गुरुवार, दि.३०/ ४ /२०२०
जगभरातील अर्थव्यवस्था आता अतिशय घट्टपणे एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूच्या संकटामुळे येत्या नजीकच्या काळात भारताला ५००० अब्ज डाॅलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न धोक्यात येऊ शकते. ३० दिवसांपेक्षा जास्त काळ चालू असलेली भारतातली टाळेबंदी याला जबाबदार आहे, तसेच अमेरिका, युरोप, चीन आणि जपानमधील वृद्धी जर तीव्र प्रमाणात मंदावली तर त्याचा परिणाम थेटपणे इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांवर होणार आहे. भारत याला अपवाद असणार नाही.
भारताची अर्थव्यवस्था अगोदरच नोटबंदीचा धक्का आणि वस्तू व सेवा कर प्रणाली या दोन्हीमुळे डगमगतच आहे. या दोन्हींमुळे लघू उद्योग क्षेत्र प्रचंड प्रमाणात उद्ध्वस्त झाले आहे. स्थावर मालमत्ता आणि बांधकाम क्षेत्राचाही त्यामध्ये समावेश आहे. या दोन क्षेत्रांमध्ये आजपर्यंत मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असे. दुर्दैवाने भारताची निर्यात, पत वृद्धी, बचत आणि गुंतवणूक दर हे सर्व आताच्या घडीला कुंठित झाले आहेत. जागतिक परिस्थितीही आश्वासक नाही. भारत सध्या स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वाधिक आपत्कालीन स्थितीतून जात असून आता सरकारने तुलनेने कमी महत्त्वाच्या खर्चामध्ये कपात करून गरीब जनतेच्या कल्याणासाठी खर्च करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. सरकारजवळील संसाधने जरी मर्यादित असली तरीही गोर- गरीब गरजूंच्या कल्याणासाठी खर्च करणे हेच सध्या योग्य ठरेल. आपण आधीच वित्तीय तूट घेऊन संकटाच्या क्षेत्रात प्रवेश केलेला आहे. तरीही आपल्याला गरीबांच्या कल्याणावर आणखी खर्च करणे अनिवार्य आहे. अर्थात भारत योग्य अशा निश्चयासह व प्राधान्यक्रमासह कोरोनाच्या आर्थिक संकटातून निश्चितपणे बाहेर पडू शकतो. पण त्यासाठी गरज आहे ती नवीन आर्थिक सुधारणांच्या नियमावलीची व त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्याच्या शिस्तबद्ध व कठोर अंमलबजावणीची!
सूक्ष्म अर्थशास्त्रातील (Micro Economics) मागणी आणि पुरवठ्याचा (Demand and Supply) आणि ग्राहकाच्या वर्तणुकीसंदर्भातील सिद्धांतानुसार (Consumer Behavior) आपल्याला सध्याची परिस्थिती अभ्यासता येईल. वस्तूंचा अनावश्यक केलेला साठा- साठेबाजी- कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळ्या बाजाराला जन्म देईल. भारतामध्ये विरोधाभास असा आहे की गोदामात धान्य शिल्लक असते आणि त्याचवेळी कितीतरी लोक उपाशीपोटी झोपत असतात. याकरीता सरकारी पणन व्यवस्थेतील झारीतील शुक्राचार्य जबाबदार आहेत. या साथीच्या आजाराचा व टाळेबंदीचा भारतीय अर्थव्यवस्थेला नि:संशय जबरदस्त तडाखा बसणार आहे. लोकांचे जीवन सुरळीत होऊन पूर्वपदावर येण्यासाठी खूप मोठ्या काळाची गरज लागणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बेरोजगारीमुळे जास्त प्रभावित होईल. शासनाने देशातील सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन काम केले तर नक्कीच आपण संकटावर यशस्वीरित्या मात करू.
भारत केवळ संकटातच सुधारणा करतो, असे म्हटले जाते. याकडे सकारात्मक पद्धतीने बघितले तर एरवी भीषण वाटणारी शोकांतिका आपण समाज म्हणून किती कमकुवत झालो आहे हे समजून घेण्यात आपल्याला मदत करेल आणि आपले राजकारण आपल्याला आत्यंतिक गरजेच्या असलेल्या आर्थिक व आरोग्यविषयक सुधारणांवर लक्ष केंद्रित करेल, अशी आशा करू या!
त्यामुळे उपलब्ध असलेले धनधान्य व इतर नैसर्गिक संसाधने जपून वापरणे ही प्रत्येकाची वैयक्तिक व सामूहिक जबाबदारी एकाच वेळी आहे. जी काही उपलब्ध साधन संपत्ती आहे, ती जपून वापरायला हवी, एरवीपेक्षा जास्त काळजीपूर्वक! आपल्या महाराष्ट्रातील संतांनी जनतेला केवळ निवृत्ती मार्गाची शिकवण दिली नाही, तर परमार्थासोबत प्रपंचही सुखाचा कसा करता येईल, याचा कानमंत्रही दिला आहे. कोरोनामुळे भविष्यात येऊ घातलेल्या आर्थिक संकटात आपण तुकाराम महाराजांनी दिलेल्या शिकवणीवर अंमल करू या. संत तुकाराम महाराज सांगतात, साधन शुचिता, अर्थ शुचिता बाळगून व्यवहार केला तर सुखाचे दार संकटकाळातही दूर नाही. 'उत्तम व्यवहार' आणि 'उदास विचार' हे धनाच्या प्राप्तीचे आणि विनियोगाचे अधिष्ठान असले पाहिजे व आपण सर्वांनी याच तत्त्वाचा पुरस्कार केला पाहिजे. म्हणून देश कार्यासाठी आपण आपल्या उत्पन्नातील काही भाग देणगी स्वरूपात दिला पाहिजे. कोरोना युद्धाच्या काळात आपण देशकार्यासाठी आर्थिक मदत देऊन खारीचा वाटा उचलला पाहिजे. आणि म्हणूनच मंडळी, येणा-या आर्थिक संकटाच्या काळात तुकोबांनी सांगितलेल्या साधन शुचितेवर अंमल करण्याचा संकल्प करू या व देशाला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी आपले योगदान देऊ या!
हो, पण त्यासाठी आज घरात बसू या, सुरक्षित राहून आणि गर्दी टाळून! उद्याच्या आर्थिक सुधारणांसाठी!!
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई