हा छंद जीवाला लावी पिसे!

Source :    Date :11-Jul-2020   
|
शनिवार, दि. ११/ ७/ २०२०
 
साधारणतः गेले तीन महिन्यांपक्षा जास्त काळ मी सातत्याने नियमितपणे दररोज लेख लेखनाचे काम करीत आहे. मी काही सिद्धहस्त लेखक नाही आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक तर त्याहूनही नाही. परंतु तरीही नियमितपणे लेखन माझ्या हातून कसे काय झाले? बरं या सर्वांमध्ये एकाही विषयाची पुनरावृत्ती झाली नाही. कोणती प्रेरणा यामागे होती? यावर जेव्हा मी चिंतन करते तेव्हा मला जाणवते की शालेय जीवनापासून माझ्या आईने व माझ्या शिक्षकांनी माझ्यामध्ये रुजवलेली वाचनाची व निबंध लेखनाची सवय कारणीभूत आहे. किंबहुना माझ्या घरातील वातावरणच असे होते की आम्ही कुटुंबातील सर्व सदस्य प्रत्येक घटनेवर व्यक्त होत असू. मग ती घटना कौटुंबिक असो वा सामाजिक वा राजकीय! प्रत्येकजण हिरीरीने आपली मते मांडत असे व त्यातूनच समाजमान्य रीतीने अभिव्यक्त होण्याची सवय लागली. एव्हढेच नव्हे तर त्याचा छंदच जडला म्हणा की!
 

hobby_1  H x W:
 
 
छंद म्हणजे फावल्या वेळात स्वतःच्या आनंदासाठी नियमितपणे करण्याची गोष्ट. अशी छंदाची ढोबळमानाने व्याख्या करता येईल. साधारणतः वयाच्या १०व्या- ११व्या वर्षापासून म्हणजेच किशोरपूर्व अवस्थेपासून बालकाचे मन निरनिराळ्या छंदाचा वेध घेत असते व त्याला पालकांनी वा शिक्षकांनी योग्य दिशा दिली तर बालकाचे मन निश्चितपणे चांगला छंद जोपासण्याकडे वळते. छंद जोपासणे हा मानवी गुण आहे. छंद हे मानवी जीवनाचे अभिनव अंग आहे. प्रत्येक व्यक्तीस काही ना काही आवड असते व त्याचे छंदात रूपांतर होते. कसलाच छंद नाही अशी व्यक्ती सापडणं विरळाच! छंद असणं हे वेगळेच रसायन आहे. एकसमान छंद जोपासणारे अनेक जण एकत्र येऊन कधीकधी एखादा समूह स्थापन करतात आणि असे कित्येक समूह मिळून आपला छंद जोपासताना आपल्याला समाजात दिसतात. रिकामा किंवा फुरसतीचा वेळ घालवण्यासाठी म्हणून माणूस जे जे काही करतो ते सर्व छंद या संकल्पनेत मोडते.
 
रोजची धावपळ, ताणतणाव, जगण्यातले वादविवाद, घड्याळाच्या काट्यावर क्षण न् क्षण अवलंबून असणा-या आयुष्यात जोपासलेला छंद माणसाच्या आयुष्यात जादूची कांडी फिरवण्याचे काम करतो व मानवी जीवनातील दुःखावर, छंदामुळे व छंदामुळे मनननिर्मितीमध्ये गुंतल्याने दुःखावर आपसूकच फुंकर घातली जाते. म्हणूनच छंद हे शीण घालवण्याचं उत्तम साधन आहे.
 
छंद स्वतःची ओळख स्वतःलाच करून देतात. शाळेत एक सारखाच अभ्यास करणा-या मुलांतील एखादाच छान चित्र काढतो किंवा गोड स्वरात गाणं गुणगुणतच आणि अनायसेच त्याला लक्षात येते, मी कोणीतरी स्पेशल आहे. छंद हा आनंद निर्माण करण्याचे माध्यम असून छंद माणसं जोडण्याचे निमित्त आहे. छंद भविष्यातील करिअरची सुरवात होऊ शकते. छंद म्हणून संगणक हॅक करणारे बिल गेटस् आज मायक्रोसाॅफ्ट या साम्राज्याचे अनभिषिक्त सम्राट आहेत. छंद निराशेला, व्यसनांना आपल्यापासून लांब ठेवतात. छंदच माणसाला उत्साह देतात, कणखर बनवतात व माणसाला आत्मविश्वास मिळवून देतात. छंदांनी माणसाला ओळख मिळते. छंद माणूसपण टिकवतच नाहीत तर वाढवतातही! माणसाला स्वतःला शोधण्याची, स्वतःला व्यक्त करण्याची संधी देतात. जगण्यावर प्रेम करायला शिकवतात. छंद जीवनाचा, निसर्गाचा, माणसाच्या मनाचा शोध घ्यायला शिकवतात व त्यातून जगण्याची अनोखी दृष्टी लाभते. तहानभूक हरवून छंद जोपासण्याची प्रवृत्ती कधी जीवाला पिसे लावून जाते ते कळतही नाही.
 
आल्व्हिन रोझेनफेल्ड या प्रसिद्ध बालमानसतज्ज्ञांच्या मते छंदाची सुरवात पालकांनीच मुले चार- पाच वर्षांची असल्यापासून करावी की जेणेकरून आपल्या पालकांच्या छंदाचे निरीक्षण करून बालक त्यात रस घेऊ लागेल व तोच त्याचा छंद बनेल. एखाद्या छंदाची गोडी मुलांना आपसूकच निर्माण व्हायला हवी. ती आवड लादून उपयोगी नसते तर उलटपक्षी त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करावे लागते. वयानुसार मुलांचे छंद बदलत राहतात हे ही नक्की! एखाद्या छंदासाठी विशिष्ट कौशल्य आत्मसात करावे लागत असेल तर ते शिक्षण आनंददायी झाले पाहिजे हे अत्यावश्यक आहे. मुलांच्या आवडीसाठी त्यांच्याबरोबरच पालकांनाही सवड काढावी लागते तेव्हाच मुलांना व पालकांना आनंद मिळतो.
 
'व्यक्ती तितक्या प्रकृती' या उक्तीप्रमाणे विश्वात अनंत प्रकारचे छंद आहेत. कित्येक वेळेला स्वसुखासाठी सुरू झालेला छंद शेवटी स्वतःबरोबरच इतरांच्या उपयोगास येतो, तेव्हा होणारा आनंद हा अवर्णनीय असतो. आपली आवड जोपासताना मिळालेलं छोटंसं यशही समाधान देऊन जातं आणि मग आणखी यश मिळवायची आवड तयार होते अन् काहीतरी गवसल्याचं सुख खुणावू लागतं.
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई