बुधवार, दि.२९ /४ /२०२०
आजच फुरसतीच्या वेळात व्हाॅटस् अॅप वरील संदेश वाचत असताना संचारबंदी- टाळेबंदीच्या काळात किराणा दुकानातून जनतेने खरेदी केलेले सामान या विषयावरील दुकानदाराने केलेले विश्लेषण वाचले. अर्थात् दुकानदार पुण्यातील असल्याने अतिशय चिकित्सक पद्धतीने विश्लेषण केले होते हे नि:संशय! त्या लेखात दिलेल्या माहितीप्रमाणे संचारबंदीच्या काळात मॅगी, सुका पास्ता, नूडल्स, चीज, बटर, साॅस, मायोनीज, मैदा, यीस्ट, बेकींग पावडर, खाण्याचा सोडा, चाॅकलेट बेस, तयार मसाले, तयार सूपची पाकिटे, रेडी टू इट चे निरनिराळे प्रकार, फरसाण, शेव, वेफर्स, पावभाजी मसाला, बिर्याणी मसाला, ओटस्, फ्लेक्स, पापड वगैरे पदार्थांची जास्तीत जास्त विक्री झाली व अजूनही तत्सम पदार्थांना जोरदार मागणी आहे.
वास्तविक पाहता या काळात अन्न- धान्य जपून वापरायची आवश्यकता आहे. ही वेळ रोज नवनवीन पदार्थ बनवून वाया घालवायची नाही. कारण पुढील दिवस अवघड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे रोज नवनवीन पदार्थ खाणे हे आरोग्य दृष्ट्यासुद्धा अयोग्य आहे. शहरामधून आज जनता वरील प्रकारचे पदार्थ दुकानातून खरेदी करून नवनवीन शाही व्यंजने बनवण्यात, खाण्यात व खाऊ घालण्यात स्वतःची करमणूक करून घेत आहे. वास्तविक पाहता स्वतःशीच विचार करा की रांगा लावून खरेदी करण्याइतपत या वस्तू जीवनावश्यक आहेत का? असा कच्चा माल वापरून आपण कोणते पोषणमूल्य असलेले पदार्थ बनवत आहोत? त्यांनी आपली प्रतिकारशक्ती वाढते आहे का? आपल्या तब्येतीला पूरक आहेत का हे सर्व पदार्थ?
सर्व प्राणिमात्रांना त्यांच्या क्रियाशील जीवनासाठी पोषण आवश्यक असते व त्यासाठी काही खाद्यपदार्थ किमान स्वरूपात व सुयोग्य प्रमाणात लागतात. मुख्यतः अन्नपदार्थांपासून ऊर्जा निर्माण होते व म्हणूनच त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मानवी अन्नाचा मोठा भाग कर्बोदके, आम्ले, प्रथिने व पाणी हे चार पोषण घटक व्यापतात. जीवनसत्वे व खनिजे अत्यल्प प्रमाणात लागतात. पोषणाच्या दृष्टीने सर्व घटक महत्त्वाचे आहेत तर काही घटक महत्त्वाची कार्ये करतात.
हे सर्व अन्नघटक- पोषणमूल्ये आपल्याला आपल्या रोजच्या भात- भाजी- पोळी/ भाकरी- कोशिंबीर- आमटी या जेवणातून व्यवस्थितपणे मिळत असतात. ऋतुमानानुसार धान्यप्रकारात बदल करून मसाल्याचे प्रमाण कमी- जास्त करून आपणांस योग्य प्रकारची पोषणमूल्ये व्यवस्थितपणे अविरतपणे मिळतात. जरी जंक फूड कितीही चमचमीत लागत असले व आपल्या जिभेचे चोचले पुरवत असले तरीही आरोग्याच्या दृष्टीने वरचेवर असले पदार्थ खाणे योग्य नाही. रोज दोन वेळचे परिपूर्ण जेवण व सकाळची न्याहरी यातून मानवाला आवश्यक तेव्हढे उष्मांक मिळत असतात. आपली चयापचय क्रिया व्यवस्थित राहून अपचन, आम्लपित्त, डोकेदुखी, पोटदुखी यासारख्या रोगांपासून आपण दूर राहतो. शारीरिक प्रतिकारशक्ती वाढते आणि सुदृढ शरीरात सुदृढ मन निवास करते व स्वास्थ्य उत्तम राहते.
भगवद्गीतेच्या १७ व्या अध्यायात, जो 'श्रद्धात्रयविभाग योग' म्हणून ओळखला जातो, त्यात सत्व, रज आणि तम या गुणांवर व अन्न यावर भगवंताचं भाष्य आहे. श्रीकृष्णाने सात्विक, राजस आणि तामसी गुणांची विस्तृत व्याख्या दिली असून त्याचा शरीरावर, मन आणि बुद्धीवर प्रभावदेखील स्पष्ट केला आहे. आणि म्हणूनच आज रांगा लावून अनावश्यक सामान खरेदी करून जिभेचे चोचले पुरवणे कमी करू या! अन्नधान्य, पैसा सर्वच साधने जपून वापरू या. टाळेबंदीचा काळ मौजमजेसाठी नाही. त्याचे दूरगामी भयंकर परिणाम होणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये उदरनिर्वाह करून सहीसलामत राहण्याचे
भविष्यातील आव्हान पेलण्यासाठी आपण या काळात .स्वतःला तयार करू या. रोजच साधे, ताजे, पोषणमूल्य असलेले अन्न खाणे बरे! आणि हो, थोडं कमी खाल्लं तरी चालेल! पचन होण्याइतपत व्यायाम करत नसल्यास अधिक सावधगिरी बाळगा. सुट्टीचा मोसम असल्याप्रमाणे रोजरोज खास तेलकट, तूपकट खाणं टाळा. वेळीच सावध होऊन चमचमीत मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा! भसाभस किराणा घेऊन संपवू नका. जे आहे त्यात थोडक्यात भागवण्याचे हे दिवस आहेत. आपल्याला पृथ्वीवरून कोरोना संपवायचा आहे, किराणा नाही.
चला तर मंडळी, खवय्येगिरीला थोडी मुरड घालू या! उदरभरण हे नित्यकर्म आहे याची जाण ठेवून साधं- सकस- सात्विक अन्न ग्रहण करू या. जिभेवर ताबा व संयम ठेवू या! हो, आणि हे सर्व घरात बसून, सुरक्षित राहून, गर्दी टाळून!
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई