अंतर मनामनातले, जनाजनातले!

28 Apr 2020 10:46:39
मंगळवार, दि.२८/ ४/ २०२०
 
कोरोना विषाणूच्या युद्धात सामाजिक अंतर ही एक नवीन संकल्पना उदयास आली आहे. सामाजिक अंतर ठेवा हा संदेश घेऊन सर्वच माध्यमे जनतेला आवाहन करीत आहेत. गळाभेटी घेणे व मुके घेणे या पाश्चात्यांच्या संस्कृतीचे अनुनय करणारे भारतीय तरुण त्यामुळे काहीसे अस्वस्थ झाले आहेत.
 
वास्तविक पाहता हा सगळा प्रकार जरी नवीन वाटत असला तरी वेगवेगळ्या मार्गाने आपण अनेकदा हे सामाजिक अंतराचे भान भारतीय संस्कृतीत सदैव बाळगत आलेलो आहोतच. अंतर ठेवणे हा आपल्या रोजच्या आयुष्याचा भागच झालेला आहे. भारतीय जीवनपद्धती ही सदैव आपणांस सुरक्षित अंतर ठेवण्यास शिकवत आलेली आहे.
 
उठसूठ हस्तांदोलन करणे, मुके घेणे, गळाभेट घेणे असे प्रकार आपल्याकडे नसून हात जोडून नमस्कार करण्याची पद्धत आपणांस सुरक्षित अंतर ठेवण्याचा संस्कार देते. ऋतुमानानुसार वेगवेगळे पदार्थ ग्रहण करून आपल्या शरीराचे वातावरणाशी अनुकूलन करण्यासाठी आपल्या संस्कृतीत निरनिराळे सण साजरे केले जातात. त्यातून विविध रोगांना वातावरणातील बदलामुळे योग्य अंतरावर ठेवण्याचीच योजना दिसते. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले तरी भारतीय शौचालयाचेच घ्या की! पाश्चात्य पद्धतीच्या शौचालयांमध्ये कमोडच्या सीटवरच्या लाखो विषाणूंचा डायरेक्ट शरीराला संपर्क होतो. तसा भारतीय पद्धतीच्या शौचालयामुळे होत नाही व त्यामुळे योग्य अंतर राखले जाते.
 
 
                                                                                                                                                             

               social distancing_1       
                                                                                                                                               अंतर जनाजनातले 
                                 
परंतु या संकटकाळात जनाजनात, माणसामाणसांत सुरक्षित सामाजिक अंतर राखणे आवश्यक असले तरी माणसाच्या मनामनातले अंतर कमी होणे, किंबहुना नष्ट होणे मोठ्या गरजेचे आहे. परंतु आजच्या आधुनिक काळात माणसाच्या स्वकेंद्रित स्वार्थी वृत्तीने पछाडलेल्या मनोवृत्तीने मनामनातले अंतर कमी न होऊ लागल्याची उदाहरणे बघायला मिळतात. कौटुंबिक नातेसंबंधामधील तेढ, विसंवाद, अगदी कोर्ट कचे-यापर्यंत नेणारी भावंडांतील भांडणे अशा घटना मनामनातील अंतर कमी न झाल्याचेच दर्शवतात. कुटुंबातील व्यक्तींशी प्रत्यक्ष संवाद साधण्याऐवजी न दिसणा-या आभासी दुनियेतील विस्तारित कुटुंब बनविणे, हे त्याचेच द्योतक आहे. घरातील, समाजातील माणसांशी बोलण्याऐवजी केवळ पाळीव प्राण्यांशी तासन् तास संवाद साधणारे आपणांस गल्लीबोळात आढळतात. ही भूतदया म्हणायची की मानसिक विकृती? 
 
 
namaskar_1  H x
 
                                                                                                                                                 अंतर मनामनातले
 
 आज कामधंद्याच्या निमित्ताने आपल्या संप्रेषणाच्या कक्षा जरी रुंदावल्या असल्या तरी माणसांच्या मनामनातील अंतर वाढले आहे. आहे ते केवळ कृत्रिम आभासी बोलणे. ना त्याच्यापाठी कुठची भावना आहे, ना सहवेदना! माणसामाणसातील सुरक्षित अंतर वाढवण्याच्या नादात आपण मनामनातले अंतर का बरे वाढवतोय? केवळ मी आणि माझा स्वार्थ यांनी अंध झालेल्या आपणांस दुस-याची वेदना का बरे समजत नाही? 'अतिपरिचयात् अवज्ञा' या उक्तीप्रमाणे आपली किंमत कमी होईल व आपले महत्त्व राहणार नाही, या भीतीने तर आपण हे मनामनातले अंतर वाढवत नाही ना? की पराकोटीला गेलेले षड्रिपू , अत्यंत टोकावर असलेले इगो व बोथट झालेल्या जाणीवा या सर्वाला जबाबदार आहेत?
 
एकंदरीतच 'अंतर' हा आपल्या दैनंदिन आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. स्थळ, काळ, वेळ, परिस्थिती यांचा सारासार विचार करून व्यक्तिपरत्वे कोणाला किती अंतरावर ठेवायचे व कोणाला अंतर द्यायचे नाही, याचे भान आपल्याला बाळगावे लागते व त्याचा आपल्या मनात निरंतर विचार चालू असतो. प्राप्त परिस्थितीमध्ये जरी सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे असले तरी मनामनातल्या अंतराचा आपण अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. कारण आज आपण सुरक्षित अंतर ठेवल्यामुळे उद्याचा भविष्यकाळ उज्ज्वल असला तरी मनामनातले अंतर कमी करण्याचा निश्चय आपण सदैव अंतरात बाळगला पाहिजे.
चला तर मग, जनाजनातले सुरक्षित अंतर राखू या. पण मनामनातले अंतर अव्याहतपणे कमी करून!!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई
Powered By Sangraha 9.0