अती तिथे माती!

Source :    Date :27-May-2020   
|
बुधवार, दि. २७/५/२०२०
 
संचारबंदीच्या काळात भरपूरच फावला वेळ उपलब्ध असल्याने माझ्यासकट बहुतांश जनतेचा मोबाईल, संगणक, दूरचित्रवाणी या सर्वच उपकरणांबरोबर घालवलेला वेळ वाढलेला आहे. म्हणजेच प्रत्येकाचा आजच्या भाषेत 'स्क्रीन टाईम' वाढलेला आहे. प्रत्यक्ष दूरचित्रवाणीवर चित्रपट, मालिका इत्यादी करमणुकीच्या कार्यक्रमांपेक्षा भारतीय जनता मोबाईल किंवा संगणकावर निरनिराळ्या समाज माध्यमांवर वेळ घालवणे पसंत करते. ज्यावेळी प्रसार माध्यमांवर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते किंवा गळचेपी होते आहे असे लक्षात येते, तेव्हा नागरिक व्यक्त होण्यासाठी समाज माध्यमांचा वापर करतात असे दिसून येते. आज या कोरोनाच्या संकटकाळात दुर्दैवाने समाज माध्यमांचा उपयोग कित्येक वेळा करमणुकीसाठी बेतालपणे असंयमित रितीने केला जातोय. ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे.
 

social Media_1   
 
आज खूप वेळा आपण पाहतो की कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांना रुग्णालयात नेताना रुग्णालयातील रुग्णांच्या वाॅर्डमधून, बाजारात झालेली गर्दी व तत्सम दृष्यांचे चित्रीकरण करून ते प्रसारित केले जाते. वास्तविक पाहता अशा बेजबाबदार वर्तनाने नागरिकांत भीतीचे वातावरण तयार होते व नागरिकांचा संयम सुटू लागतो. काही स्वतःला बुद्धिवंत समजणारे महाभाग केवळ सदैव सरकारी धोरणांमधील दोष व त्रुटी काढून त्यावर समाज माध्यमांद्वारे टीका-टिप्पणी करण्यातच धन्यता मानतात. तर दुसरीकडे संख्याशास्त्रज्ञ केवळ आकड्यांचा खेळ करीत भविष्यातील रुग्णांची भलीमोठी संख्या दर्शवून नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. ज्यावेळेला कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेऊन घरी येतो त्यावेळच्या त्याच्या स्वागताचे व्हिडिओ जेव्हा आपण प्रसारित करतो तेव्हा जनतेवर काय परिणाम होतो? याचा कोणी काही विचारच करत नाही. असे देखावे पाहून कोरोनाग्रस्त रुग्ण बरा होतो म्हणजे मृत्यूच्या कठीण दाढेतून बाहेर पडणे हे अधोरेखित होते. ही भावना समाजमनात खोलवर रुतून बसते. नेहमी दृष्याचा परिणाम हजार शब्दांपेक्षा अधिक असतो. मग ती सामान्य घटना होत नाही. ९५% रुग्ण सामान्यपणे बरे होऊ शकतात हे वैज्ञानिक सत्य मागे पडते आणि कोरोना रोगाविषयी जनतेच्या मनात भीतीचे भयंकर तांडव रुंजी घालू लागते.
 
इंटरनेटवर आधारित जी माध्यमे आहेत त्यांच्यासाठी 'सोशल मिडिया' किंवा 'समाज माध्यमे' हा शब्दप्रयोग केला जातो. फेसबुक, ट्विटर, यु-ट्यूब, इन्स्टाग्राम, व्हाटस् अॅप अशा अनेक माध्यमांचा समाज माध्यमांमध्ये अंतर्भाव होतो. या माध्यमात खरंच किती सामाजिकता आहे, की हे आभासी जग आहे, हा एक गहन प्रश्न आहे. जसजसा समाज विकसित होत गेला तसतशी समाज माध्यमांची साधने विकसित होत गेली. २१व्या शतकातील आजचा समाज माहितीप्रधान समाज म्हणता येईल. कारण माहितीला प्राप्त झालेले अनन्यसाधारण महत्त्व. आणि ही माहिती समाज माध्यमांमार्फत कोणताही अंकुश न ठेवता जनतेपर्यंत सहजपणे पोहचवता येते. आणि त्यातच समाज माध्यमांचे सामर्थ्य दडलेले आहे.
 
वास्तविक पाहता समाज माध्यमे म्हणजे दुधारी शस्त्र! ते तुम्ही कसे वापरता, काय वाचता, काय पाहता यातून आपली प्रतिमा आणि नेतृत्व तयार होत असते. त्यामुळे त्याचा वापर सावध आणि सजगरित्या करायला पाहिजे. समाज माध्यम हीदेखील अफूची गोळी आहे. त्याचे चांगले- वाईट परिणाम आहेत. त्यांचा वापर कसा करायचा हे आपल्या हातात असते. समाज माध्यमांवर माहिती आणि विचारांचे आदानप्रदान विलक्षण असते. येथे जनतेच्या प्रतिसादाला मर्यादा नाहीत. आणि त्यामुळेच समाज माध्यमांचा वापर योग्य आणि नियंत्रितपणे केला गेला पाहिजे. घडलेल्या घटनांची पूर्णपणे शहानिशा करून त्यातील सत्यअसत्याला जाणून घेऊन मगच समाज माध्यमांवर संदेश संप्रेषित केले पाहिजेत व व्हाॅटस् अॅपवरून व्हिडिओ प्रसारित केले पाहिजेत. समाज माध्यम हे एक विज्ञान आहे. ज्याचा अभ्यास करून वापर करण्याची गरज आहे.
 
मात्र दुर्दैवाने आपल्याकडे 'अती तिथे माती' अशी परिस्थिती सध्या आपल्या समाज माध्यमांबद्दल दिसत आहे. खोट्या माहितीचे प्रसारण, खाजगीकरणाचा अभाव किंवा भंग, निरनिराळ्या साॅफ्टवेअरचा वापर करून माहितीत छेडछाड करून भ्रम व खोटी माहिती पसरवणे की ज्यायोगे सामाजिक शांतता भंग पावेल, एकांगी विचार पसरवणे, सनसनाटीपणा, बटबटीतपणा असलेला आशय समाज माध्यमांवर पसरविणे या गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. वास्तविक पाहता या कोरोना विषाणूच्या वैश्विक साथीच्या काळी समाज माध्यमांचा उपयोग अतिशय जबाबदारीने नियंत्रितपणे करणे अगत्याचे आहे. सकारात्मक रचनात्मक दृष्टिकोन व समाज भावना पसरवण्यासाठी याचा उपयोग होणे अत्यावश्यक आहे. समाज माध्यमांचा सक्रियतेने वापर करणा-या व्यक्तींनी समाजाच्या हितासाठी या माध्यमाचा जरूर वापर करावा. अन्यथा अशा माध्यमांवर बंदी घालण्याशिवाय शासनाला पर्याय राहणार नाही.
 
तेव्हा मंडळी, वेळीच सावध होऊ या! समाज माध्यमांचा ऊपयोग अधिक सजगतेने करू या! लोकांचे मनोधैर्य वाढवू या! स्वतःला व समाज पुरुषालाही सुरक्षित करू या!!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई