हासून ते पहाणे...

Source :    Date :29-Jun-2020   
|
सोमवार, दि. २९ / ६/ २०२०
 
सकाळच्या वेळी बागेत बसून वृत्तपत्रातील बातम्या वाचताना एकाएकी मोठमोठ्याने हसण्याचा आवाज कानी पडला. आवाजाच्या दिशेने पाहिले असता काही माणसे एकत्र येऊन मोठमोठ्याने हसत असल्याचे दृश्य दिसले व डोक्यात प्रकाश पडला. हास्यक्लबचे सदस्य त्यांचे नियमितपणे करावयाचे हसण्याचे कार्य पार पाडत होते. आणि त्यांचे ते विनाकारण मोठमोठ्याने हसणे बघून मलाही हसू आवरेनासे झाले. का बरे अशी ही माणसे विनाकारण हसतात? काय असतो हास्यक्लब? त्याचे प्रयोजन तरी काय? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा जी माहिती मिळाली ती तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रस्तुत लेखात मी प्रयत्न करीत आहे.
 

Laugh_1  H x W: 
 
हास्य काय आहे? आनंद, समाधान, गंमत वगैरे व्यक्त करणारा, तोंडाच्या कडा किंचित वर उचलून होणारा चेह-यावरील आविर्भाव! अशी शब्दकोशामध्ये व्याख्या दिलेली आहे. बायबलमधील ईवोब या व्यक्तीने आपल्या शत्रूविषयी असे म्हटले, 'ते विश्वासहीन होत असत तेव्हा मी त्यांच्याकडे हास्यमुख करीत असे आणि माझे मुखतेज ते उतरीत नसत.' ईवोबच्या चेह-यावरील मुखतेज म्हणजे त्याचा आनंदी किंवा हसरा चेहरा असावा. हास्यामुळे राग, द्वेष, अविश्वास कशाकशाला मनात थारा राहात नाही. मन आनंदाने बागडू लागते. हास्याचेसुद्धा विविध प्रकार आहेत. प्रेयसीच्या मुखचंद्राकडे बघून तिच्या भावना समजल्याने तिला आश्वस्त करणारे स्मितहास्य तर समोरच्याचे न पटल्याने पण प्रखरपणे विरोध दर्शवता येत नसल्याने केलेले छद्मी हास्य! विनोदाचा गर्भितार्थ समजल्याने चेह-यावर आलेले खळाळते हास्य तर आजकालच्या रिअॅलिटी शोजमध्ये दृष्टीस पडणारे खोटे खोटे केलेले सात मजली हास्य! एक मात्र नक्की की कोणतेही हास्य मनाला आनंदच देते व भावनांची समाजमान्य रीतीने अभिव्यक्ती करते. हास्याने मनातली भीती दूर होते आणि आपली इतरांशी मैत्री वाढते. खरे पाहता, हसणे हा शब्दावाचून मनातल्या भावना व्यक्त करण्याचा मार्ग आहे आणि जेव्हा हास्य खरे असते तेव्हा त्याचा शेवट आनंदाश्रूंमध्ये झाल्याशिवाय राहात नाही.
 
हसणे हे सर्व व्याधींचे सर्वोत्तम औषध आहे असे मानले जाते. हसण्याचे जसे शारीरिक व मानसिक फायदे आहेत तसे सामाजिक फायदेही आहेत. हसल्यावर पूर्ण शरीर मोकळे होते व जवळपास पुढची ४५ मिनिटे स्नायू मोकळे होतात. हसण्यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते. शरीरात एन्डोरफिन्स नावाचे संप्रेरक तयार होते की ज्यामुळे चित्त आनंदी राहते व चिडचिड होत नाही. शरीराचे रक्ताभिसरण सुधारून माणसाचे हृदय सुदृढ राहते. हसण्यामुळे शरीरातील उष्मांकाचे ज्वलन होते की ज्यायोगे वजनही नियंत्रित राहते. हसणा-या व्यक्तीकडे लोक आकर्षित होतात व त्यामुळे सोबत हसणा-या व्यक्तींमध्ये चांगले दृढ नाते निर्माण होते. हस-या समूहात संघभावना वाढीस लागून कामे लवकर पूर्ण होतात. मनुष्याला हसण्याने एक अलौकिक ऊर्जा प्राप्त होते. सर्व प्रकारचे मानसिक ताण, दुःख हसण्याने कमी होतातच पण हसण्यामुळे संकटांना सामोरे जाण्याची तयारी होते.
 
चेहरा हसरा असणे, आनंदात राहणे खूप महत्त्वाचे आहे. ज्ञान देणा-याचे जेव्हढे महत्त्व वाटत नाही, तेव्हढे महत्त्व हसविणा-याचे वाटते. जीवनात हसणे हे ज्ञानातून चिंतनातूनच आलेले असावे. सर्वात चांगले हसणे, व्यायामाच्या खोटे खोटे जोरजोराने हसणे हे सर्व शक्य असले तरी हसण्याचा खरा फायदा स्वतःवर हसण्यानेच मिळू शकतो. म्हणूनच मंडळी, सदा हसत रहा, आनंद वाटत रहा!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई