शनिवार, दि. २५ /४ /२०२०
संचारबंदीच्या संकटकाळात फावला वेळ भरपूर असल्याने बाल्कनीमध्ये वारंवार फे-या होतात. बाल्कनीमध्ये कधीही जा, एक दृश्य नजरेस पडते. वेगवेगळ्या वयाचे कमी-अधिक शारीरिक क्षमतेचे, भिन्न शरीरयष्टीचे, निरनिराळ्या चालीचे तरुण-मध्यमवयीन- नववृद्ध व खरोखरीचे वृद्ध एकतर इमारतीतील जागेत गोल-गोलफे-या घालून प्रदक्षिणा घालीत असतात, नाहीतर शांत वाहनविरहित रस्त्यांवर व्यायाम करण्याच्या नावाखाली एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत फे-या मारीत असतात. काही अती हौशी व दूरदृष्टीचे सावध सज्जन दूरवर नजर पोचावी म्हणून गच्चीत प्रदक्षिणा घालीत असतात.
बरे, या चालक-यांना कुठलीही वेळ वर्ज्य नाही. सकाळच्या वेळी व्यायामासाठी, दुपारी व रात्री शतपावली म्हणून, तर सायंकाळी मनास प्रसन्न वाटावे या हेतूने प्रदक्षिणा चालूच असतात. आणि हो, या पथिकांचे पोशाखही अतिशय मनोरंजक असतात. पायात स्लिपर, अंगावर अर्धी चड्डी आणि टी- शर्ट अथवा गंजिफ्राॅक किंवा स्त्री असेल तर, घरच्याच कपड्यावर. माझ्या मते, असे पथिक त्यांच्या उदारमतवादी जीवनाच्या दृष्टिकोनाचे दर्शन घडवतात. तर काही अतिशय व्यवस्थित टापटीप. पायात स्पोर्टस् शूज, व्यायामाची ट्रॅक पँट व त्यावर टी-शर्ट. या चिजा पथिकांच्या शिस्तीच्या साचेबंद जीवनविषयक दृष्टिकोनाचे दर्शन घडवतात. अहो, माझ्या बघण्यात तर सुरक्षिततेसाठी हातात हातमोजे व भर उन्हाळ्यात डोक्यात लोकरीची कानटोपी घालून प्रदक्षिणा घालणारे चालकरी आहेत.
आता हे मात्र नक्की की चालणे हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो. एका अभ्यासाद्वारे असे समोर आले आहे की वेगात चालण्याने नैराश्यापासून मुक्ती मिळते. इटलीच्या फरेरा विश्वविद्यालयाच्या संशोधकांच्या अभ्यासानुसार वेगात चालण्याने रुग्णालयात दाखल होण्याची व तिथे जास्त काळ रहावं लागण्याची भीती कमी होते. शोधकर्ते म्हणाले की चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतर्स्त्रावी ग्रंथींचे कार्य सुधारते. एकंदरीत काय, चालणे माणसाच्या शरीराचे व मनाचे स्वास्थ्य उत्तम राखते. म्हणजेच समाजस्वास्थ्य सुदृढ राखले जाते.
वरील सर्व फायदे जरी खरे असले तरी या संचारबंदीच्या काळात या चालणा-यांना चालून चालून 'पदोपदी जळल्या या उष्मांकाच्या राशी' याचे भानही राहात नाही. कधीकधी 'चलते रहो' या भावनेने झपाटलेल्या व्यक्ती रस्त्याची लक्ष्मणरेषा कधी ओलांडतात, हे त्यांना स्वतःलाही कळत नाही, जोवर पोलिसांचा महाप्रसाद त्यांना मिळत नाही! पुराणकाळातील कथेत सांगितल्याप्रमाणे तीन पावले चालणा-या बटू रूपातील वामनाप्रमाणेच या पथिकांचा अभिनिवेष असतो. दिवसभराच्या ठरलेल्या प्रदक्षिणा मारून झाल्या की हे पथिक जगज्जेत्या सिकंदराप्रमाणे इतर पथिकांकडे पाहात असतात.
अहो, जरी चालणे व्यायाम म्हणून योग्य असले तरी रस्त्यावर पथिकांची गर्दी बघून इतर जनतेची पण भीड चेपली जाते व साथ सोवळ्याचे सामाजिक अंतर राखण्याचे तारतम्य नाहीसे होते. आणि अशा गर्दीत अफवांची साथ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मला वाटते, चलते रहो, जरूर चलते रहो! प्रदक्षिणा घालून रोज मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपा. ते सध्या देशहिताचेच आहे. पण आपल्या प्रदक्षिणा सैनिकांच्या भूमिकेतून असाव्यात. जसे की 'कदम कदम बढाये जा.'
हो, पण तेही घराभोवतीच, सुरक्षित अंतर राखून!
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई