बुधवार, दि.१३/ ५/ २०२०
संचारबंदीच्या काळात समाजमाध्यमावरील संदेश वाचत असताना प्रख्यात अभिनेता श्री. अमिताभ बच्चन यांचा संदेश वाचनात आला. साधारण सन १९९५- ९६ च्या सुमारास जेव्हा त्यांची एबीसीएल नावाची कंपनी दिवाळखोरीत निघाली तेव्हा त्या महाभयंकर परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी त्यांनी कोणत्या प्रकारचे सकारात्मक रचनात्मक बदल केले व परिस्थितीतून ते पूर्णपणे तावून सुलाखून बाहेर निघाले या संदर्भातील माहितीपूर्ण विवेचन त्या संदेशामध्ये केले होते. या सगळ्याच्या मुळाशी होता तो म्हणजे परिस्थितीनुरूप स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन करण्याचा विचार! स्वतःचा अभिमान- अहंकार बाजूला ठेवून परिस्थितीचे भान बाळगून स्वतः माध्यम बदलण्याचा केलेला प्रयत्न व त्याचबरोबर बदलत्या आर्थिक विश्वातील घेतलेल्या सुसंधीचा फायदा!
वास्तविक पाहता बदल ही जीवनातील सर्वात शाश्वत गोष्ट आहे. जो काळानुरूप बदलला तोच या जीवनरूपी समुद्रात तरला! अन्यथा परिस्थिती कठीण! स्वतःमध्ये, स्वतःच्या विचारांमध्ये, स्वतःच्या वर्तनामध्ये, दृष्टिकोनामध्ये बदल घडविणे हे अनिवार्य आहे आणि तो बदल सकारात्मक असेल या विचाराशी प्रत्येक व्यक्तीने कटिबद्ध असणे अत्यावश्यक आहे. जग हे परिवर्तनशील आहे. बदलत्या जगाबरोबर बदलत राहणे हे अनिवार्य आहे. काळानुरूप हे बदल घडत असतात. बदल कधीच नाकारता येत नाहीत. कारण असे केले तर मग जगणे अवघड होऊन बसेल. परिस्थितीतील बदल सुसह्य करण्यासाठी स्वतःलाही मग बदलावे लागते. कारण परिवर्तन हे प्रगतीच्या दिशेने पडणारे पहिले पाऊल असते. या प्रक्रियेमध्ये काही नवीन गोष्टी शिकाव्या लागतात, तर काही जुन्या अंगवळणी पडलेल्या गोष्टी विसरायला पण लागतात. परिवर्तन घडत असताना ते अनेक मार्गांनी घडते. त्या परिवर्तनाला वेगवेगळे प्रवाह असतात. जर ते प्रवाह योग्य दिशेला वळवता आले, तरच ते पूरक ठरतात. अन्यथा मग त्या प्रवाहात अनेक तत्त्वे, नीतीमूल्ये वाहून जातात. आणि परिवर्तनाची गरज म्हणून नीतीमूल्यांचा -हास करणे कितपत योग्य आहे? ज्यामुळे संस्काराची मुळे मुळासकट उखडली जातील असे परिवर्तन काय कामाचे?
कोरोना विषाणूच्या वैश्विक महामारीने केवळ भारताचीच नव्हे तर संपूर्ण विश्वाचीच आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक व्यवस्था ढवळून निघणार आहे. मूल्याधारित जीवन व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. ज्याप्रमाणे पुराणकाळात समुद्रमंथनामधून विविध रत्ने बाहेर आली, त्यामध्ये अमृतही होते व हलाहल विषही होते, त्याप्रमाणे कोरोनाची साथ संपूर्ण समाजव्यवस्थेचे सर्वांगीण मंथन करून पूर्णपणे निराळीच जीवनशैली बहाल करणार आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीला अनुसरून जो प्रवाहपतित न होता स्वतःमध्ये बदल करेल तो आणि केवळ तोच तरेल!
त्यामुळे आज गरज आहे ती पुनश्च हरि ॐ म्हणत स्वतःमध्ये परिवर्तन करण्याची! संकटामधील संधी शोधून त्याचे रूपांतर स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी करणे, अतिशय गरजेचे आहे. फक्त ती संधी शोधण्याची दृष्टी आपल्याकडे असायला हवी. एकदा का ती संधी हेरली की मग विचारपूर्वक परिश्रमाने त्या संधीचे सोने व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी आज आवश्यक आहे सराव. आपल्याला सराव परिपूर्ण बनवतो. सराव म्हणजे गुणवत्ता टिकण्याचे सार! त्यासाठी आपण ज्या क्षेत्रात आहोत, त्यातील आपली कौशल्ये अधिक तेजस्वी करा. नाविन्याचा मागोवा घ्या व आपले ज्ञान वाढवत रहा. आज आपल्या कौशल्यावर लक्ष केंद्रित करा. स्वतःला अजून कसे अत्युत्कृष्ट करता येईल याकडे लक्ष द्या. कारण संकटकाळ जाऊन जेव्हा पुन्हा काम करण्याची वेळ येईल तेव्हा सगळी आव्हाने पूर्ण करण्यास तयार असाल. म्हणून स्वतःमध्ये बदल घडवा. परिवर्तन नाकारू नका!
जीवनामध्ये परिवर्तन अनिवार्य आहे. आजचा दिवस पुन्हा कधीच उगवणार नाही. रोज नवा दिवस उगवतो. आयुष्य हे एक गूढ आहे. त्यासाठी ना कुठला नकाशा आहे, ना कुठली मार्गदर्शिका. गूढ आयुष्याच्या शोधासाठी स्वतःच गूढ आत्मा बनून परिवर्तन करणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच मनोमन अंतःस्फूर्तीचा पाठलाग करून बदलाच्या तरंगावर स्वार होऊन आपली नौका दर्यापार करणे गरजेचे आहे.
पण त्यासाठी आज घरातच रहा, सुरक्षित रहा, उद्याच्या बदलाला सिद्ध होण्यासाठी!
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई