रविवार, दि.१९ / ४ /२०२०
विसाव्या शतकात लोकमान्य टिळकांनी केसरीमधून लिहिलेला 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' या शीर्षकाचा अग्रलेख ब्रिटिश शासनकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा होता. दुर्दैवाने आज कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक युद्धात भारतीय रयतेचे डोके ठिकाणावर आहे काय? असे खेदाने विचारावेसे वाटते. सरकारने वेळोवेळी जारी केलेल्या निर्देशानुसार जे भारतीय नागरिक सहकार्य करीत आहेत, प्रतिबंधात्मक उपाय करीत आहेत त्या भारतीय जनतेला उद्देशून हा लेख लिहिलेला नाही. प्रस्तुत लेख हा स्वतःला उगीचच बुद्धिवंत समजून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणा-या किंवा मूठभर नेत्यांच्या प्रक्षोभक वक्तव्यावरून झुंडशाही करणा-या माथेफिरूंच्या प्रबोधनासाठी आहे.
आत्ताच्या या संकटकाळात स्थळ, वेळ, काळ, परिस्थिती यांचे कोणतेही भान न ठेवता केवळ विरोधासाठी विरोध करणारे नागरिक म्हणजे अस्तनीतले निखारेच आहेत. पूर्वीच्या काळी राजकारण, सिनेमा, धार्मिक तंटे व खेळावर आधारित भावनिक राडेबाजी व्हायची. त्यात हल्ली आणखी एकाची भर पडली आहे. आणि ती म्हणजे समाज माध्यमाची. समाज माध्यमांच्या मार्फत आजकाल कोणतीही व्यक्ती परिणामांची तमा न बाळगता केवळ सवंग प्रसिद्धीसाठी तोंडाला येईल ते बरळते व समाजपुरुषाच्या स्वास्थ्यात ठिणगी टाकून देते. त्यांचे बिनडोक अनुयायी वेळोवेळी निखा-यावरील राख दूर करायला टपलेलेच असतात. या वादात निरर्थकता असते, तसेच हे वाद मर्यादाहीन असतात. कोणत्याही प्रकारची सुसंगती यात आढळत नाही. समाज माध्यमावरून घातलेल्या वादात कोणत्याही प्रकारची फलनिष्पत्ती नसते. आणि सर्वात कहर म्हणजे प्रत्येक विधानाला, भले मग ते परस्परविरोधी असले तरी, सप्रमाण सिद्धता असते. तर्कशास्त्र व गणित यांचा वापर करून व स्वतःला पटेल अशा तत्त्वज्ञानाची फोडणी देऊन परस्पर विरुद्ध विधाने सप्रमाण पटवून दिलेली असतात. बरं, असे संदेश समाज माध्यमांवर एकदा टाकून पोट भरत नाही म्हणून त्याची वारंवार पुनरावृत्ती होत असते. आणि मग असे असंयमित असमतोल विचार वरचेवर वाचले की आपण मग कुठच्यातरी एकांगी विचार प्रणालीचा बळी ठरून सारासार विचार गमावून बसतो. आणि माथेफिरूसारखे वर्तन दुर्दैवाने आपल्या हातून घडते व समाज स्वास्थ्य बिघडून जाते आणि त्यामुळे प्रशासनावर जनतेला नियंत्रित करण्यासाठी निष्कारण ताण येतो.
संचारबंदीच्या काळात उगाचच विनाकारण रस्त्यावर फिरणारे पथिक, सकारात्मक ऊर्जा निर्मितीसाठी दिवे लावण्याऐवजी फटाके वाजवणारे विक्षिप्त, अभिवादन करण्यासाठी थाळे वाजवत मिरवणुका काढणारी बिनडोक प्रजा, सामाजिक अंतर न राखता गर्दी करणारे व त्या गर्दीत सहभागी होणारे नेते, परिणामांची तमा न बाळगता सार्वजनिक जीवनात वावरणा-या कोरोनाग्रस्त ख्यातनाम व्यक्ती यांचे बेधुंद वर्तन पाहिले की मन उद्विग्न होते. चार दिवसांपूर्वी वांद्रे रेल्वे स्थानकात जमलेली लोकांची झुंड हे त्याचेच द्योतक आहे. जरी कितीही आवश्यक असले तरी केवळ अशक्यच व नियमबाह्य असतानासुद्धा कोणी एक नेता आश्वासन देतो व त्याच्या भूलथापांना बळी पडून गर्दी जमते. किती महाभयंकर प्रकार आहे हा! आणि त्याहून अधिक दैवदुर्विलास म्हणजे अशा घटनांचे राजकारण केले जाते. आपल्या समाजातील काही व्यक्तींनी खरोखरच सदसद्विवेक सोडल्याचे दिसून येते.
सरकारी यंत्रणांनी, मा. मुख्यमंत्र्यांनी, मा. पंतप्रधानांनी वारंवार आवाहन करूनसुद्धा घराबाहेर माणसे फिरतात म्हणजे काय? कोणी अधिकार दिला यांना समाजस्वास्थ्य बिघडवण्याचा? समाज माध्यमांतून प्रक्षोभक विधाने करून अथवा अफवा पसरवून, सरकारी यंत्रणांची निंदानालस्ती करून कोणत्या प्रकारचा आसुरी आनंद मिळवतात ही माणसे? सरकारी यंत्रणांनी आता निरनिराळ्या योजना आखून प्रादुर्भाव टाळणाच्या प्रभावी उपाययोजना करायच्या की अशा मूर्ख काही टाळक्यांच्या शंकांचे निरसन करायचे? पण आता हे सर्व थांबले पाहिजे. भारतीय नागरिकांनी सूचनांचे तंतोतंत पालन करून कोरोनाचा राक्षस गाडून टाकला पाहिजे. आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात सांगितल्याप्रमाणे 'जे खळांची व्यंकटी सांडो| तया सत्कर्मी रती वाढो||' हे जे कोणी समाज माध्यमांद्वारे दुही माजवणारे, भडकवणारे खलपुरुष आहेत, त्यांची वाईट वृत्ती निघून जावो व चांगल्या विचारांची- सत्कर्माची वृत्ती त्यांच्यामध्ये वाढो.
चला तर मग, अशा खलपुरुषांचे प्रबोधन करू या. पण तेसुद्धा घरात राहून, सुरक्षित बसून, अपप्रवृत्तींना सत्प्रवृत्तीच्या विचारांची साद घालून!
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई