शुक्रवार, दि. ५/ ६ /२०२०
काल मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे गेल्यावर्षी आषाढीच्या पंढरपूरच्या वारीत सहभागी होऊन घेतलेल्या अनुभवाच्या संस्मरणीय आठवणी जागृत झाल्या. पण दुर्दैवाने यंदा काही कोरोना विषाणूच्या साथीमुळे नेहमीसारखी मोठ्या प्रमाणात वारी आयोजित केली जाणार नाही आणि त्यामुळे यंदाच्या वर्षात मलाही भक्तिरसात नाहून निघण्याच्या अनुभवापासून वंचित राहावे लागणार आहे.
वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी एक सामुदायिक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ व कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत. वारकरी संप्रदायात लहान- मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरीधर्म असे म्हणतात. वारकरीधर्मालाच भागवतधर्म असेही म्हटले जाते. 'पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान| आणिक दर्शन, विठोबाचे||' या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळे पंढरपूरची वारी ही प्रत्येक वारकरी आबालवृद्धाच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे. संत साहित्याचे अभ्यासक डाॅ. सदानंद मोरे यांच्या मते, पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे. वारीतून या वारकरी संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यासारख्या संतांनी वारीची परंपरा पुढे चालवली. ज्ञानोबा व तुकोबा या संतांच्या बरोबरीनेच निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, संत एकनाथ, सावता माळी या संतांच्या पालख्याही दर्शनासाठी पंढरीला येतात. महाराष्ट्राच्या विविध भागातून पालख्या येतात व वारकरी भाविक अन्नपाणी, शेतीभाती, कौटुंबिक जबाबदा-या, रोजीरोटी सारे काही विसरून विठोबारायाच्या भेटीच्या असीम इच्छेने शरीराला होणारे अपार कष्ट विसरून मैलोनमैल चालत पंढरपुरात दाखल होतो व त्यामुळे त्याची 'अजि म्या परब्रह्म पाहिले' ही भावना अनुभवतो. केवळ पांडुरंगावरची श्रद्धा आणि अपार श्रद्धाच हा चमत्कार अनेक वर्षे घडवत आहे.
परंतु दुर्दैवाने यावर्षी या परंपरेला खीळ बसणार आहे. काही नास्तिक मनोवृत्तीचे लोक आज विचारत आहेत, "आता कुठे गेला तुमचा पांडुरंग? का नाही तो मदत करत?" पण अशा अश्रद्धाळू माणसांच्या वक्तव्याकडे दुर्लक्षच केलेले बरे! त्या बिचा-या कूपमंडूक वृत्तीच्या लोकांना कळतही नसते खरा विठ्ठल- म्हणजे अपार प्रेमाची, श्रद्धेची, मदतीची, आपुलकीची, अगाध विश्वासाची, विश्वाच्या कल्याणाची भावना म्हणजे विठ्ठल- जी प्रत्येक वारक-याच्या मनामनात व त्याच्या रक्तारक्तात भिनलेली असते. पंढरपूरचा विठोबा हा त्याचे केवळ प्रतिनिधित्व करतो आणि आज या वैश्विक महामारीच्या काळात या सर्व भावनांची अभिव्यक्ती होत आहे- जरी आज टाळ मृदुंगाची थाप शांत झाली असली, वारीची पायवाट व विशेषतः दिवेघाट सामसूम असला, चंद्रभागेचा काठ सुनासुना असला, नाम संकीर्तनाचा निनाद ऐकू येत नसला तरीसुद्धा वारीचे रिंगण आज अनेक इस्पितळांमधून रुग्णसेवेच्या रूपाने, समाजबांधवांना विविध प्रकारच्या सहकार्याच्या मदतीने पूर्ण होत आहे. परंतु हे सर्व विठोबाचे उत्कट दर्शन घेण्यासाठी केवळ डोळे असून उपयोग नाही तर त्यासाठी कारुण्याची व संवेदनशील दृष्टी असणे गरजेचे आहे. आज कोरोनाविरोधाच्या युद्धात लढणारे योद्धे, मग ते डाॅक्टर, वैद्यकीय कर्मचारी, परिचारिका, पोलीस बांधव, अत्यावश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देणारे नागरिक सर्व विठ्ठलाचीच तर रूपे आहेत. तो जगन्नियंता पांडुरंग यांचीच रूपे घेऊन आपले विश्वरूप दर्शन सर्वांना घडवत आहे. फक्त आपण त्यासाठी डोळस असणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच पांडुरंग सांगतो, "पंढरपुरात| पंढरीही नाही| अंतरात पाही| दिसेल ती|| यावर्षी आगळी| पंढरीची वारी| प्रत्येकाच्या दारी| विठू येई||
आणि म्हणूनच विविध रूपाने आपल्या दारी येणा-या भगवंताचे सजगतेने दर्शन घेऊ या व भागवत धर्माची ध्वजा फडकवत ठेवू या! आणि म्हणूनच आपण सर्वांनी काळजी घेऊ या, विठ्ठलाचे काम हलके करू या! सुरक्षित वावर वाढवू या, कोरोनाला पार हद्दपार करू या!
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई