ग्रहण...

21 Jun 2020 09:17:09
रविवार, दि. २१/ ६/ २०२०
 
माझं आभाळ...
 
माझं आभाळ- माझ्या अभिव्यक्तीचा आविष्कार! आपल्या रोजच्या जीवनाच्या रहाटगाडग्यात अनेक ब-यावाईट प्रसंगांना आपण सामोरे जातो. त्यातल्या काही घटना ब-याच काळ आपल्या मनात रुंजी घालत असतात. त्या अनुषंगाने अनेक साधकबाधक विचार व्यक्त करण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न! प्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या मते आभाळ आणि आकाश यात फरक आहे. आभाळ असतं काळ्याकुट्ट मेघांनी भरलेलं. पाऊस येणार, सुख समृद्धी येणार याचे भविष्य वर्तवणारं. तर आकाश असतं निरभ्र. जिथे मेघांचे अस्तित्वच नाही. आणि म्हणूनच या ललित लेखांचा संग्रह माझं आभाळ... माझ्यासारख्या अभ्यासू व्यक्तीच्या संवेदनशील मनातून आलेले विचारांचे हुंकार, ललित लेखांच्या माध्यमातून घेतलेला घटनांचा लेखाजोखा. रोज एक नवीन विचार, नवीन प्रसंग तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न! बघू या किती जमतेय ते
!
************************************************************************************
 
 ग्रहण...
 
रविवार, दि. २१ जून २०२० रोजी ज्येष्ठ अमावस्या आणि त्यातही त्या दिवशी सूर्यग्रहण असल्याचे वाचनात आले. कोरोना विषाणूची साथ, रोगाचे वाढते संक्रमण, जूनच्या पहिल्या आठवड्यात 'निसर्ग' चक्रीवादळाने कोकणाला दिलेला तडाखा, त्यात झालेली अपरिमित हानी, आर्थिक अनिश्चिततेमुळे नागरिकांची दोलायमान झालेली असंतुलित मानसिक स्थिती आणि आता त्यात कहर म्हणजे येऊ घातलेले हे ग्रहण! काही शब्द ऐकताच मनात भीतीचे विनाकारण काहूर उठते. त्यातलाच एक शब्द म्हणजे- ग्रहण!  
 

Solar Eclipse_1 &nbs 
 
वास्तविक पाहता ग्रहण म्हणजे एक खगोलीय घटना. ग्रहण म्हणजे अवकाशात घडणारा प्रकाश- सावलीचा आणि खगोलांच्या सापेक्ष स्थानांचा खेळ. जेव्हा निरीक्षकसापेक्ष एक खगोलीय वस्तू दुस-या खगोलीय वस्तूच्या आड येते, म्हणजेच निरीक्षकांसाठी पहिली वस्तू दुस-या वस्तूला झाकते, तेव्हा पहिल्या वस्तूने दुस-या वस्तूला ग्रहण लावले असे म्हणतात. ग्रहणाचे ग्रहण, अधिक्रमण आणि पिधान असे साधारण तीन प्रकार आहेत. जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे साधारण सरळ रेषेत येतात, तेव्हा सूर्यग्रहण होते. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा अमावास्या ही तिथी असते. म्हणजेच सूर्यग्रहण हे अमावास्येलाच होते. पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची सावली पडते अशाच भागावरून सूर्यग्रहण दिसते. जशी सावली पुढे पुढे सरकत जाते तसे संबंधित भागांवर त्या त्या वेळी सूर्यग्रहण दिसते. खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती सूर्यग्रहण असे सूर्यग्रहणाचे प्रकार आहेत. सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी पाहणे हानीकारक असल्याने ग्रहणाचे चष्मे लावूनच किंवा सूर्यबिंबाचे आरसा वापरून प्रतिबिंबाचे भिंत किंवा पडद्यावर प्रक्षेपण करून पाहणे निर्धोक असते. सूर्यग्रहण अगर चंद्रग्रहण ज्या वर्षी असेल त्या वर्षीच्या पंचांगात त्यांची समग्र माहिती देण्याची पद्धत आहे. त्यात ग्रहणाचे स्पर्श, मध्य, मोक्ष यांचे ठिकठिकाणचे काल व सूर्यग्रहण असेल तर नकाशा देऊन त्यावर ते कुठे कुठे व किती दिवस दिसेल या गोष्टी दिलेल्या असतात.
ग्रहणाबाबत जगातील विविध धर्मात तसेच जातीजमातीत काही विशिष्ट समजुती चालत आल्याचे दिसते. सर्वसामान्यपणे चंद्राचे वा सूर्याचे ग्रहण सर्वत्र अशुभ, अरिष्ट तसेच आपत्ती, रोगराई, युद्धादींचे सूचक म्हणून मानले जाते आणि या अशुभाच्या परिहारार्थ विशिष्ट प्रकारचे कर्मकांड व विधिनिषेध बाळगले जातात. ग्रहण लवकर सुटून चंद्र वा सूर्याचे पूर्ववत बिंब दिसावे, म्हणून वेगवेगळे उपाय सर्वत्र अवलंबिले जातात. कुराणातही शेवटून दुस-या सुरेत ग्रहणाच्या अशुभ परिणामांचे व त्यांच्या परिहारार्थ करावयाच्या काही कर्मकांडांचे निर्देश आहेत.
 
खरे पाहता ग्रहण ही जरी खगोलशास्त्राच्या दृष्टीने अभ्यासाची / संशोधनाची घटना असली तरी मानवी जीवनात ग्रहण या शब्दाला नैराश्येची झालर आहे. ग्रहण म्हणजे अंधःकार. ग्रहण म्हणजे भीती. ग्रहण म्हणजे अनिश्चितता. थोडक्यात जे जे प्रतिकूल/ अनावश्यक ते ते ग्रहण या संज्ञेत अंतर्भूत होते. ग्रहणासारखी अनियमितपणे घडणारी घटना स्वाभाविकपणे माणसात भयगंड निर्माण करते. सूर्याला गिळायला कोणी दैत्य आला आहे असे अडाणी माणसांना वाटते. कारण सूर्य हा जीवनदायी ऊर्जेचा स्त्रोत आणि चराचर सृष्टीचा जीवनदाता असल्याने त्याच्यावरचे संकट म्हणजे आपल्यावरचे संकट असा तर्क लावल्याने मनावर भीतीचे सावट पसरते. परंतु अशा मनोधारणेचा त्याग करण्याची जरुरी आहे. अज्ञानरुपी अंधःकाराला ज्ञानरुपी प्रकाशाची वाट दाखवून गैरसमज, अंधश्रद्धा, अशास्त्रीय रुढी व परंपरा यांना जीवनातून त्याज्य करून नवीन विज्ञानाधारित दृष्टी अंगीकारली पाहिजे. ग्रहण ही काही काळ असणारी घटना. परंतु माणसाच्या जीवनात चिंतेने ग्रासलेल्या ग्रहणाला सकारात्मक व रचनात्मक विचारपूर्वक मनोधारणेने दूर केले पाहिजे. शास्त्रीय दृष्टिकोनाचा अंगीकार करून डोळसपणे विचार करण्याची वृत्ती राबविली पाहिजे. तरच अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम पूर्णत्वास जाईल.
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई
Powered By Sangraha 9.0