बुधवार, दि १०/ ६/ २०२०
दुपारच्या वेळेत व्हाॅटस् अॅपवरील संदेशांचे वाचन करीत असताना एक अनोखा संदेश वाचनात आला. 'वर्क फ्राॅम होम'चे जबरदस्त उदाहरण होते ते. टाळेबंदीमुळे सर्वच ठिकाणच्या पौरोहित्याचे काम करणा-या सर्वच पुरोहितांवर- गुरुजींवर उपासमारीची वेळ आली आहे. देवळे बंद, लग्नसमारंभ स्थगित, मोठे धार्मिक कार्यक्रम गर्दी टाळण्यासाठी बंद, इतर घरगुती पूजा- शांती कार्यक्रमांना बाहेरील व्यक्ती घरात नको म्हणून कामालाही कोणी बोलावत नाही. अहो, इतकेच काय, अंत्यविधी वेळचे अंत्यसंस्कार करण्यासाठीसुद्धा बंदी? त्यामुळे सर्वच पुरोहितवर्ग गेल्या अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळ घरीच बसून आहे व त्यामुळे प्रचंड आर्थिक संकटाला हा वर्ग सामोरा जात आहे.
आपल्या हिंदू धर्मातील पूजाअर्चा, शांती इत्यादी कार्ये, जपजाप्य व सोळा संस्कार करण्यासाठी म्हणजेच विधी कसा करायचा याचे मार्गदर्शन करण्यासाठी पुरोहितांची गरज लागते. वेद- पुराण यांच्यात दिलेल्या मंत्रोच्चाराने सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते व वास्तू पवित्र होऊन मनाला अनोखी प्रसन्नता लाभते. कोणतीही पूजा किंवा धार्मिक विधी करत असताना संस्कृत श्लोकाचे पठण करून त्याचा अर्थ सांगणे पौरोहित्य करणा-या गुरुजींकडून अपेक्षित असते. त्यांचे कार्य महत्त्वाचे असूनही दुर्दैवाने समाजामध्ये पौरोहित्य करणा-या गुरुजींना आदर- सत्कार व प्रतिष्ठा मिळत नाही. वयाच्या ८ व्या वर्षी उपनयन संस्कार पार पडला की या व्यवसायाचे शिक्षण घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना संस्कृत वेदपाठ शाळेत पाठवले जाऊन गुरुकुल पद्धतीने त्यांचे शिक्षण सुरू होते. सर्वसाधारणतः पाच ते सात वर्षांत विद्यार्थ्याच्या बौद्धिक कुवतीनुसार त्याचे याज्ञिकीचे शिक्षण पूर्ण होते. म्हणजेच दैनंदिन जीवनात आवश्यक असणारी धार्मिक कृत्ये करण्यात विद्यार्थी प्रवीण होतो. हे शिक्षण चालू असतानाच बरोबरीने त्याचे पारंपरिक अभ्यासाचे शाळेतील शिक्षणही चालूच असते. साधारणतः या वेद- पाठ शाळांतून प्रवेश, शिक्षण व राहण्या- खाण्याचा खर्च हा धनिकांच्या देणग्यांवर चालत असतो. धार्मिक कृत्ये करण्याचे याज्ञिकीचे शिक्षण झाल्यानंतर पुणे किंवा तिरुपती येथे त्यांची मौखिक परीक्षा घेऊन त्यांना पदवी प्रदान करण्यात येते. मंत्र मुखोद्गत होऊन त्याची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्या पारंगत अनुभवी पुरोहिताकडे या विद्यार्थ्याचे तंत्राचे म्हणजेच आजच्या भाषेत ऑन फिल्ड शिक्षण सुरू होते व यथाकाल हे विद्यार्थी पौरोहित्य करण्यात तरबेज होतात. त्याचप्रमाणे पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी ही संस्थादेखील स्त्री-पुरुष भेदभाव न करता संस्कारांचा अर्थ समजून घ्यावा, नवशिक्षितांना संस्कारातील उदात्त आशय कळावा या हेतूने आधुनिक काळाला योग्य असे महत्त्वाचे पण कर्मकांडाला वजा करून सुटसुटीत रूपात विधी करता यावेत या हेतूने 'धर्मनिर्णय मंडळ, लोणावळा' यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने विविध मंत्र व अर्थयुक्त पोथ्यांची निर्मिती करत असते. सन १९८० सालापासून ज्ञानप्रबोधिनी या संस्थेत धार्मिक संस्काराच्या माध्यमातून समाजात डोळस सद्भावना, ईश्वरनिष्ठा, ऐक्यभावना इ. गुणांचे बीजारोपण करणारा पुरोहितवर्ग निर्माण होऊन मंत्रांचे, श्लोकांचे अर्थ उपस्थितांना समजावून देत विधी करणारे पुरोहित तयार व्हावेत या उद्देशाने पौरोहित्य प्रशिक्षणाचे वर्ग घेतले जातात. धर्मसंस्कार करण्याची ज्ञानप्रबोधिनीची पद्धत पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळी असून संस्थेच्या पोथ्यांच्या आधारेच संस्कारविधी शिकवले जातात.
अशा या हातावर पोट असणा-या पुरोहित वर्गावर कोरोनाच्या टाळेबंदीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. कोणत्याही साहाय्य करणा-या संस्थेकडून यांना आर्थिक मदत मिळत नाही वा कोणत्याही सरकारी सवलती वा आर्थिक पॅकेज या पुरोहितांना कोणी देऊ करत नाही. साथीच्या संक्रमणाबाबतीत कोणतेच भविष्य वर्तवता येत नसल्याने पुरोहितांचा व्यवसाय परत कधी चालू होईल? यजमानांकडून परत कधी धार्मिक कार्यासाठी आमंत्रण येईल? या बाबतीत अनिश्चितताच आहे. उपलब्ध गंगाजळी किती दिवस पुरणार? स्वतःच्या संसाराचे, मुलाबाळांच्या शिक्षणाचे, आरोग्याचे खर्च आ वासून उभे आहेतच. यावर उपाय म्हणून मुंबईतील काही तंत्रज्ञानाशीसुद्धा जवळीक असणा-या गुरुजींनी एक १५ गुरुजींचा समूह करून आपापल्या घरात बसून सहस्रावर्तन, लघुरुद्र, पवमान सूक्ताचे मंत्रोच्चारण, श्री सूक्ताचे पुनर्पठण, सप्तशती पाठ द्वारा नवचंडी इत्यादी धार्मिक सूक्तांचे अनुष्ठान आयोजित केले होते. दिनांक ३१ मे पासून दिनांक ६ जूनपर्यंत ७ दिवस हे धार्मिक अनुष्ठान चालले. त्याकरता व्हाॅटस् अॅपच्या माध्यमातून अनेक यजमानांना देणगीचे आवाहन करण्यात आले होते. प्रत्येक यजमानाच्या नावाचा- गोत्राचा संकल्पात उल्लेख करून त्याच्या कुटुंबियांच्या व अखिल विश्वाच्या कल्याणासाठी ईश्वराजवळ प्रार्थना करण्यात आली. सातही दिवस चालणा-या मंत्रांचे पठण ऑडिओ क्लिपमार्फत यजमानांपर्यंत पोहोचविण्यात आले. यातून श्रद्धाळू भक्तांमार्फत पूजापाठादी धार्मिक कार्य संपन्न झाले व पुरोहितांना दक्षिणाही मिळाली व त्यामुळे काही प्रमाणात आर्थिक भार उचलला गेला. कोणतीही संस्था येऊन आपल्याला मदत करेल वा सरकार, स्थानिक प्रशासनाच्या मदतीची प्रतीक्षा न करता परत एकदा स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर या गुरुजींनी 'वर्क फ्राॅम होम'चा नवा आदर्श घालून दिला. इच्छा असेल तर त्याचे फळ मधुरच असते हे यातून पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे.
कोणत्याही संकटामुळे डगमगून न जाता त्यातून संधी शोधून अडचणींवर मात कशी करता येईल? याचा एक वस्तुपाठच त्या गुरुजींनी घालून दिला आहे. टाळेबंदीचे सर्व नियम पाळून उपलब्ध संसाधनांच्या मदतीने केवळ स्वतःचे कौशल्य वापरून रडत न बसता आर्थिक संकटातून वाट काढण्याचा प्रयत्न करताना एक आगळी वेगळी पायवाट निर्माण केली आहे. अशा या सर्व पुरोहितवर्गाला मानाचे वंदन! चला तर मंडळी, आपणही सकारात्मक विचार करू या! सुरक्षित वावर वाढवू या! कोरोनाला हद्दपार करू या!!
....डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई