गुरुवार, दि. १४ /५ /२०२०
संचारबंदीच्या काळात दुपारच्या वेळेत डिजिटल स्वरुपातील वृत्तपत्र वाचत असताना फ्रान्समधील एक बातमी वाचनात आली. व्हॅलरी मार्टिन ही फ्रान्समधील बेऑन शहरामध्ये 'व्हिलानोव्हा' नावाचा वृद्धाश्रम चालवते. या वृद्धाश्रमात १०६ वृद्ध नागरिक आहेत. आपल्या वृद्धाश्रमातील प्रत्येकाचा जीव व्हॅलरीला अनमोल वाटत होता. अजूनही प्रत्येकाला खूप जगायचं आहे, त्यामुळे कोरोनाच्या विषाणूला कोणीही बळी पडून चालणार नाही, असं तिने मनाशी ठरवलं. ते कृतीत उतरवण्यासाठी तिने स्वतःला तिच्या कर्मचा-यांसह वृध्दाश्रमातील १०६ वृद्ध, जे सारेच ८० वर्षांच्या पुढचे होते, त्यांच्यासोबत अक्षरशः कोंडून घेतले. तिने वृध्दाश्रमातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला आपापल्या खोलीत डांबून न ठेवता आवारात मोकळं वावरण्याची मुभा दिली. त्यांची काळजी घेण्यासाठी व्हॅलरीसह तिचे १२ सहकारी या १०६ वृद्ध नागरिकांसमवेत वृध्दाश्रमात कैद झाले होते. प्रत्येकजण या परिस्थितीचा उल्लेख 'आनंदाची कैद' असा करीत होता. तिच्यासोबत १२ सहकारीपण आपापल्या घरी न जाता वृध्दाश्रमातच राहिले. प्रत्येकाला वृध्दाश्रमातील वृद्धांचा आनंद आणि त्यांची काळजी महत्त्वाची वाटत होती. ४७ व्या दिवशी लाॅक डाऊन शिथिल झाले तेव्हा व्हॅलरीने पूर्वीचे रहाटगाडगे सुरू करण्याआधी वृध्दाश्रमातील वृद्धांची व सर्व कर्मचा-यांची कोरोना चाचणी करून घेतली. ती नकारात्मक आली! त्यांच्या कष्टाचं चीज झालं होतं!
व्यक्तीच्या आयुष्यातील साधारणतः साठ ते पासष्ट वर्षे वयाचा व त्यापुढचा काळ हा वृद्धावस्था म्हणून गणला जातो. आधुनिक काळात वैद्यकशास्त्रातील लक्षणीय प्रगती आणि अद्ययावत औषधोपचारांची सहज व त्वरित उपलब्धता यामुळे मृत्यूदरात घट व सर्वसामान्य आयुर्मानात वाढ झाली आहे. त्यामुळे वृद्धांची संख्या व एकूण लोकसंख्येतील प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. एकत्र कुटुंब व्यवस्था मोडीत निघून विभक्त कुटुंबाची संख्या फोफावल्याने वृद्धांच्या समस्या वाढत आहेत. चंगळवादी संस्कृतीत साहजिकच उपभोगाला अधिक प्राधान्य असते. त्यामुळे अशा समाजव्यवस्थेत वृद्धांना अडगळीचे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता वाढली आहे. सामाजिक व आर्थिक बदलत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागल्याने वृद्धांपुढे अनेक प्रकारच्या समस्या उभ्या राहतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व परावलंबी असलेल्या वृद्धांचे पालनपोषण, उदरनिर्वाह, वैद्यकीय उपचारार्थ करावा लागणारा खर्च इ. आर्थिक बाबी त्या व्यक्तीपुढे व समाजापुढे गंभीर प्रश्न उभे करतात. त्याचप्रमाणे कुटुंबातील- समाजातील दोन पिढ्यांचे अंतर सामाजिक स्वास्थ्य बिघडवतात. वाढत्या वयाबरोबर उद्भवणा-या शारीरिक व मानसिक व्याधी व त्या अनुषंगाने येणा-या समस्या यात लक्षणीय वाढ झाली असून त्याची उग्रता व गांभीर्य भेडसावणारे आहे. तसेच कौटुंबिक आधार गमावलेल्या वृद्धांच्या निवा-याचा प्रश्न बिकट झालेला आहे.
या सर्व नेहमीच्या समस्यांच्या भाऊगर्दीत कोरोनाची भर पडली आहे. या संकटामुळे घरातच बसणे क्रमप्राप्त झाल्याने वृद्धांचा रोजचा दिनक्रम बदलला आहे. त्यांचा दिवसभरातील फिरण्याचा व्यायाम संकटात आला आहे. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब यासारखे विकार मधेच डोके वर काढत आहेत. आणि अशा व्याधी असलेले वृद्ध कोरोनाच्या भीतीने जास्त चिंताक्रांत आहेत. घरात सर्वच कुटुंबीय सदैव असल्याने वृद्धांच्या खाजगी अवकाशावर गदा आली आहे. त्यामुळे घरात वारंवार खटके उडून भांडणे वाढत आहेत व त्यामुळे वृद्ध नैराश्याने ग्रासले जात आहेत. बाहेर फिरण्यावर बंधने आल्याने स्वयंपूर्ण नसलेले वृद्ध मुलाबाळांवर अवलंबून असल्याने परावलंबित्वाची भावना त्याना पोखरून काढत आहे. त्यातही रुग्णशय्येवर पडून असलेल्या परावलंबी वृद्धांचे हाल आहेत. त्यांची सेवा करणारे कर्मचारी त्यांना भेटत नसल्याने ते मानसिक दृष्ट्या अस्वस्थ आहेत. आपल्या मुलाबाळांवर आपला भार पडतो म्हणून अपराधीपणाची भावना मनात दाटून येत आहे. यातच त्यांची चिडचिड, हट्टीपणा, हेकेखोरपणा, असहकाराची भावना वाढीस लागली आहे.
एकंदरीत सर्वच वृद्धांच्या बाबतीत भावनिक, मानसिक गोंधळाची स्थिती आहे. घरातील मुलाबाळांच्या, नातवंडांच्या भविष्याच्या काळजीने प्रचंड अगतिकता ते अनुभवत आहेत. एकाकी असलेले वृद्ध प्रचंड निराशेच्या भावनेने मानसिकदृष्ट्या संतुलन हरवून बसले आहेत. पण या सर्वांना जरूर आहे ती पुढच्या पिढीकडून आश्वस्त करण्याची! धीर देण्याची! मनोधैर्य वाढविण्याची! अत्यंत काळजीने संवेदनशील हळव्या झालेल्या मनावर आधाराने हळुवार फुंकर घालण्याची! सर्व आजी आजोबांनो, काळजी करू नका! हेही दिवस जातील! संकटकाळ लवकरच दूर होईल. कृपया संयम बाळगा. धीर सोडू नका. आपले मनोधैर्य टिकवून ठेवा. आपल्या अनुभवाच्या शिदोरीची गरज लागणार आहे. तेव्हा आश्वस्त व्हा. पण आज घरातच बसा, सुरक्षित रहा, घरातील कैद आनंदी करा!
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई