रुग्णवाहिका, नव्हे जीवनदायिनी!

Source :    Date :26-May-2020   
|
मंगळवार, दि.२६/ ५/ २०२०
 
टाळेबंदीच्या काळात दुपारच्या वेळात डिजिटल वृत्तपत्र वाचत असताना मुंबईमध्ये शासकीय व्यवस्थेमार्फत उपलब्ध होणा-या रुग्णवाहिकांचा तुटवडा असल्याचे वाचनात आले. कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सरकारी रुग्णवाहिकांवरील ताण वाढला आहे व त्यामुळे आधीच तुटपुंज्या असलेल्या शासकीय रुग्णवाहिकांसाठी रुग्णांना दहा दहा तास वाट बघत ताटकळत बसावे लागत आहे. आणि त्यामुळे खाजगी रुग्णवाहिकांचे फावले आहे. मनाला येईल तसे दर खाजगी रुग्णवाहिकांकडून आकारले जात असून त्यामुळे जनतेची लुबाडणूक चालू आहे. अडलेला गरजू रुग्ण व त्याचे असहाय नातेवाईक यांची संकटाच्या काळातील लुबाडणूक निश्चितच निषेधार्ह आहे.
 

Ambulance_1  H  
 
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारी आणि पालिकेची रुग्णवाहिका सेवा संपूर्ण दिवस व्यस्त असते. रुग्णांना अनेक तास वाट बघूनही सरकारी रुग्णवाहिका मिळत नाहीत. त्यामुळे खाजगी रुग्णवाहिकांचा आधार घ्यावा लागतो आहे. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हे आजारामुळे प्रचंड ताणतणावाखाली असतात. या परिस्थितीचा फायदा उठवत ही लूट सुरू असून त्यांच्यावर पालिका किंवा सरकारी यंत्रणेचे नियंत्रण नाही. परंतु कोरोनाच्या काळात रुग्णवाहिकेचा चालक व रुग्णाला उचलणारे कर्मचारी यांनी आपल्या जीवाला धोका असल्याने दर दुप्पट केले आहेत. तसेच प्रत्येक फेरीनंतर रुग्णवाहिकेचे निर्जंतुकीकरण करावे लागत असल्याने व कर्मचा-यांना वैयक्तिक सुरक्षा कवच उपलब्ध करून द्यायला लागत असल्याने जादा पैसे आकारले जात असल्याचे रुग्णवाहिका पुरवण्या-या संस्थांकडून सांगण्यात येते.
 
वास्तविक पाहता रुग्णाला एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी वाहून नेणा-या वाहनाला रूग्णवाहिका म्हणतात. प्रथम घोडागाडी, नंतर मोटारगाडी व त्यानंतर हेलिकाॅप्टर व विमानांचाही समावेश या साधनात झाला. अधिकाधिक उपयोग मोटारगाड्यांचा होत असतो. सर्वसाधारणतः १८७०-७१ पासून घोडा- रुग्णवाहिका व पुढे दुस-या महायुद्धाच्या काळात मोटारगाडीची रुग्णवाहिका व त्याहीपुढे हेलिकाॅप्टरला बाहेरील बाजूस बांधलेली रुग्णडोली असे रुग्णवाहिका वापरातील प्रगतीचे टप्पे गाठले गेले. रुग्णवाहिका सेवा अधिक उपयुक्त होण्याकरता त्यात सतत सुधारणा होत गेल्या, जसे की वातानुकूलन यंत्रणा, वैद्यकीय उपकरणे, प्राणवायू पुरवठा, संदेशवहनाद्वारे संपर्क इत्यादी. रुग्णवाहिका वापरल्यानंतर ती आतून व बाहेरून स्वच्छ करणे आणि तिच्यातील उपकरणांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असते. रुग्णवाहिकेबरोबर असणारे कर्मचारी काळजीपूर्वक निवडलेले असावेत. त्यांना प्रथमोपचाराचे सखोल ज्ञान असणे अपेक्षित असते. या कर्मचा-यांत दयाळूपणा, सभ्यता व सेवाभाव हे गुण असण्याबरोबरच त्यांची शरीरप्रकृती उत्तम असणे आवश्यक असून ते शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे असते.
 
दुर्दैवाने आज मुंबईत कोरोना विषाणू संसर्गाचा धसका रुग्णवाहिका चालकांनी घेतला आहे. बहुतांश चालकांनी रुग्णवाहिका बंदच ठेवल्या आहेत. अत्यावश्यक सेवेमधील ३००० पैकी फक्त ४०० रुग्णवाहिका रस्त्यावर असल्याचे वृत्तपत्रातील बातमीतून समजते. मागणी जास्त व रुग्णवाहिकांच्या सेवेचा पुरवठा कमी असल्याने त्यांचे दर चढले असून त्याचा फटका अनेक रुग्णांना बसून रुग्णांची फरफट सुरू असून कधीकधी त्यांचे रुग्णवाहिकेअभावी रुग्णालयात न पोचल्याने दुर्दैवी मृत्यू होत आहेत. आपल्या भारतात खरे पाहता 'गोल्डन अवर थिअरी' वर आधारित तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून पहिल्याच तासात सर्वात जवळच्या रुग्णालयात दाखल केले जाईल व ही सेवा ३६५ दिवस २४×७ उपलब्ध असेल अशी सरकारी योजना असतानासुद्धा आज रुग्णवाहिकांची वानवा आहे.
 
कोरोना विषाणूच्या वैश्विक साथीच्या काळी आज या रुग्णवाहिकांचे महत्त्व केवळ रुग्ण वाहून नेण्याचे वाहन एव्हढेच मर्यादित राहिले नसून त्या खरोखर जीवनदायिनी ठरल्या आहेत. म्हणून सर्व संस्था ज्या रुग्णवाहिका पुरवण्याचे पवित्र काम करतात त्यांना आवाहन आहे की तुमच्या रुग्णवाहिका बंद ठेवू नका. त्यांची सेवा पूर्ववत करा! रुग्णांकडून योग्य तो मोबदला घ्या! त्यांचे शोषण करू नका! आज रुग्णवाहिकांचे कोरोना विरुद्धच्या युद्धामध्ये कोरोना योद्धा म्हणून अनमोल योगदान आहे. तुम्ही जीवन देणारे आहात, जीव घेणारे नाहीत! तुमच्या कर्तव्याला जागा! आज तुमच्या सेवेची नितांत आवश्यकता आहे. सुरक्षित रहा, पण सेवा कर्तव्यास तत्पर व्हा!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई