतेने वृद्ध आई व वडिलांची काळजी घेणारी मुलगी अथवा सून आईपेक्षा कमी श्रेष्ठ का? वेळप्रसंगी वयाने लहान असूनसुद्धा भरकटलेल्या मोठ्या भावाची वात्सल्याने, ममतेने काळजी घेणारी बहीण आईच नव्हे का? माझ्यामते आईपण ही एक भावना आहे समर्पणाची, त्यागाची, दुस-यांना आनंदी करण्याचे कर्तव्य बजावण्याची आणि त्या आईपणाचा वसा सतत वाहता ठेवण्यासाठी आवश्यक आहे ती मनातील माया आणि त्यासाठी हवे ते आभाळाएव्हढे असीमित मन! आईपण निभावण्यासाठी एव्हढ्या दोन गोष्टी पुरेशा आहेत.
 
म्हणूनच आज माझी आई या जगात नसताना जेव्हा तिच्या स्मृतिदिनी मला प्रश्न पडतो आईसाठी व्हाॅटस् अॅपवर काय स्टेटस ठेवावे? तेव्हा जाणीव होते आज जे माझे स्टेटस आहे ते आईमुळेच!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई
Powered By Sangraha 9.0