निर्वाणाची शोकांतिका!

Source :    Date :04-Jun-2020   
|
गुरुवार, दि. ४  /६ /२०२०
 
दुपारच्या वेळेत वृत्तपत्र वाचत असताना स्मशानात काम करणा-या महापालिकेच्या कर्मचा-यांच्या संदर्भात एक बातमी वाचनात आली . त्यांची कर्मकहाणी अत्यंत दुर्दैवी आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने स्मशानभूमीमध्ये त्याचा ताण पडू लागला आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत तीन ते चार तासांची प्रतीक्षा करावी लागते. आयुष्यभर विविध कारणांसाठी रांग लावणा-या मुंबईकरांवर शेवटच्या महाप्रवासासाठीसुद्धा रांग लावण्याचे नशिबी येत आहे. मृतदेहालासुद्धा रांग चुकलेली नाही. ही केविलवाणी स्थिती आहे सर्वसामान्य कारणाने मृत्युमुखी पडलेल्याची! त्याहून भयावह स्थिती आहे कोरोना विषाणूने बाधित मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची!

ambulance_1  H  
 
वास्तविक पाहता स्मशानात काम करण्यासाठी चोवीस तास तीन कामगार असणे अपेक्षित असते. पण प्रत्यक्षात सरकारी नोकर कपातीच्या धोरणाचा याही ठिकाणी फटका बसलेला दिसतो. प्रत्यक्षात नियुक्त कामगार आहेत दोन. त्यामुळे प्रत्येकाला रोज दोन पाळ्यांमध्ये काम करावे लागते. गेल्या पाच वर्षांपासून मुंबईमध्ये २०० मजूर, ८ भट्टीचालक, ३० नोंदणी कारकून व ४ इलेक्ट्रिशियन यांच्या जागा रिकाम्या आहेत. स्मशानात काम करणारा महापालिकेचा कर्मचारी आधीच त्रासलेला असतो. त्यातच अत्यावश्यक सेवेत काम करणा-या या कर्मचा-याला जादा काम करावे लागते. त्यामुळे खरे पाहता त्यांचा प्रश्न जास्त संवेदनशीलपणे हाताळला गेला पाहिजे. पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.
 
स्मशानात काम करणा-या कर्मचा-यांनी दिलेल्या माहितीनुसार कधीकधी स्मशानाबाहेर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेला रुग्ण घेऊन येणा-या शववाहिन्यांची रांग लागते.४- ५ शववाहिन्या एकापाठोपाठ एक येऊन उभ्या असतात. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करेपर्यंत बाहेर दुसरा मृतदेह हजर असतो. एकट्या मध्य मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत आतापर्यंत १५० हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कोरोनाबाधित मृतदेह स्मशानात आणल्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेला तो मृतदेह थेट भट्टीजवळ आणून कर्मचारी स्ट्रेचरवरून उतरवून तो इलेक्ट्रिक भट्टीच्या आत सरकवतात. पूर्वी अंत्यदर्शनासाठी रांग लागायची. पण आता मृतदेह कधी नजरेआड होतो याची प्रतीक्षा असते. ना हार, ना नमस्कार, ना कोणते संस्कार! कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. पण कोणी कर्मचा-यांना पुढे येऊन मदत करण्याचे धैर्य दाखवत नाही. कोरोना रोगाबाबत जनतेमध्ये प्रचंड भीती आहे. काही नातेवाईक तिरस्काराच्या भावनेने येतात.मध्यमवर्गीय नातेवाईक मृतदेहासोबत स्मशानात येतात. पण उच्चभ्रू लोक येत नाहीत. असे निरीक्षण एका कर्मचा-याने नोंदवले आहे. अंत्यविधी पार पाडल्यानंतर सरकारी निर्देशानुसार सर्व कर्मचारी त्यांचे पीपीई कीट, हातमोजे व टोप्या डिझेल टाकून जाळून टाकतात व पूर्णपणे सर्व कर्मचा-यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. शहरात हे शक्य होते. परंतु शहरापासून दूरवर अशा प्रकारची साधने अभावानेच पुरवली जात आहेत. याबाबतीत प्रशासनाने केलेली हेळसांड निश्चितच क्षम्य नाही.
 
वास्तविक पाहता जन्म आणि मृत्यू यामधील काळ म्हणजे जीवन! आणि माणूस अखंड जीवनभर आपला 'शेवटचा' दिन गोड व्हावा, सुखेनैव असावा म्हणून सर्वसाधारणतः स्वकर्माची विचारसरणी डोळ्यासमोर ठेवून जीवन व्यतित करत असतो. परंतु निर्वाणाची अशी भयानक शोकांतिका हृदय पिळवटून टाकते. जरी मृत्यू हे माणसाच्या आयुष्यात शाश्वत व अंतिम सत्य असले तरी असा शेवट हा सदैव खेदजनकच आहे. शत्रूवरसुद्धा अशी वेळ येता कामा नये. कै. अण्णा भाऊ साठे यांची एक कथा आहे 'स्मशानातील सोनं' या नावाची! त्यात कथेचा नायक म्हणतो, "खरी भुतं घरात राहतात आणि मेलेली त्या मसणवट्यात कुजतात. भुतांची पैदास गावात होते, रानात नाही." या वाक्यातील गर्भितार्थ जर गृहीत धरला तर परिस्थिती खूपच निंदनीय व दुःखद आहे. संवेदनशील मनाला खूपच त्रास देणारे आहे.
 
म्हणूनच प्रार्थना करू या की कोरोना विषाणू विश्वातून हद्दपार होऊ दे व सर्वांचे कल्याण होऊ दे. सर्वांना सुखाचे, आनंदाचे दिवस येऊ देत! आणि मंडळी, आपण सर्वांनी सुरक्षित वावर वाढवू या, कोरोनाला हरवू या!!
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई