संचयाचा महामेरू

22 Apr 2020 09:49:23
बुधवार, दि.२२/ ४/ २०२०
 
आजच्या या संचारबंदीच्या काळात खरेदीसाठी दुकानांच्या बाहेर लागलेल्या लांबच लांब रांगांचे दृष्य पाहून मन अचंबित झाले. या खरेदीदारांचे नियोजन कौशल्य पाहून त्यांची स्तुती करायची की हव्यासापोटी साठा करण्याच्या वृत्तीला फटकारायचे? बाजारात उपलब्ध असलेल्या जीवनावश्यक वस्तू केवळ आणि केवळ मलाच मिळायला हव्यात, या थाटात या खरेदीदारांची वस्तूंची खरेदी करून, साठा करून ठेवण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. समाजामध्ये काही भागात एका बाजूला धान्य कोणी मदतरूपात दिले तरच घरची चूल पेटतेय अशी परिस्थिती असताना वस्तूंचा साठा करण्याची वृत्ती विकृतीच म्हणावी का? तरी बरं, शासन व्यवस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती स्वतःकडे भरपूर अन्नधान्य साठा आहे, हे सांगून जनतेला आश्वस्त करत आहेत.     
  
 hoarding_1  H x                                         
 
अशी सामानाची अवाजवी खरेदी करून काय साधतात हे लोक? मानसशास्त्रज्ञांच्या मते, जी वस्तू मला हवी आहे ती माझ्याजवळ जास्तीत जास्त प्रमाणात असेल तर त्यातून मला मानसिक सुरक्षितता मिळते. यामुळेच सध्या खरेदीकरता झुंबड वाढली आहे. विषाणू संसर्गामुळे तयार झालेल्या अनिश्चित वातावरणात नागरिकांची उद्याची चिंता, भीती आणि दहशत या गोष्टींचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेला दिसतो. भविष्यात उपासमार होऊ नये म्हणून महत्त्वाच्या जिन्नसांची बेगमी अधिकाधिक कशी करता येईल, याकडे कल वाढला आहे. या एकाच महिन्यात चक्क तीन महिन्यांचे वाणसामान खरेदी केले गेले असून अनिश्चिततेच्या वातावरणात साठवणूक करणे हा नागरिकांचा स्थायीभाव असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण यातून साथ सोवळ्याच्या नियमांची पायमल्ली ते कृत्रिम तुटवडा- काळा बाजार या समस्याही उपस्थित होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ दिला जाणार नाही, हे सरकारचे आश्वासन नागरिकांनी गांभीर्याने घेतलेले नाही. या झुंबडखरेदीचा ताण पणन व्यवस्थेवर, साथ नियंत्रणावरही होऊ लागल्यामुळे त्याचे गांभीर्य वाढले आहे.
 
ज्याप्रमाणे वस्तू खरेदी करून साठवण करून अनिश्चिततेची भावना काही प्रमाणात कमी करते त्याचप्रमाणे खरेदी, मग ती कोणत्याही वस्तूची असो, कित्येकदा तणावापासून मुक्तता करण्याचे काम करते. वरचेवर खरेदी केल्याने मन आनंदित होते व काही काळ तणावातून मुक्ती मिळते. पण गर्दी करून तुटवडा निर्माण करणा-या खरेदीचे काय?रोगाचा प्रादुर्भाव पसरण्याच्या धोक्याचे काय? तो नियंत्रित कसा राहील?
 
 पूर्वीच्या काळी युद्धाच्या वेळी अन्न तुटवड्यामुळे आपल्या राष्ट्रपुरुषांनी जनतेला एक वेळ जेवण त्यागण्याचे आवाहन केले होते व त्याचा अनुनय समाजातील खूप मोठ्या घटकाने केला होता. पण आजचे चित्र अतिशय विदारक आहे. शासनाची उत्पादन व्यवस्था, पणन व्यवस्था तुटवडा होणार नाही असे वेळोवेळी आश्वस्त करत असूनसुद्धा साठेबाजीची प्रवृत्ती काही कमी होत नाही. केवळ मी- माझे- मला या स्वार्थी, स्वकेंद्रित प्रवृत्तीने अंध झालेल्या नागरिकांना समाजातील दुर्लक्षित, गरजू जनतेप्रती कोणतीही संवेदना राहिलेली नाही. ही राक्षसी भूक आज माणसाचे नैतिक अधःपतन कोणत्या हीन पातळीवर जाऊ शकते याचे द्योतक आहे. परंतु हे योग्य नव्हे. यातून समाजपुरुषाच्या मलीन अस्वास्थ्याचे दर्शन होते.
 
या साठेबाजी करणा-या मानसिकतेला वेळीच रोखले गेले पाहिजे.आन्यथा साठेबाजी- काळाबाजार व त्यातून निर्माण होणा-या अनेक आर्थिक व सामाजिक प्रश्नांची झळ आगामी काळात भारताला बसल्याशिवाय राहणार नाही.
चला, तर मग, संचय करणा-या खरेदीदारांचे उद्बोधन करू या. अनावश्यक खरेदी न करण्याच्या निश्चयाचा महामेरू उभारू या.
हो, पण तेसुध्दा घरात सुरक्षित राहून, गर्दी टाळून, साठेबाजांना आवाहन करून!
 
 
Powered By Sangraha 9.0