उघड दार देवा आता...

02 May 2020 08:01:27
शनिवार, दि.२/ ५/ २०२०
 
संचारबंदी- टाळेबंदीचा तिसरा टप्पा काल जाहीर झाला तसा मात्र जनतेचा धीर सुटत चालला. आतापर्यंत बाळगलेल्या संयमाचा बांध फुटणार की काय, अशी मनात शंका येऊ लागलीय. महिन्याभरापेक्षा जास्त काळ घरात बसल्याने शारीरिक स्वास्थ्याचे, मानसिक वैफल्याचे, आर्थिक चणचणीचे, सामाजिक असहिष्णुतेचे, भविष्यात भेडसावू शकणा-या बेरोजगारीचे, घरेलू हिंसाचाराचे प्रश्न जटील होऊ लागले आहेत.
 

DP_1  H x W: 0  
 
 
सध्या भारतीय अर्थव्यवस्थेची असणारी स्थिती आणि कोरोनाचे संकट अत्यंत बिकट परीस्थितीला जन्माला घालेल. लोकांना काही दिवसांनंतर जर रोजगार मिळाला नाही तर कोरोनापेक्षा उपासमारीने जीव गेल्याच्या घटना समोर येतील. ग्रामीण भागातून शहरांमध्ये रोजगारासाठी स्थलांतरित झालेला मोठा वर्ग आहे. संपूर्ण देशाच्या विविध राज्यांतून मुख्य शहरांच्या ठिकाणी कामधंद्यानिमित्त आलेला मजूर कामगार रोजचा रोजगार बुडाल्याच्या चिंतेने व त्याहीपेक्षा गावी असलेल्या कुटुंबाच्या काळजीने जास्त त्रस्त आहे. अशा स्थलांतरित मजुरांचे मानसिक संतुलन न बिघडू देणे, हे या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या आर्थिक गरजा भागवून व वेळोवेळी त्यांचे योग्य समुपदेशन करून त्यांना निराशेच्या गर्तेत जाण्यापासून रोखले पाहिजे. 
 
आज दुर्दैवाने आपल्या समाजात संचारबंदीमुळे सर्व माणसे घरात कोंडली गेली आहेत. त्यामुळे अतिपरिचयात् अवज्ञा या उक्तीनुसार दुर्दैवाने त्याचा वीट येऊ लागला आहे. त्यामुळे कुटुंबातील भांडण- तंटे- वाद वाढल्याच्या घटना आढळून येत आहेत. काही असंस्कारित कुटुंबांमध्ये घरातील हिंसाचाराचे प्रमाण पराकोटीला पोचले आहे. काही कुटुंबांमध्ये घरातील गृहिणी घरकामामध्ये अतिशय गाडली गेली असल्याने तिचे शारीरिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. घरातील कर्ता पुरुष भविष्यात येऊ शकणा-या बेरोजगारीमुळे जिवावर टांगती तलवार घेऊन तणावाचे आयुष्य व्यतित करीत आहे. घरातील मुलांचे अभ्यास काही प्रमाणात ऑन लाईन चालू झाले असले, तरी एकंदरीत त्यांचे शैक्षणिक भवितव्य प्रश्नांकित झाले आहे. एकंदरीतच काय, कुटुंबातील, पर्यायाने समाजातील कौटुंबिक सौहार्दपूर्ण वातावरण गढूळ होऊ लागले आहे.
 
नाटक, चित्रपट, क्रीडा, मनोरंजन, पर्यटन यासारख्या करमणुकीच्या क्षेत्रात अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. या क्षेत्रातील कामगारांचे, कर्मचा-यांचे पुनर्वसन हा शासन दरबारी दुर्दैवाने कमी महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. जरी टाळेबंदी उठवली गेली तरी ही सेवाक्षेत्रे पूर्वपदावर येण्यास खूप काळ लागणार आहे.
 
एकंदरीत सर्व सामाजिक- आर्थिक- राजकीय परिस्थितीचा विचार केला तर तिची अवस्था 'धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय' या म्हणीप्रमाणे झाली आहे. आणि या सर्वांवर रामबाण उपाय म्हणजे टाळेबंदीची समाप्ती! पण जोपर्यंत कोरोना विषाणूमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या कमी होत नाही, जोपर्यंत कोरोनामुळे मरण पावणा-यांची संख्या शून्यावर येत नाही तोपर्यंत टाळेबंदीची समाप्ती अशक्य आहे. आणि म्हणूनच सर्व जनतेने शासनाने व आयुष मंत्रालयाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. आपल्या मनात कोणत्याही प्रकारचा अती आत्मविश्वास न बाळगता सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. सभा, संमेलने, समारंभ, उत्सव टाळले पाहिजेत. पराकोटीची स्वच्छता राखून सामाजिक स्वास्थ्य जपले पाहिजे. आणि ह्या सर्व बाबी जर समाजातील प्रत्येक घटक- प्रत्येक नागरिक तंतोतंत पाळणार असेल, तरच एव्हढे दिवस टाळेबंदीत राहिल्याच्या तपश्चर्येचे फळ आपल्या हाती लागेल. अन्यथा सर्व प्रतिबंधात्मक उपायांवर पाणी फिरेल. कोणतातरी चमत्कार घडेल व सर्व परिस्थिती निवळेल, यासारखा अवैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून उपयोग नाही. अन्यथा जनजीवन पूर्वपदावर येण्याची आशा धूसर होईल.
 
आज जरी आपण सर्व कितीही उच्च रवाने टाळेबंदीचे कुलूप उघडण्यासाठी याचनेचा निनाद करीत असलो तरी आज आवश्यक आहे ते 'घरात राहणे, सुरक्षित राहणे व गर्दी टाळणे.'
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई
Powered By Sangraha 9.0