मंगळवार, दि. २/ ६ /२०२०
संचारबंदीच्या- टाळेबंदीच्या काळात दुपारच्या वेळात वाचन करत असताना एक दोहा वाचनात आला. तो असा-
बहु बीती, थोडी रही, पल पल रही बिहाई|
एक पलक के कारने, ना कलंक लग जाई||
ह्या दोह्याच्या कसोटीवर हा संचारबंदीचा काळ तपासून बघितला तर लक्षात येते की गेला जवळजवळ दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ आपण घरात बसून आहोत. स्वतःला व पर्यायाने समाजाला कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून व संक्रमणापासून सुरक्षित ठेवले आहे. जसजशी टाळेबंदी काढून घेतली जात आहे तसतसा संयम सुटत चाललाय. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक प्रश्न आ वासून समोर उभे आहेत. एकीकडे रोगाच्या प्रसाराचा वेग वाढतोय व दुसरीकडे जनता निराशेच्या गर्तेत ढकलली जातेय. त्यातच काही ठिकाणी संचारबंदीचे निर्बंध शिथिल केल्याने गर्दी झाल्याने साथ सोवळ्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही भागात मद्य विक्रीची दुकाने उघडल्याने मद्यपी रस्त्यावर उतरलेत व त्यांचा एक निराळाच गंमतशीर गोंधळ सुरू झाला आहे.
वास्तविक पाहता आताच खरे अती सावध राहायचे दिवस सुरू होणार आहेत. काही ठिकाणी शिथिलता तर काही ठिकाणी संचारबंदीच्या निर्बंधात वाढ. कोरोना विषाणूबाबतच्या मनःस्थिती द्विधा करणा-या अफवा कानावर येत आहेत. ज्याप्रमाणे दिवसभर उपवास केल्यानंतर तो सोडायला घाई होते, मन अधीर झालेले असते तशी अनेकांना अनेक प्रकारे झालेली उपासमार संपवण्याची तीव्र घाई संचारबंदीचे निर्बंध शिथिल झाल्यावर होईल. आणि तरी कितीही तीव्र इच्छा झाली तरी हाॅटेल, सिनेमागृहे, माॅल, बागा, सभा- संमेलने, जेवणावळी यासारखी ठिकाणे टाळलीच पाहिजेत. जेथे जाणे उपयोगाचे नाही अशा गोष्टी दैनंदिन जीवनातून वर्ज्य केल्याच पाहिजेत. कितीही आकर्षक, मोहाच्या घटना, बाबी असल्या तरी त्या सध्यातरी आपण आपल्या आयुष्यातून हद्दपार करायला हव्यात. गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण ब-याच अनावश्यक सवयी लावून घेतल्या होत्या. त्या आता संचारबंदीच्या काळात मोडल्या आहेत. त्या सवयींमधील निरर्थकता आपल्या लक्षात आली आहे. भांडवलशाही देश निसर्गाला अनुरूप आणि निसर्गावर अवलंबून असलेले अर्थकारण बाजूला टाकत निसर्गाचा बळी घेणारे घातक अर्थकारण व त्याला पूरक असे राजकारण करीत राहिले आणि आपण त्याला बळी पडलो. पण आता त्यातून आपण स्वतःला बाहेर काढू या.
मंडळी, हे संकटाचे, संचारबंदीचे, साथीचे दिवस काही कायमस्वरूपी नाहीत. आपली पृथ्वीसुद्धा स्थिर नाही. एका जागेवर कायम नाही. मग परिस्थिती कशी कायम राहील? हेही दिवस नक्की जातील. आपण धडधाकटपणे मस्त जगतोय. हातात 4G मोबाईल आहे. घरात खायला अन्न आहे. राहायला सुरक्षित निवारा आहे. आपण सुरक्षित आहोत, खातोय, पितोय, सुखाच्या वाटेवर आहोत, हे काय कमी आहे की काय? गेले कित्येक दिवस आपण सर्वांनी संयम राखला आहे.मोठ्या धैर्याने संकटाला तोंड दिले आहे. देव न करो आणि असे न होवो, पण आता या शेवटच्या काही दिवसांसाठी आपला संयम संपेल आणि आपली एक चूक आपल्या घरादाराला, मित्रपरिवाराला व अनुषंगाने संपूर्ण समाजाला महागात पडेल व आतापर्यंत केलेली मेहनत मातीमोल ठरेल.
म्हणून बिनधास्त राहू नका, गाफील राहू नका. उलट जास्त सावधानता बाळगा. दिवस परीक्षेचे आहेत. आणि म्हणून आत्मसंयम तुटू देऊ नका, मनोधैर्य वाढवा! काळजी घ्या; पण काळजीग्रस्त होऊ नका! सुरक्षित वावर वाढवा! कोरोनाला हरवा!!
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई