योगदिनाच्या निमित्ताने...

Source :    Date :22-Jun-2020   
|
सोमवार, दि. २२/ ६/ २०२०
 
काल दि. २१ जून. संपूर्ण जगात योग दिवस साजरा झाला. योग दिवस ही भारताने संपूर्ण विश्वाला दिलेली पवित्र भेट आहे. भारत सरकारच्या प्रयत्नाने सुरू झालेला व जगभर पाळला जाणारा असाच एक दिवस म्हणजे योग दिवस. आज संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या साथीच्या छायेत असल्याने प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने योगाचे महत्त्व अधोरेखित होते.
 
 
Yoga Diwas_1  H 
 
कित्येक वेळा केवळ आसन किंवा प्राणायाम यांनाच आपण योग समजत असतो. मात्र तसे नसून योगाची व्याप्ती खूप मोठी आहे. 'युज्' या मूळ संस्कृत धातूपासून तयार झालेल्या योग या शब्दाचा अर्थ 'जोडणे' असा होतो. आपले शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणे, याला योग म्हणतात. योग ही सर्वांगीण आरोग्यपूर्ण जीवनशैली आहे असे म्हणायला हरकत नाही. भगवद्गीतेनुसार योगाची ही परंपरा अनादी अशी असून स्वतः भगवान श्रीकृष्णाला योगेश्वर असे म्हटले असले तरीही ते योगशास्त्राचे उद्गाते नव्हेत. भगवान पतंजलीसुद्धा योगशास्त्राचे उद्गाते नसून त्यांनी योगाला सुसूत्रतेने बांधण्याचे दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. योगाचे उद्गाते भगवान शंकर असून त्यांनी पहिल्यांदा पत्नी पार्वतीला योग सांगितल्याचा उल्लेख पुराणात आहे. योग ही अशी निरंतर प्रक्रिया आहे जी कायिक, वाचिक आणि मानसिक या तिन्ही पातळ्यांवर स्थैर्य प्रदान करून माणसाला सर्वार्थाने निरोगी ठेवते. सुश्रुत संहितेत "अनागताबाधा प्रतिषेध" नावाचा अध्याय आहे. अनागताबाधा म्हणजे अद्याप जी आलेली नाहीत अशी दुखणी किंवा आजार. या अध्यायात दिनचर्येचे सविस्तर वर्णन करून या 'अद्याप न आलेल्या' विकारांना दूर ठेवण्याचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी योग हे आपल्या दैनंदिन जीवनाचे अंग बनायला हवे.
 
वास्तविक पाहता योग मार्ग हा मोक्षाचा मार्ग. आत्म्याकडून परमात्म्याकडे प्रवास करणारा मार्ग म्हणून भारतीय दर्शनशास्त्रात महत्त्वाचा होता. मात्र या प्रवासात योगाचा मधला टप्पा जो येतो तो मानवी शरीराला निरोगी, सुडौल, चपळ, तरतरीत ठेवणारा आहे. तर शरीराच्या जोडीला मनालाही स्वास्थ्य मिळवून देणारा आहे. मोक्षाच्या दिशेने वाटचाल ही मनावर नियंत्रण ठेवण्यापासून सुरू होते. आणि मोक्ष हा जरी हेतू ठेवला नाही तरी आताच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या, स्पर्धेच्या युगात मनावर नियंत्रण, मनाचे संतुलन हेच अधिक महत्त्वाचे झाले आहे. आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्राॅईड यांच्या मते माणसाचे मन हिमनगासारखे असते. या तुलनेप्रमाणे आपल्या मनाचा काहीसाच भाग आपल्याला ज्ञात असतो व उरलेला बराचसा अज्ञात. आणि म्हणूनच त्याचे संतुलन राखणे हे अपरिहार्य असले तरी कठीण असते. आणि या कामातच योगसाधना आपले अनन्यसाधारण योगदान देत असते. निरोगी शरीरात निरोगी मन वस्ती करते. आणि निरोगी मनाच्या माणसांनी भरलेला समाज राष्ट्राला नेहमीच प्रगतीपथावर नेत असतो. स्पर्धेमुळे येणारे नैराश्य, मनाला आलेली मरगळ झटकून टाकण्यास योगसाधना मदतच करत असते. प्रत्येक व्यक्ती ही आपल्या विचारांप्रमाणे घडत असते. जर आपण स्वतःला दुर्बल समजलो तर दुर्बल बनतो व सामर्थ्यशाली समजलो तर सामर्थ्यवान बनतो आणि आपल्या मनाची विशिष्ट प्रकारची धारणा करण्यास योगसाधना महत्त्वाची भूमिका बजावते. स्पर्धा जीवघेणी ठरल्याने अनेक व्यक्ती निराशेच्या गर्तेत अडकून आत्महत्येचा मार्ग पत्करतात. असे वर्तन कधीच कोणाच्याच उद्धारास पोषक नाही. त्यासाठी मनाची ताकद वाढविणे गरजेचे आहे. मनावर ताबा व नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. मानवी भावनांवर पूर्णपणे ताबा ठेवून त्याची अभिव्यक्ती समाजमान्य मार्गाने करणे, आपल्याला योग शिकवते. योग मानवाच्या मनाला, वर्तनाला, विचारधारेला शिस्त लावते. आणि म्हणूनच योगसाधना जीवनाचे अविभाज्य अंग बनले पाहिजे.
 
योगाची बाह्य अंगे व आंतर अंगे मन आणि आत्मा यांच्या पातळीवर कार्य करून साधकाला मोक्षाप्रत पोहचवतात. योगशास्त्र मानवी जीवनाला हि-याप्रमाणे पैलू पाडून लौकिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही पातळ्यांवर त्याला अनमोल बनवते. त्यातूनच निकोप दृष्टिकोन असलेल्या सशक्त सकारात्मक समाजपुरुषाची निर्मिती होते. व राष्ट्राचा विकास अत्त्यच्च पातळीवर जाऊन पोहोचतो. म्हणूनच कोणत्याही धार्मिक अथवा राजकीय हेतूने प्रेरित अशा पद्धतीने योग दिनाकडे पाहण्यापेक्षा आपल्याच आरोग्याचे रक्षण करणारी जीवनपद्धती म्हणून योगसाधनेकडे पाहिले पाहिजे. एव्हढेच या निमित्ताने सांगावेसे वाटते.
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई