शुक्रवार, दि. २२ /५/ २०२०
संचारबंदीच्या काळात दुपारच्या वेळात 'यू- ट्यूब'च्या माध्यमातून शिक्षणविषयक परिसंवाद ऐकत असताना कोरोनापश्चात काळात शाळा, महाविद्यालयांमध्ये ई-लर्निंगचे महत्त्व अधोरेखित केले जात होते व ई- माध्यमाद्वारेच भविष्यात शिक्षण संप्रेषण होऊ शकते, असा सूर लावला जात होता. कोरोना साथीमुळे सामाजिक अंतर राखणे अनिवार्य असल्याने शाळा, महाविद्यालयांमध्ये गर्दी जमू न देणे अत्यावश्यक असल्याने ई- माध्यमांचा वापर ही काळाची गरज आहे, असे वर्तविले जाते.
सर्वसाधारणतः मार्च महिन्याच्या तिस-या आठवड्यापासून शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आली व त्यानंतर साधारण एप्रिल महिन्यापासून काही ठिकाणी शिकवण्यासाठी किंवा परीक्षा घेण्यासाठी ई- माध्यमांचा सर्रास वापर होऊ लागला.
झूम मिटिंग, गो टू मिटिंग, सिस्को वेबेकस मीट, गुगल क्लासरुम, मायक्रोसाॅफ्ट मिटिंग, नमस्ते यासारख्या निरनिराळ्या अॅपच्या मदतीने शाळा, महाविद्यालयातील शिक्षण संप्रेषण सुरू झाले आहे. अर्थात पूर्ण भारताचा विचार केला असता याचे प्रमाण जरी नगण्य असले तरी याला भविष्यातील शिक्षण व्यवस्थेतील बदलाची नांदी म्हणून संबोधू शकतो. त्याचप्रमाणे
यू- ट्यूब, स्वयम्, दीक्षा पोर्टल, स्वयंप्रभा, ई- पाठशाला वगैरे वगैरे माध्यमांतून गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयास चालू आहे.
भारतीय शिक्षण पद्धतीचा विचार केल्यास वैदिक काळात आठव्या वर्षी मुलाचे किंवा मुलीचे उपनयन करून त्यांना गुरुगृही राहून गुरुकुल पद्धतीने अध्ययन पूर्ण करावे लागत असे. वैदिक शिक्षण पद्धतीत गुरूचे महत्त्व विशेष मानले आहे. गुरू हा शिष्याचा आध्यात्मिक पिता मानला गेला असल्याने आई व वडील यांच्यापेक्षा गुरूचे स्थान शिष्याच्या आयुष्यात महत्त्वाचे ठरत असे. तत्कालीन विद्यार्थी बरेचसे ग्रंथ पाठ करीत. लेखनकला अस्तित्वात आल्यानंतरही ही पद्धती सुरू असल्याचे दिसते. प्रत्येक विषयाचे केवळ पाठांतर होत नसून ते गुरूकडून समजावूनही घेतले जाई. प्रत्येक गुरूजवळ १५- २० विद्यार्थीच शिकत असल्याने त्यांना प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देता येत असे. दिलेला पाठ विद्यार्थ्याला समजला व तो कंठगत केल्याची गुरूला खात्री झाली म्हणजे मग त्यानंतर पुढील पाठ देण्यात येई.
त्यानंतर भारतीय इतिहासात शिक्षण आणि शिक्षण पद्धतीचा विकास मुख्यत्वेकरून ब्रिटीश राजवटीत झाला. ब्रिटिशांनी महाविद्यालये व विद्यापीठे स्थापन करून दर्जेदार शिक्षण पद्धती भारतात अस्तित्वात आणली. भारताच्या घटनेनुसार शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क मानल्याने प्राथमिक शिक्षणाचा सर्वत्र सर्वदूर प्रसार व प्रचार झाला व एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सरकारी, निमसरकारी, खाजगी सर्व प्रकारची विद्यालये सुरू झाली. कला, वाणिज्य, शास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि कृषी महाविद्यालयांची निर्मिती होऊन संशोधन संस्था पण स्थापन केल्या. पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षण वेगवेगळ्या संस्थांमधून दिले जाऊ लागले व शिक्षणाचा दर्जा राखण्यावर त्यांनी भर दिला.
उपरोक्त नमूद केलेल्या सर्व शिक्षण प्रणालीमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे गुरू- शिष्य, शिक्षक- विद्यार्थी संबंध! शिक्षक व विद्यार्थी हे दोन्ही शिक्षण प्रणालीचे अविभाज्य अंग आहेत. शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थी ज्ञान ग्रहण करतो व विद्यार्थ्यांच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधःकार शिक्षक ज्ञानरूपी प्रकाशाने दूर करून विद्यार्थ्यांचे जीवन प्रकाशमय बनवतो. कदाचित ज्ञानाच्या देवाणघेवाणीचे कार्य ई- माध्यमातून होणा-या वर्गांमधून शक्य होईल. पण शिक्षक केवळ विद्यार्थ्याला शिकवण्याचेच काम करत असतो असे नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीकडे पालकाच्या भूमिकेतून लक्ष ठेवून असतो. मराठी शाळांतून स्त्री- शिक्षकाला 'बाई' असे संबोधिले जाते. त्यात बापातला 'बा' आणि आईतला 'ई' यांचे एकत्र अस्तित्व एकवटलेले असते. त्याचप्रमाणे एका अहवालानुसार प्राप्त झालेल्या माहितीनुसार केवळ भारतात ८% विद्यार्थ्यांकडे अॅण्ड्राॅइड फोन आहेत की ज्याद्वारे ई- माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देता येईल. त्याचप्रमाणे इंटरनेटचा आजही भारतात सर्वत्र प्रसार झालेला नाही. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, सर्वसाधारणतः वयाच्या १३-१४ वर्षांपर्यंत मूल अशा प्रकारच्या माध्यमांवर स्वतःचे लक्ष जास्त वेळ केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे ई- माध्यमातून दिले जाणारे शिक्षण कितपत विद्यार्थ्यांमध्ये झिरपणार? हाही चिंतेचा विषय आहे.
जरी क्षणभर गृहीत धरले की विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची दृक्- श्राव्य संसाधने उपलब्ध करून दिली तरी शिक्षक- विद्यार्थी नात्याचे काय? शारीरिक उपस्थितीत जेव्हा वर्ग भरत असतात तेव्हा शिक्षक केवळ विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूकच भागवतो असे नाही, तर त्याला शिस्तीचे, सामाजिक जाणीवेचे, संवेदनांचे, संघभावना, जबाबदारीचे, एखाद्या गोष्टीच्या विभागणीचे, सहकार्याचे, सहवेदनेचे मूल्य शिक्षण देत असतो. शिक्षकाचे दर्शनसुद्धा विद्यार्थ्यांना बरेच काही सांगून जाते. विद्यार्थ्यांना शिक्षक हे त्यांचे दैवत असते व एकमेकांशी जवळीक साधण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक दोन्ही आसुसलेले असतात. दुःखाच्या, संकटाच्या काळात शिक्षकाचा पाठीवर पडलेला पाठिंब्याचा हात विद्यार्थ्याला लढण्याचे बळ देतो, तर विशेष कामगिरी केल्यावर पाठीवर पडलेली कौतुकाची थाप नवनवीन यश संपादन करण्यास प्रवृत्त करतो. चूक घडल्यावर शिक्षकांचे केवळ डोळे वटारणे वा छडीने दिलेला मार विद्यार्थ्याला चूक करण्यापासून परावृत्त करतो. स्वतःच्या रोजच्या जेवणाच्या डब्यापासून ते घरातल्या घडामोडींपर्यंत सर्वच वाटून घेण्यासाठी विद्यार्थ्याला शिक्षकाच्या असण्याची गरज असते. हे कसे ई- माध्यमातून- आभासी शिक्षणातून साध्य होणार? म्हणून आज जरी ई- माध्यमातून वर्ग भरत असले तरी तो तात्पुरता उपाय म्हणून ठीक आहे. हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे एकमेकांबरोबरीचे नाते असणे, यातच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे रहस्य दडलेले आहे. आणि त्यामुळे शिक्षक- विद्यार्थी परस्परपूरक संबंध अपरिहार्य आहेत.
म्हणून आज घरात रहा, सुरक्षित रहा... उद्या शाळेत रमण्यासाठी!
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई