पर्यटनाची ऐशी की तैशी!

21 May 2020 07:44:57
गुरुवार, दि. २१/५/२०२०
 
खरे पाहता मे २०२० च्या तिस-या आठवड्यात मी कुटुंबियांसमवेत माॅरिशसच्या दौ-यावर जाणार होते. पण माझी यावर्षीची परदेशवारी घडू द्यायची नाही, असे कोविड- १९ या विषाणूने पक्के ठरवले होते व त्याप्रमाणे माझा यावर्षीचा परदेश दौरा बारगळला. या दिवसांत जरी मी मनाने माॅरिशसमध्ये असले तरी शरीराने मात्र कोरोना विषाणूच्या साथीमुळे घरामध्ये कैद झाले आहे. माझ्यासारखेच जगभरातील अनेक इच्छुक पर्यटक आज आपापल्या घरात स्थानबद्ध झाल्याने पर्यटन क्षेत्राचेकंबरडेच मोडले आहे
.tourism_1  H x   tourism_1  H x           tourism_1  H x
 कोरोना प्रादुर्भावाचा सर्वात मोठा परिणाम पर्यटन क्षेत्रावर झाला आहे. जगभरात टाळेबंदी आहे. सर्वच देशांनी आपापल्या सीमा बंद करून टाकल्या आहेत. हवाई प्रवास बंद झाला आहे. त्यामुळे पर्यटन ठप्प आहे. टाळेबंदी संपल्यानंतरही पुढील किमान वर्षभर तरी जनता पर्यटन टाळेल, अशी शक्यता असल्याने या क्षेत्रातील लाखो लोकांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळण्याची शक्यता आहे. भारतातील ३.८ कोटी जनता पर्यटन आणि हाॅटेल क्षेत्रात काम करते. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. सरकारी अहवालानुसार अशी माहिती मिळते की पर्यटन क्षेत्राचे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठे योगदान असून भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या सर्वसाधारण ९.२% वाटा आहे. त्याचप्रमाणे भारतातील गोवा, काश्मिर, केरळ, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश यासारखी राज्ये की जेथे पर्यटन मोठ्या प्रमाणावर चालते, त्या राज्यांची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. 'आय सी आर ए' च्या अहवालानुसार, टाळेबंदीचा सर्वाधिक दुष्परिणाम वाहन निर्मिती क्षेत्रासह पर्यटन, आतिथ्य, उत्पादन क्षेत्र व निर्यात क्षेत्रावर सर्वाधिक प्रमाणात होईल. जागतिक व्यापार संघटनेच्या अभ्यासानुसार २०२० सालात व्यापारात १३ ते ३२ टक्क्यांपर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे. अर्थात होणारी घसरण एव्हढीच असेल की त्यात वाढ होईल, हे सर्व कोरोनाचे संकट किती काळ राहते, त्यावर अवलंबून आहे. पण कोरोनाचे संकट दीर्घकाळ चालल्यास व्यापारात आणखी घट होणार, यात शंका नाही.
 
पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान किंवा सर्वश्रेष्ठ प्राणी म्हणून मानवाला ओळखले जाते. मानवी जीवनामध्ये प्रवास किंवा स्थलांतर हा एक अविभाज्य घटक आहे. अनादि काळापासून मानवाने आपल्या हालचालींच्या कक्षा कायम रुंदावत ठेवल्या आहेत. प्रवासाच्या विविध कारणांमुळे निसर्गाविषयीचे सुप्त आकर्षण मनाला भुरळ पाडत आले आहे. पूर्वी ग्रीक, रोमन, अरब लोक हे आपला व्यापार, वाणिज्य, धर्म व इतर गोष्टींसाठी जगातील अनेक भागात जात असत. आजच्या आधुनिक काळातील शहरीकरण, स्पर्धात्मक जीवन व ताणतणावाचे जीवन लोकांना शहरी जीवनापासून दूर राहण्यासाठी भाग पाडत आहे. म्हणून भारतात पर्यटन हे महत्वाचा घटक म्हणून उदयास आले आहे. भारतासारख्या विकसनशील देशात वैद्यकीय पर्यटन हे उदयोन्मुख होत आहे. पर्यटन हे प्रादेशिकीकरण व राष्ट्रीय अर्थकारणांवर परिणाम करीत असते. भौतिक साधन सुविधांमुळे राष्ट्रीय व जागतिक पातळीवर रोजगार निर्मिती होत असते. परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे हे सर्वच ठप्प झाले आहे.
मानवी जीवनाचा विचार केला असता अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या प्राथमिक गरजा आहेत. या गरजा पूर्ण झाल्यानंतर मनुष्य इतर गरजांच्या पूर्ततेसाठी खर्चाचा विचार करतो. परंतु कोरोनाच्या संकटामुळे बेकारीची शक्यता असल्याने आर्थिक संकट येऊ घातले आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्राचे पुनर्जीविकरण ही सर्वांची सगळ्यात शेवटची प्राथमिकता असणार आहे. जसजसे कोरोना विषाणूचे संकट कमी होईल, तसतसे पर्यटन क्षेत्राला शून्यातून सुरवात करावी लागणार आहे.
 
या क्षेत्राचे पुनर्वसन प्रथमतः स्वतःच्याच राज्यातील पर्यटन, त्यानंतर स्वतःच्या देशातील पर्यटन व त्यानंतर आंतरराष्ट्रीय पर्यटन या क्रमाने होणार आहे. आणि या व्यवसायाची परत नव्याने घडी बसण्यासाठी साधारण दोन ते चार वर्षांचा काळ जाणार आहे. या व्यवसायामध्ये तसे पाहता कोणत्याही सरकारी 'मदती'चा, व्यवसाय भरभराटीस येण्यास प्रत्यक्ष फायदा होणार नाही
 कारण जोपर्यंत माणसाच्या मनात सभोवतालच्या परिस्थितीच्या सुरक्षिततेचा पुरेपूर विश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत पर्यटक पर्यटनासाठी घराबाहेर पडणार नाही व पर्यायाने पर्यटन क्षेत्राची परत म्हणावी तशी चक्रे चालू होणार नाहीत. यासाठी आज सर्वात गरज आहे ती साथ कमी होऊन आर्थिक क्षेत्राची चक्रे चालू होण्याची. त्याची गतिमानता जेव्हढी जास्त असेल तेव्हढ्या प्रभावी परिणामकारकतेने पर्यटन क्षेत्रास चांगले दिवस येऊ शकतील. पण आज तरी हे क्षेत्र अत्यंत दयनीय आर्थिक दशेने दिशाहीन झाले आहे. जरी 'केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार' हे जरी त्रिकालाबाधित सत्य असले तरी दुर्दैवाने आज माणसाच्या पर्यटनाला स्वल्पविराम मिळालेला आहे. आज ना उद्या हा संकटकाळ निश्चितच जाईल आणि मानवी जीवन हाच प्रवास आहे, यावर श्रद्धा असणारे आपण सर्व पर्यटक परत एकदा जोमाने भविष्यात पर्यटनाकडे वळू हे मात्र निश्चित!
 हो, पण त्यासाठी आज घरात रहा, सुरक्षित रहा... उद्याच्या देश- विदेशाच्या भ्रमंतीसाठी!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई
Powered By Sangraha 9.0