शनिवार, दि.१६/ ५/ २०२०
संचारबंदीच्या काळात व्हाॅटस् अॅपवरील संदेश वाचत असताना नुकताच एक संदेश वाचनात आला. त्यात सांगितल्याप्रमाणे पुण्यातील एका नामवंत शाळेत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले असून त्यात अभ्यास शिकवण्याऐवजी मुलांना अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम द्यायला सुरवात केली आहे. रोज छोटे छोटे उपक्रम मुलांना त्यांच्या वयानुरूप दिले जातात. त्यात मुलांनी घरातील छोटी छोटी भांडी घासणे, कपाट आवरणे, स्वतःचा खाऊ स्वतः एखादेवेळी बनवणे, चहा करणे, कपड्यांच्या घड्या घालणे, ते वाळत घालणे असे रोज त्यांना काम दिले जाते. आणि हे काम करताना पालकांनी मुलांचे फोटो व छायाचित्रण करून रोजच्या रोज शाळेला संगणकाद्वारे पाठवायचे असतात. तरच रोजची हजेरी गृहीत धरली जाते. किती अभिनव उपक्रम आहे हा!
मानवी जीवनात संस्कारांचे खूप महत्त्व आहे. संस्काराशिवाय जीवन शून्य असते. संस्कारच मनुष्याला श्रेष्ठ बनवतात. उत्तम आकार देतात. सर्वोत्तम जीवनाचा पाया उत्तम संस्कारावर अवलंबून असतो. संस्काराशिवाय मानवी जीवन भरकटलेल्या जहाजाप्रमाणे असते. संस्कार म्हणजे नेमके काय? संस्कार संस्कृतीनेच उत्पन्न होतात. तसेच संस्कृती पण संस्कारावर निर्भर असते. दोन्ही एकमेकांवर आधारित असतात. संस्कार म्हणजे माणसाच्या व समाजाच्या चांगल्या सवयी. असे सद्गुण हे मानवांत असले पाहिजेत. अशा गुणांचा लाभ फक्त वैयक्तिक नसतो, तर सर्व समाज त्यातून लाभान्वित होतो. निरोगी समाजजीवनाकरता उत्तम संस्कारित नागरिकाचे घडणे आवश्यक आहे.
एक चांगला माणूस व आदर्श नागरिक बनवण्याची सुरवात घराघरातूनच व्हायला हवी. चांगल्या सवयीचे आणि चांगल्या संस्काराचे महत्त्व पटवून द्यायला हवे व ते अंगीकारणे अनिवार्य करणे जरुरीचे आहे. या सर्व गोष्टींची सुरवात घरातूनच होणे गरजेचे आहे. मुलांना लहानपणापासूनच चांगल्या सवयी लावायला हव्यात.त्याचप्रमाणे शालेय जीवनात झालेले संस्कार हे आयुष्यभर पुरतात. आपल्या यशस्वी होण्यामध्ये, सुसंस्कारित होण्यामध्ये कुटुंबाइतकाच शाळेचाही सहभाग मोलाचा असतो. शाळेत विविध उपक्रम विद्यार्थ्यांवर कृतियुक्त संस्कार होण्यासाठी राबविण्यात येत असतात. कारण संस्कार हा जरी क्षणिक असला तरी तोच अनंतकाळ टिकणारा असतो.
कोरोनाच्या या संकटकाळात एकट्या राहणा-या, आळशी, घरगुती कामे न येणा-या तरुणांकडे पाहिले की संस्काराचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. स्वतःची भांडी घासणे, स्वतःच्या घराची स्वच्छता, वरणभात, बटाटा भाजी यासारखे साधे पदार्थ बनवणे, स्वतःचे कपडे धुणे, वाळत टाकणे यासारखी कामे स्वतःला आलीच पाहिजेत. आपले घरातले एकुलते एक अपत्य कितीही कोडकौतुकाचे असले, लाडाचे असले तरी मुलगा- मुलगी हा भेदभाव न करता स्वयंपूर्ण असण्यासाठी अतिआवश्यक सवयी सर्वांना लावल्याच पाहिजेत. आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे कोणत्याही कामाची लाज न वाटणे- श्रमप्रतिष्ठा! 'बायकी कामे' या संकल्पनेमधून सर्वांनी बाहेर आले पाहिजे. जर का दुर्दैवाने आजच्यासारखेच संकट भविष्यात ओढवले तर आपल्या मुलांनी अस्वस्थ होता कामा नये. कावरेबावरे न होता चांगल्या सवयींच्या शिदोरीवर त्यांचे दैनंदिन कार्यक्रम व्यवस्थित सुरळीत चालू राहिले पाहिजेत. दैनंदिन उपक्रमांसाठी चांगल्या सवयी आत्मसात केलेली कौशल्ये त्यांच्या कामी येतील. आणि म्हणूनच रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणारी व दुर्दैवाने फुटकळ समजली जाणारी, पण अत्यावश्यक असलेली जीवन कौशल्ये शिकवायची हीच वेळ आहे. आणि ते काम आज घरात आईवडिलांनी करणे गरजेचे आहे. त्याला कोणताही दुसरा पर्याय असूच शकत नाही!
म्हणूनच मंडळी, आज घरातच रहा, सुरक्षित रहा, आपल्या पाल्यांना जीवन कौशल्ये अवगत करण्यासाठी!
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई