...वो फिर नही आते!

Source :    Date :30-Jun-2020   
|
मंगळवार, दि. ३० /६/ २०२०
 
रात्रीच्या वेळी सर्व आवराआवर झाल्यावर शांतपणे चिंतन करीत बसले असताना दूरवरून येणा-या गीताच्या ओळी कानावर पडत होत्या. 'आप की कसम' चित्रपटातील प्रसिद्ध नट राजेश खन्ना याच्यावर चित्रित केलेले ख्यातनाम गीतकार आनंद बक्षी यांनी शब्दबद्ध केलेले गीत होते ते. 'जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम, वो फिर नही आते!' किती अर्थपूर्ण आहे ही काव्यरचना! हे गीत मी पूर्वी अनेकदा ऐकले होते. पण का नकळे, त्या दिवशी त्या गीताच्या शब्दांनी मनाचा ठाव घेतला. हृदयाला भिडले म्हणा ना ते शब्द!
 
sun_1  H x W: 0
 
खरोखरीच आपल्या आयुष्यात अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या एकदा हातातून म्हणा किंवा आयुष्यातून म्हणा, निसटून गेल्या की पुन्हा काही हाताला नाही लागत. ना कधी त्या परत अनुभवाला येत. त्यांच्या जाण्याचं वैषम्य जीवाला चटका लावून जातं. स्वतःच्याच मस्तीत मश्गुल राहून कधी कळत कधी नकळतपणे हातून गोष्टी निसटून जातात त्या कायमच्याच! परत कधीही न येण्यासाठी! आणि त्यांचे महत्त्व उमगते ते त्या निघून गेल्यावरती! आणि तेव्हा पश्चात्ताप करण्याशिवाय हाती काही राहिलेले नसते.
 
या प्रकारची एक गोष्ट म्हणजे शब्द. कधी कधी अनवधानाने म्हणा किंवा हेतुपुरस्सर आपण शब्दफेक करून समोरच्या व्यक्तीचे मन दुखावतो. समोरच्या व्यक्तीच्या मनावर त्यामुळे कायमस्वरूपी ओरखडे उमटतात. होणा-या परिणामांचा विचार न करता केलेली कटू शब्दांची शब्दफेक केवळ समोरच्या व्यक्तीचे मन व्यथित करते. एव्हढेच नव्हे तर परस्पर नातेसंबंधसुद्धा त्यामुळे धोक्यात येतात. आणि त्यानंतर कितीही वेळा चूक उमगल्याने माफीची अथवा क्षमेची याचना केली तरीसुद्धा तोंडून गेलेले कटू शब्द ना परत घेता येत, ना झालेल्या चुकीचे परिमार्जन करता येत. म्हणूनच शब्दरूपी वाग्बाण सोडण्यापूर्वी सजग राहणे हिताचे आहे. कारण 'वो फिर नही आते!'
 
आपण सर्वच माणसे आपापल्या आयुष्यात बाल्यावस्था, पौगंडावस्था, युवावस्था, प्रौढावस्था व वार्धक्य या वयाच्या निरनिराळ्या अवस्थांमधून जात असतो. परंतु जबाबदारीने वागायला हवे ते युवावस्थेमध्ये! परंतु दुर्दैवाने आपल्यापैकी बरेचजण युवावस्थेमध्ये शरीरात असलेल्या प्रचंड ताकदीच्या जोरावर बेफिकीर असतात. व उन्मादाच्या बळावर नको त्या चुका करून बसतात. उन्मादाचा माज माणसाला कुसंगत व त्यातून येणारी व्यसनाधिनता यांच्याकडे घेऊन जातो. वाईट सवयी, व्यसने यांची किंमत माणसाला पुढे उतायवयात भोगावी लागतेच. बेदरकार वृत्तीमुळे माणूस अतिशय आत्मकेंद्रीत होतो व मी- माझा- मला यामध्ये एव्हढा गुंग होतो की आपली कर्तव्ये, जबाबदा-या याचा त्याला विसर पडतो व वार्धक्यामध्ये या सर्व चुका जेव्हा उमगतात तेव्हा वेळ हातची निघून गेलेली असते. म्हणूनच युवकांनो, यौवनाच्या जोरावर बेदरकार होऊ नका, यौवनाचा पुरेपूर उपभोग घ्या. पण आपल्या कर्तव्याचे भान ठेवून. कारण, वो फिर नही आते!
 
आपल्या जीवनामध्ये कधी कधी असे झालेले असते की काही माणसांशी आपले चांगलेच मेतकूट जमते! खूप छान मैत्री होते. ती व्यक्ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून जाते. कळतनकळतपणे आपल्या जीवनावर त्या व्यक्तीची छाप पडत असते. ती व्यक्ती आपल्याबरोबर नसणे आपण सहनच करू शकत नाही. अनमोल व्यक्तींच्या रूपात अनेक मोहरा आपल्या आयुष्यात असतात.परंतु यशाची विविध शिखरे पादाक्रांत करीत असताना काहीतरी संशयाचे म्हणा किंवा प्रखर इगोचे विघ्न आड येते व आपल्या मैत्रीची इमारत उद्ध्वस्त होते. आता ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून पूर्णपणे हद्दपार झालेली असते. त्यावाचून अडत काहीच नसते. वरकरणी जीवनात बिघाड काहीच नसतो. पण मनात कोठेतरी त्याची सल बोचत असते. अस्वस्थ व्हायला होत असते. तेव्हा वाचकहो, वेळीच याची आपण नोंद घेतली पाहिजे. वेळप्रसंगी मानापमान बाजूला ठेवून मैत्रीच्या नात्यावर बसलेला धुरळा समजुतीने पुसून काढला पाहिजे. आपली मोहोर धुऊन पुसून स्वच्छ चकचकीत केली पाहिजे. कारण, वो फिर नही आते!
 
प्रत्येक मनुष्यदेहाला जन्म घेण्यासाठी प्रयोजन असावे लागते. आपल्या जन्माचे प्रयोजन काय? आपली इतिकर्तव्यता कोणती? हे प्रत्येक मनुष्याने ओळखून त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात कार्यक्रमणा करावी व विश्वकल्याणाचे पवित्र कार्य परिपूर्ण पाडावे व मरणांती स्वआत्मा- परमात्म्याच्या मिलनाचा म्हणजेच मोक्षाचा मार्ग पत्करावा. कारण भावभावना व बुद्धी यांचे वरदान मिळालेला अलौकिक नरदेह एकदाच प्राप्त होतो की ज्यायोगे मोक्षपदाचे वरदान मिळू शकते. चौ-याऐंशी लक्ष योनी पार केल्यानंतर मिळणा-या मनुष्यदेहाच्या जन्माचे सोने करण्याची नितांत आवश्यकता आहे. भारतीय अध्यात्मानुसार मनुष्यजन्मालाही हेच तत्त्व लागू आहे- 'वो फिर नही आते!'
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई