गुरुवार, दि. ११ /६ /२०२०
कोरोना पश्चात काळात भारतीय नागरिकांनी विशेषतः मध्यमवर्गीय नागरिकांनी आपला आर्थिक व्यवहार नेटका ठेवून बचत व त्याहीपुढे जाऊन त्या बचतीची गुंतवणूक कशी योग्य प्रकारे करता येईल या विषयावर विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण ज्याप्रमाणे कोरोना विषाणूच्या साथीने मानवाची जीवनशैली आमूलाग्र बदलणार आहे त्याप्रमाणेच त्याच्या आर्थिक व्यवहाराची दिशाही पूर्णपणे बदलणार आहे. प्रस्तुत लेखात या विषयाच्या अनुषंगाने एक अर्थशास्त्राची विद्यार्थी या नात्याने मी दिशा निर्देशन करण्याचा प्रयत्न करणार आहे.
उत्तम व्यवहाराद्वारे जोडलेले धन तसेच ठेवण्यात काय हशील आहे? ते वाढवायलाही हवे. वाढत्या गरजा, महागाई, अनिश्चितता आणि भविष्याचा विचार करता आपल्या धनात वृद्धी होणे ही खरोखरच गरजेची गोष्ट आहे. त्यासाठी वेगवेगळे पर्यायही उपलब्ध आहेत. आपल्याला जमेल तसे जमतील तितके पैसे गुंतवलेच पाहिजेत. बचत केलीच पाहिजे. रसाळ व मधूर फळांनी बाग अस्तित्वात येण्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्यासाठी योग्य नियोजन, चांगली रोपे, मशागत आणि निगराणी अशा अनेक गोष्टींची गरज असते. मेहनतीबरोबरीने चांगल्या हवामानाचीही साथ लागते. गुंतवणुकीचे थोडेसे असेच असते. अपेक्षित लाभ मिळवण्यासाठी आर्थिक नियोजन आणि त्याप्रमाणे शिस्तशीर कार्यवाही यांची नितांत आवश्यकता असते. योग्य त-हेने गुंतवणूक केल्यास हाती असलेल्या शिलकी रकमेतूनही आपल्याला हवी तशी रक्कम जमवता येणे शक्य होऊ शकते. त्यासाठी गरजेचे आहे ते नियमितपणे (म्हणजे उदा. दर महिन्याला) आणि लवकर गुंतवणुकीला सुरवात करणे. लहान रक्कम दीर्घकाळ नियमितपणे गुंतवल्यास फायदा निश्चित होतो.
कोरोनाच्या साथीमुळे झालेल्या टाळेबंदीने सर्वत्र आर्थिक पेच निर्माण झाला आहे. या काळात विभागून गुंतवणूक करण्यास (Diversification of Investment) अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण एखाद्या गुंतवणूक पर्यायात मिळालेला परतावा हा तत्क्षणी फायद्याचा वाटत असला तरी त्याचा उपयोग किती होतो हेही पाहणे अत्यावश्यक आहे. पण कोणत्याही एका प्रकारात केलेली गुंतवणूक ही सर्वोत्तम गुंतवणूक आहे असे म्हणता येणार नाही. कारण प्रत्येक गुंतवणुकीला काही मर्यादा आहेत. म्हणूनच विभागून गुंतवणूक केल्यास आपल्याला गुंतवणुकीत समतोल राखता येणार आहे.
आता पुढचा प्रश्न डोळ्यासमोर येतो तो म्हणजे गुंतवणूक कशात करावी? महागाईच्या दरापेक्षा अधिक दराने परतावा हवा असेल तर पारंपरिक गुंतवणुकीच्या साधनात करून लाभदायी ठरणार नाही. बँकेचे व्याजदर कमी झाले आहेत. पोस्टातील योजनांचे दर त्यामानाने चढे आहेत. तरीही सुरक्षित गुंतवणुकीवर ८% पेक्षा अधिक व्याजदर मिळू शकत नाही. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, एस आय पी यासारखेही पर्याय सध्याच्या काळात फार काही मोठा परतावा देत आहेत असे चित्र नाही. सध्याच्या काळात या पर्यायांचा गुंतवणुकीसाठी वापर करणे जोखमीचे आहे. तसेच न करणेही जोखमीचे आहे. शेअर बाजारात घसरण झाल्याने ज्याला शक्य आहे व आर्थिक क्षमता आहे व जास्त काळ थांबण्याची तयारी आहे त्याने धोका पत्करण्याची तयारी ठेवून या काळात पैसा गुंतवावा. किमान ३ वर्षे गुंतवणूक कायम ठेवावी. कारण खाली गेलेला बाजार वर यायला वेळ लागतो. आपले पैसे विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये विचारपूर्वक गुंतवले जाणे अत्यावश्यक आहे. म्हणजे एका गुंतवणुकीचे मूल्य कमी झाले किंवा फार परतावा त्यातून मिळाला नाही तरी त्यातून फार मोठे नुकसान होत नाही.
गेल्या वर्षभराचा विचार केला तर सोन्यातील गुंतवणुकीने आपल्याला ३०% परतावा दिला आहे. पण सध्या यात रोकड सुलभता आहे का? हा विचार सगळ्यांना पडू शकतो. कोरोनामुळे असलेल्या टाळेबंदीच्या काळात खिशात रोकड असणे गरजेचे आहे. नोटाबंदीनंतरच्या काळात ज्या वेगाने भारतीय अर्थकारणात डिजिटलायझेशन व्हायला लागले त्याच्या बरोबर उलटे चित्र गेल्या अडीच- तीन महिन्यांत दिसू लागले आहे. परत सर्वत्र रोखीला प्राधान्य देऊन व्यवहार रोखीने होताना दिसू लागले आहेत. कारण ज्याच्याकडे रोकड तोच सध्याची दैनंदिन गरज पूर्ण करू शकतो. सामान्य परिस्थितीत सोने- चांदी यासारख्या मौल्यवान धातूंमधील गुंतवणूक रोकड सुलभतेसाठी वापरता येते. वैयक्तिक अडचणीच्या काळात सोने- चांदी गहाण ठेवून कर्ज मिळवता येते. कोरोनासारख्या अपवादात्मक स्थितीमुळे सोन्याने सर्वाधिक परतावा दिला असतानाही त्याचा थेट रोकड म्हणून वापर करता येत नाही. म्हणून सोन्यात गुंतवणूक करायची नाही असेही नाही.
कोरोना पश्चात काळात उत्पन्नाचा स्त्रोतही अनिश्चित झाल्याने जरी गृहकर्जाचा दर कमी झाला असला तरी गृहकर्ज घेऊन नवीन घर विकत घेऊन त्यात गुंतवणूक करणे फारसे फायद्याचे ठरेल असे सध्यातरी वाटत नाही. कारण त्यातून मिळणारे घरभाडे व गृहकर्जावरील व्याज व इतर छोटे मोठे खर्च विचारात घेता गुंतवणुकीसाठी नवीन घर घेणे हे सध्यातरी फार फायद्याचे ठरेल असे वाटत नाही. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पी पी एफ हा गुंतवणुकीचा सार्वभौमत्व असलेला गुंतवणूक पर्याय नक्कीच आहे. पण त्यातील रोकड सुलभता फारच मर्यादित आहे. किंबहुना याचा उद्देशच दीर्घकालीन भविष्यासाठी आहे. आणि म्हणूनच यात गुंतवणूक करणेही तितकेच गरजेचे आहे. पण हे करताना गुंतवणूक विभागून करण्याचे भानही बाळगणे गरजेचे आहे.
थोडक्यात सांगायचे तर गुंतवणुकीची सूत्रे ही व्यक्तिसापेक्ष असतात. जशी प्रत्येकाची गरज बदलते तसे गुंतवणुकीचे पर्यायही. परंतु ढोबळमानाने विचार करता कोरोना पश्चात काळात अर्थव्यवस्थेची चाके नीट रुळावर येईस्तोवर गुंतवणूक करताना मिळणारा मोबदला याचाच फक्त विचार न करता त्यासोबत मिळणारी रोखीची तरलता याचाही दक्षतेने विचार करावा लागणार आहे. तसेच आपल्याकडे येणा-या पैशाचे नियोजन दीर्घकालीन, अंशकालीन याप्रकारेसुद्धा करणे गरजेचे आहे. एखादा गुंतवणूक क्षेत्रातील दलाल सांगतो म्हणून त्या निकषांच्या आधारावर गुंतवणूक करण्यापेक्षा भविष्यातील स्वतःच्या खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवून परिस्थितीचे अवलोकन करून त्यानुसार तज्ज्ञांनी दिलेले ज्ञान सूचना म्हणून नाही तर मार्गदर्शक तत्त्वे म्हणून वापरून आपल्याला योग्य अशा गुंतवणुकीच्या विभाजनाचा (Diversification of Investment) आराखडा बनवणे हेच सर्वात हिताचे आहे. आणि त्यासाठी त्वरित रोकड सुलभता, सुरक्षितता, स्पर्धात्मक व्याजदर व मुद्दलाची वाढ याप्रमाणे निकषांचा प्राधान्यक्रम लक्षात घेतला पाहिजे. कोणतीही गुंतवणूक ही सध्याच्या काळात जोखिमविरहित नाही. रोकड सुलभता व परताव्याचा दर यामध्ये समतोल साधणे गरजेचे आहे. कोणतीही गुंतवणूक ही जोखीमसहीतच असणार आहे. म्हणून गुंतवणूक करायचीच नाही हे शहाणपणाचे नाही. म्हणूनच विभागून केलेली गुंतवणूक हेच यशस्वी गुंतवणूकदार होण्याचे रहस्य आहे हे नक्की!म्हणूनच मंडळी, गुंतवणूक डोळसपणे विचारपूर्वक करा. सुरक्षित वावर वाढवा व कोरोनाला हरवा!
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई