बुधवार, दि. ६/ ५/ २०२०
कालपासून महाराष्ट्रात काही ठिकाणी निर्बंध शिथिल झाल्याची बातमी वाचनात आली. अतिसंक्रमित परिसरातसुद्धा प्रतिबंधित क्षेत्र वगळता काही ठिकाणी संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. आणि आताच खरे परीक्षेचे दिवस सुरू झाले आहेत, याची जाणीव होऊन मनात भीती अजूनच गडद झाली. खरी परीक्षा तर संचारबंदी पूर्णपणे उठल्यावरच आहे. कोविड१९ हा विषाणू म्हणजे काही दिवस मुक्कामाला आलेला पाहुणा नाही की त्याला गाडीत बसवून दिलं की आपण सुटलो, अशी समजूत करून घ्यायला! हा आपल्यापासून कदाचित दूर झालेला असेल किंवा कदाचित आपल्याजवळ कुठेतरी दबा धरून बसलेलाही असेल. आपण एखादी चूक केली, थोडं गाफील राहिलो की हा हल्ला केल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच हा विषाणू आपल्यापासून चार हात दूरच राहील याची दक्षता घ्यायची, आज आणि संचारबंदी पूर्णपणे संपल्यावरही!
संचारबंदी संपली की हळूहळू सगळे व्यवहार सुरू होतील. किंबहुना तसे करावेच लागतील. आणि त्यानंतरच आपली परीक्षा सुरू होईल. म्हणूनच आताच ठरवून टाकायचं की कोणकोणती काळजी घ्यायची आणि कशी कशी जीवनशैली बदलायची. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली प्रतिकारशक्ती वाढवणे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने या संदर्भात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदात सांगितलेले काही उपाय प्रसारित केले आहेत. त्याचे तंतोतंत अनुपालन करणे आज अत्यावश्यक आहे. आयुर्वेदात निरोगी आणि सुखी जीवन जगण्यासाठी निसर्गातील गोष्टींचा औषधांसारखा वापर करण्याचे मूलभूत तत्त्व वापरले जाते. त्यामुळे आयुर्वेद प्रणालीनुसार सर्वांनी दिवसभर कोमट पाणी प्यावे. थंड पाणी अजिबात पिण्यास वापरू नये. दररोजच्या दिनचर्येत किमान तीस मिनिटांचा अवधी शारीरिक व्यायामासाठी ठेवावा. उदा. योगासने, प्राणायाम वगैरे. रोजच्या स्वयंपाकात हळद, जिरे, धणे व लसूण यांचा वापर करावा. रोज सकाळी एक चमचा च्यवनप्राश खावा. मधुमेही व्यक्तींनी साखरविरहित च्यवनप्राश खावा. दिवसातून एकदा किंवा दोनदा वनौषधीयुक्त चहा प्यावा. तसेच तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ आणि मनुका घालून तयार केलेला काढा प्यावा. तसेच १५० मिली गरम दुधात अर्धा चमचा हळद पावडर घालून दिवसातून एकदा किंवा दोनदा प्यावे. रोज सकाळी व संध्याकाळी दोन्ही नाकपुड्यांमध्ये तिळाचे किंवा खोब-याचे तेल किंवा शुद्ध तूप लावावे. तसेच एक मोठा चमचा भरून तिळाचे किंवा खोब-याचे तेल तोंडात घेऊन ते न पिता २ ते ३ मिनिटे घोळवून नंतर थुंकून टाकून कोमट पाण्याने चुळा भरून टाकाव्यात. दिवसातून एकदा ताजी पुदिन्याची पाने किंवा ओवा घातलेल्या गरम पाण्याचा वाफारा घ्यावा. हे सर्व उपाय प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी असून कोरोना शरीरात घुसू नये म्हणून याचा जरूर अवलंब करावा
याचबरोबर वैयक्तिक, सामाजिक स्वच्छतेचे नियम अधिक सावधानतेने पाळले पाहिजेत. सामाजिक अंतर राखण्याचे व्यसनच लावून घ्यायला पाहिजे. खाण्यापिण्याच्या गोष्टी चोखंदळपणे स्वच्छ करून वापरल्या पाहिजेत. मास्क हा अपरिहार्यच आहे. उठसूठ हस्तांदोलन, गळाभेट, मुके घेणे आता सर्व बंदच! सार्वजनिक कार्यक्रम शक्यतो टाळावेत. गर्दीत जाऊच नये! बाहेरचं पाकिटबंद स्वतःही खाऊ नका व मुलांनाही देऊ नका! घरचं खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढेल आणि आयुष्यही निरामय बनेल. आता नवे नियम, नवे विचार आणि नवी दक्षता घेतच जगण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एकदा बदललेली जीवनशैली स्वीकारली तर जगण्यात अधिक आनंद निर्माण होईल. आजार आणि मृत्यूचं भय कमी होईल. संचारबंदीच्या नंतरच्या परीक्षेच्या काळात आपण बदललो तर भीती उरणारच नाही. आपण आतापर्यंत जगलो तो होता स्वैराचार. आता निसर्गाच सांगतोय की सुधारा आता.
चला तर मग, नवीन जीवनशैलीचा स्वीकार करू या! मस्त जगू या, आनंदी जगू या! पण आज घरातच राहू या, सुरक्षित राहू या! गर्दी टाळू या उद्याच्या भयमुक्त वातावरणात निरामय आयुष्य जगण्यासाठी!
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई