सोमवार, दि.२५/ ५/ २०२०
संचारबंदीच्या काळात दूरदर्शन बघत असताना विविध वाहिन्यांवरच्या उलटसुलट अतितीव्र संवेदनशील शब्द वापरून दाखवलेल्या चित्रफिती, बातम्या हृदयाचा ठोका चुकवतात. त्याचप्रमाणे विविध वृत्तपत्रेसुद्धा त्यांची विवक्षित राजकीय पक्षाशी असलेली निष्ठा व अर्थपूर्ण संबंध लक्षात घेऊन त्याच एका पक्षाची तळी उचलताना दिसतात. ही सर्व प्रसार माध्यमांची बेजबाबदार वर्तने पाहून टिळक, आगरकर, प्र. के. अत्रे यासारख्या धुरीणांनी घालून दिलेल्या आदर्शांची पायमल्ली होताना दिसते व त्यामुळे मन अतिशय व्यथित होते.
विद्यमान काळात सेवाभाव व नफेखोरी या दोन क्षेत्रांचा संघर्ष जास्त तीव्रतेने जाणवतो तो माध्यमांच्या बाबतीत. आजचे जग अधिक मुक्त व उदार झाले आहे. इंटरनेटच्या मदतीमुळे माहितीचा प्रचार तातडीने होत आहे. त्याची व्यापकता आजच्या इतकी कधीच नव्हती. सारे जग एकत्र झाले आहे आणि कोणीही पत्रकार म्हणून माहिती देऊ शकतो. आज केवळ भारतात ८०० पेक्षा जास्त वाहिन्या आहेत. विविध भाषांतील, प्रांतातील वृत्तपत्रे वेगळीच आहेत. आजच्या नव्या व्यवस्थेत भारतीय माध्यमे, खास करून इलेक्ट्राॅनिक माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. गेल्या काही वर्षांपासून दूरचित्रवाणीवरील बातम्यांमध्ये नि:पक्षपातीपणा आणि नैसर्गिकता यांचा अभाव होत असल्याचे दिसून येते. आदर्श पद्धतीने बातम्या देणे कंटाळवाणे आणि कमी प्रतीचे मानले जाऊ लागले असून निरुत्साहीपणाचे मानले जात आहे. पत्रकारितेच्या नीतीमूल्यांचा बळी टीआरपी मिळवण्याच्या स्पर्धेमुळे दिला जात असल्याचे जाणवू लागले आहे. 'बातमी देण्यात आम्हीच पहिले' यालाच अवास्तव महत्त्व दिल्याने गतिमानता हाच आजच्या पत्रकारितेचा नवा मंत्र झाला आहे. त्यामुळे घटनांची पडताळणी व फेरपडताळणी करणे, हा शिरस्ता मागे पडला आहे. प्रत्येक क्षणी घडलेल्या घटनेच्या नव्या बातम्या दिल्या जात आहेत. त्यातही विसंगती दिसत आहेत. ज्या बातम्यांमुळे लोकांचे लक्ष वेधले जाईल अशा बातम्या देण्याची लगबग सुरू झाली आहे. ही लगबग इतकी टोकाला जाऊ लागली आहे की कधीकधी त्यातून सत्य किंवा घटना दूर राहते आणि नवीनच काहीतरी पुढे येत असते. कित्येक वेळा विचार स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांची गळचेपी केलेली पण दिसून येते. सरकारची मते अत्यंत पवित्र असल्यासारखी मानली जात आहेत. त्यामुळे वातावरणात एक प्रकारची भीती सतत भरून राहिल्याचे जाणवते आहे. विचारस्वातंत्र्याच्या विरोधातील गुप्त शक्ती कार्यरत होतात, ज्या लोकशाही मूल्यांच्या विरोधातील असतात. त्यामुळेही कित्येकदा माध्यमे बोटचेपे धोरण अंगिकारतात.
वास्तविक पाहता भारतीय स्वातंत्र्योत्तर काळानंतर भारतीय संविधानाने प्रदान केलेल्या हक्कांमुळे विशेषतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लाभामुळे एक नवी जीवनदृष्टी लाभून भारतीय प्रसार माध्यमांनी आपले स्थान निर्विवाद निर्माण केले. प्रसार माध्यमे ही प्रतिमा निर्मिती व विचार परिवर्तनाची आणि नवी नवी माहिती प्रसारणाची महत्त्वाची साधने असतात. विविध क्षेत्रात प्रसार माध्यमांनी विकासाला पोषक वातावरण निर्माण करून संस्थात्मक जीवनातील बदल घडवून आणणे व सामाजिक बांधिलकीची भावना रुजू करण्याचे काम त्यांच्याकडून अपेक्षित असते. विकसनशील राष्ट्रांमध्ये नवीन जीवनमूल्ये रुजवण्याचे काम प्रसार माध्यमांकडून अपेक्षित असते. पण आज दुर्दैवाने प्रसार माध्यमांचे भांडवलीकरण झाल्याने जनतेच्या हिताचे काही देणे घेणे राहिलेले नाही. प्रसार माध्यमाचा मूळ हेतू प्रबोधन हा आता राहिला नसून पैसे कमावण्याचे साधन झालेला आहे.
दुर्दैवाने आज संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संकटात ग्रासले गेले असताना प्रसार माध्यमांकडून जबाबदारीने माहिती प्रसारित केल्याचे दिसत नाही. त्यामुळे जनतेत प्रचंड घबराट होऊन संभ्रम वाढल्याने त्यांचा संयम सुटू लागला आहे. वास्तविक पाहता संकटकाळात जनतेला विश्वास देण्याचे, जनतेचे मनोधैर्य वाढवण्याचे काम प्रसार माध्यमांनी करणे अभिप्रेत होते की जेणेकरून प्रबोधनामुळे सर्व जनता एकजूट करून या संकटाचा सामना करेल! पण दुर्दैवाने असे झाले नाही.
आता तरी माध्यमांनो, जनतेच्या प्रबोधनाची भूमिका घ्या! जनतेला घाबरवू नका! त्यांना आश्वस्त करा! जनतेला घरात राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन करा!
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई