सोमवार, दि. ४/ ५/ २०२०
संचारबंदी- टाळेबंदीच्या काळात कोरोना विषाणूशी युद्ध करून त्याचा खातमा करण्यासाठी डाॅक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, परिचारिका, बँक कर्मचारी, सरकारी कर्मचारी महान योद्ध्याप्रमाणे त्यांची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या कर्तृत्वामुळे रोगाचे प्रमाण नियंत्रणात राखण्याचा प्रयत्न होत आहे. या संचारबंदीच्या काळात बाकी सर्व आबालवृद्ध घरात बसून स्वतःचे म्हणजेच पर्यायाने समाजाचेही रोग संक्रमित होण्यापासून रक्षण करीत आहेत.
परंतु या सर्व समाजघटकांत लहान मुले, पौगांडावस्थेतील अजाण मुले यांचाही समावेश आहे आणि त्यांचेही कौटुंबिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य राखण्यात मोलाचे योगदान आहे. इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बहुतांशी पूर्ण झाल्या असून इयत्ता पहिली ते इयत्ता नववी व इयत्ता अकरावीच्या परीक्षा सरकारने रद्द केल्या असून वर्षभरातील शैक्षणिक कामगिरीवर त्यांचा निकाल लावण्यात येणार आहे. सुरवातीच्या काळात जरी यामुळे ती मुले खूष वाटली तरी साधारण दीड महिन्यापेक्षा जास्त काळ घरात बसल्याने आज प्रश्नांकित झाली आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर कोणताही परीणाम होणार नसून, याउलट त्यांना पूर्णवेळ पालकांसमावेत घरातच काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. पालकांना मुलांची विविध कौशल्येही जाणून घेण्यास मदत होत आहे. त्यामुळे त्याचा फायदाही होणार असल्याचा आनंद शिक्षणतज्ज्ञांना आहे. महत्त्वाच्या शालेय टप्प्यावर असलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर, शिक्षकांकडून शिकवण्यात येत असलेल्या अभ्यासापासून जवळपास महिन्याभरापेक्षा जास्त काळ वंचित राहिल्याने, निश्चितच परिणाम होणार असल्याची चिंता शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी ऑन-लाईन पद्धतीने घरबसल्या शिकवणे चालू झाले आहे. परंतु याचा पाहिजे तसा परिणाम विद्यार्थ्यांमध्ये दिसत नाही. यामध्ये म्हणावा तितका संवाद विद्यार्थी व शिक्षक यामध्ये होत नाही. तसेच युट्यूबच्या माध्यमातूनही अभ्यासाला सुरवात झाली आहे. परंतु दुर्दैवाने मानसिक विकलांग मुले, गतिमंद मुले, मतिमंद मुले यांच्या शाळा, त्यांची सुधारणा केंद्रे सध्या बंद असल्याने अशी मुले विचलित झाली आहेत. मानसिकरित्या ती तणावाखाली आहेत व घरातील पालकांना त्यांची विशेष काळजी घ्यावी लागत आहे. जरी संचारबंदीमुळे आई- वडील व मुले यांचा जास्त मेळ जमत असला तरी त्यांच्या मित्र- मैत्रिणींच्या भेटीपासून- त्यांच्याबरोबर खेळण्यापासून ती वंचित आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून मोबाईलवरील खेळ व दूरदर्शनचा वापर वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांना अपाय होतो आहे हे नक्की!
त्याचप्रमाणे घरात बसून सारखे नवनवीन पदार्थ खाणे- व्यायाम नाही व मैदानी खेळही नाहीत. त्यामुळे या काळात पालकांची व इतर कुटुंबियांची जबाबदारी वाढली आहे. आपल्या पाल्याला उत्तमोत्तम सिनेमा, नाटक, साहित्य यांची ओळख करून देण्याची हीच वेळ आहे. त्यांना संघभावना- कुटुंबियांप्रती कर्तव्य- जबाबदारी- घरातील कामात सहकार्य- मदत करणे या मूल्यांची ओळख या संचारबंदीच्या काळातच आपण पालक त्यांना करून देऊ शकतो. समाजाप्रती आपले कर्तव्य, राष्ट्राप्रती आपली निष्ठा, गरजूंना संकटकाळात मदत करणे ही जीवनमूल्ये आपण पालक आपल्या वर्तनातून त्यांना दाखवून देऊन त्यांच्या मनात सकारात्मक मूल्यांची बीजे रोवू शकतो. घरातील लहानसहान कामात मुलांना सहभागी करून घेऊन श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व आपण त्यांना पटवून देऊ शकतो. आपल्या पाल्यांबरोबर बैठे खेळ खेळून परस्परांतील नातेसंबंध मजबूत व सौहार्दपूर्ण करू शकतो. जास्तीत जास्त वेळ जो आपण एरवी देऊ शकत नाही, तो या काळात देऊन पाल्य- पालक यातील भावनिक बंध अधिक मजबूत होऊ शकतात.
एक मात्र नक्की, या कठीण प्रसंगी या मुलांच्या संयमाचे, जबाबदारीने वागण्याचे आणि त्यांच्या समंजसपणाचे आपण सगळ्यांनीच कौतुक केले पाहिजे. एरवी सुट्टीमध्ये कधीही एक तास एका जागेवर न बसणारी ही मुले आज दीड महिन्यापेक्षा जास्त काळ फक्त घरात बसून आहेत. आपले मन विविध गोष्टीत रमवत आहेत. स्वतःबरोबरच घरातील मंडळींचीही करमणूक करीत आहेत. आणि तेही कसली किरकिर, विशेष मागणी, बाहेर जाण्याचा हट्ट न करता! कुठून आला एव्हढा शहाणपणा या लेकरांमध्ये असा अचानक? ही बच्चे कंपनी खरंच कौतुकास्पद आहेत. आपल्या या छोट्या योद्ध्यांसाठी पाठीवर एक शाबासकी निश्चितच गरजेची आहे.
मुलांनो, काळजी करू नका. आलेले संकट नक्कीच जाईल. थोडा संयम अजून बाळगा. आजपर्यंत जसे शहाण्यासारखे वागलात तसेच वागा. घरात बसून कामे करा, अभ्यास करा, खेळा, नाचा आणि घरातच दंगा करा. पण जरा जपून! संचारबंदीचा काळ नक्की संपेल आणि लवकरच तुम्ही सिद्ध व्हाल मोकळ्या हवेत बागडण्यासाठी! धावण्यासाठी!
पण आज घरात रहा, सुरक्षित रहा! हट्ट करणे टाळा!
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई