गंगा आली रे अंगणी!

Source :    Date :21-Apr-2020   
|
मंगळवार, दि.२१/ ४/ २०२०


ganga_1  H x W: 
 
संचारबंदीच्या दुस-या पर्वात डिजिटल वृत्तपत्र वाचत असताना राजापूरची गंगा अवतरल्याची बातमी वाचनात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर हे तालुक्याचे ठिकाण ऐतिहासिक काळात कोकणातील उत्तम बाजारपेठेचे ठिकाण होते. अर्जुना नदी ज्या ठिकाणी सागराला मिळते त्या ठिकाणी निर्माण झालेल्या खाडीवर हे बंदर असल्याने कोकणातील इतर बंदरांपेक्षा हे बंदर अधिक सुरक्षित होते. राजापुरात इंग्रजांची वखारही होती. त्याचे अवशेष आजही नदीच्या काठावर पडक्या इमारतीच्या रूपात पहावयास मिळतात. धूतपापेश्वर हे देवस्थान राजापुरातच आहे. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने हे शहर पावन झालेले आहे. राजापूरची गंगा ही तर ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध आहे.
 
एका उंच टेकडीवरील जमिनीला लागून असलेल्या १४ कुंडांतून अचानक पाणी भरून वाहू लागते. सर्वात महत्त्वाचे ते काशी कुंड. सर्वसाधारण तीन वर्षांतून एकदा हा निसर्ग चमत्कार पहायला मिळतो. या वाहत्या पाण्याला राजापूरची गंगा म्हणतात. येथे गायमुखातून वाहणा-या पाण्यात स्नान करण्यासाठी भाविक गर्दी करतात. ही गंगा उगम पावते आणि साधारणपणे तीन महिने राहते. पण हल्ली बदलत्या हवामानामुळे ही गंगा सर्वसाधारण एक ते दीड वर्षातच आलेली आढळून येते. राजापूरची गंगा आली की काशीच्या गंगा नदीचे पाणी कमी होते, यावर लोकांचा विश्वास आहे. शास्त्रज्ञांच्या मते भौतिकशास्त्रातील सायफनच्या तत्त्वानुसार गंगातीर्थावर पाणी अचानकपणे वाहायला सुरवात होते, तसेच हळूहळू लुप्त होते.
 
गंगेच्या आगमनाची बातमी वाचून मनात विचार आला, सध्या संपूर्ण भूतलावर मानव प्राणी सोडला तर या चराचरातील सर्व जीवसृष्टी आपापल्या गतीने विहार करीत आहे. कोणाच्याही गतीला पूर्णविराम मिळालेला नाही. तसेच हवा, वारा, पाणी, ऊन, पृथ्वीचे परिवलन व परिभ्रमण, चंद्राची गतिमानता, भूगर्भातील रसायनांचे चलनवलन, भूगर्भातील हालचाली, समुद्रापासून ते पृथ्वीच्या पोटापर्यंत होणारी सर्व जलचरसृष्टीची हालचाल, सर्वकाही व्यवस्थित चालू आहे. सर्व जीवसृष्टी मानवाला घरात कैद झालेले बघून आपल्यावर छद्मीपणाने हसते आहे. या सर्वाला मानवाने ढासळवलेला निसर्गाचा समतोल व मानवी स्वभावातील हावरटपणा व प्रचंड लालसा कारणीभूत आहेत.
 
माल्थस या लोकसंख्या शास्त्रज्ञाच्या मते, लोकसंख्या ही गुणाकार पद्धतीने वाढत असते व त्यास आवश्यक असणारी नैसर्गिक संसाधने ही अंकगणितीय पद्धतीने वाढत असतात. आणि म्हणूनच जेव्हा लोकसंख्येचा स्फोट होतो व वैश्विक पर्यावरणाचा समतोल ढासळतो तेव्हा निसर्ग रौद्र रूप धारण करतो व दुष्काळ, पूरजन्य परिस्थिती, भूकंप, त्सुनामी, महामारी आपल्या प्रत्ययास येतात. निसर्ग वेळीच वेळोवेळी धोक्याची घंटा वाजवून आपल्याला सावधगिरीचा इशारा देत असतो. पण दुर्दैवाने आपण आपल्या लालची स्वभावात एव्हढे मश्गूल असतो की धोक्याच्या घंटेची साधी नोंद घेण्याचेही भान आपणांस नसते. आणि मग परिस्थितीचा कडेलोट झाला की माणसाचे परिस्थितीवर कोणतेही नियंत्रण राहात नाही. प्रचंड हतबलता येते. सर्व ठप्प होऊन जाते. आजही संपूर्ण विश्वात तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
आपल्याला लहानपणापासून शिकवण्यात आले आहे की तृष्णा, हाव, हव्यास, लालसा हे दुःखास कारण आहेत. पण दुर्दैवाने आपणा सर्वांना त्याचा विसर पडल्याने अधिक, अजून अधिक, अजून अजून अधिकच्या मागे आपण धावत आहोत व पर्यावरणाचा पूर्णपणे चक्काचूर करून टाकलेला आहे आणि त्यातून प्रदूषणाचा भस्मासुर जागृत झाला आहे. अशा या सर्व भयग्रस्त पार्श्वभूमीवर आम्हा कोकणवासियांना गंगा आल्याची बातमी मनाला दिलासा देऊन जाते. निसर्गाने दिलेला एक शुभ संकेतच आहे तो. गंगेचे पवित्र पाणी सर्व जनतेच्या मनावरील निराशेचे सावट धुऊन काढेल व आशेचे नयनरम्य चित्र परत आपल्या डोळ्यात चमकू लागेल.
चला, तर मग मंडळी, या गंगेच्या पवित्र पाण्यात आपल्यातील अपप्रवृत्ती, हव्यास, तृष्णा सर्व नष्ट करू या व पर्यावरणाचा -हास थांबवू या. सर्व पर्यावरण समतोल बनवू या. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी! आपल्या उद्याच्या भावी पिढीसाठी!!
 
 हो, पण आज घरातच बसू या, गर्दी टाळू या, सुरक्षित राहू या, उद्याचे पर्यावरण हरित बनवण्यासाठी!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई