हम करे राष्ट्र आराधन!

Source :    Date :29-May-2020   
|
शुक्रवार, दि. २९/ ५/ २०२०
 
संचारबंदीच्या काळात दूरचित्रवाणीवर बातम्या बघत असताना ज्या समालोचकांनी सतत ज्या स्वयंसेवकांवर, त्यांच्या विचारप्रणालीवर कायम टीकेची झोड उठवली त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी कोरोना युद्धातील काळात केलेल्या मदतीच्या योगदानाविषयी बातमी ऐकली. ती बातमी ऐकून अभिमानाने ऊर भरून आला. खरेखुरे स्वयंसेवक कोणत्याही कष्टांची तमा न बाळगता केवळ मानवसेवेसाठी कोरोना युद्धात योद्ध्याची भूमिका बजावत आहेत. त्या सर्व ईश्वररूपी स्वयंसेवकांना वंदन!
 

RSS serving Mankind_1&nbs 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील एक राजकारण निरपेक्ष संघटना आहे. हिंदू समाजातील विविध गटांत ऐक्य निर्माण करून भारतवर्षाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी धर्म आणि संस्कृतीच्या पायावर हिंदू समाजाचे पुनरुज्जीवन घडवून आणणे, हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे. सर्वधर्मीय राष्ट्रवादाऐवजी हिंदू राष्ट्रवादाच्या तत्त्वप्रणालीवर आधारलेली ही संघटना १९२५ च्या विजयादशमीला नागपूरला परमपूज्य कै. डाॅ. केशव बळीराम हेडगेवार यांनी सुरू केली. १९२६ च्या एप्रिलमध्ये २६ सभासदांच्या बैठकीत या संघटनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे नाव देण्यात आले. संघ स्वयंसेवकांचे एकत्रीकरण शाखा या नावाने होते. या शाखा सकाळी व संध्याकाळी भरतात. त्यांचा समारोप 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे' या संघप्रार्थनेने होतो. वर्ध्याच्या कै. लक्ष्मीबाई केळकरांनी १९३६ साली संघाच्या धर्तीवरच पण स्त्रियांसाठी वेगळी राष्ट्र सेविका समिती प.पू. कै डाॅ. हेडगेवारांच्या अनुमतीने सुरू केली. सरसंघचालक, सरकार्यवाह, सहसरकार्यवाह, प्रचार- प्रमुख, बौद्धिक प्रमुख आणि व्यवस्था प्रमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय नेतृत्व करतात. पंचवीस सदस्यांची केंद्रीय कार्यकारिणी धोरणविषयक निर्णय घेते. कामकाजाच्या सोयीसाठी संघाने देशाचे क्षेत्र- प्रांत अशी सात विभाजने केली असून कार्याच्या दृष्टीने संघाचे जिल्हे व त्यापुढे तालुक्यांत विभागणी केली आहे.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक हिंदुत्ववादी सामाजिक व कौटुंबिक संघटना असून सामाजिक व सांस्कृतिक संस्था या स्वरूपात ही संघटना काम करीत असते. नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मदतकार्यासाठी आणि पुनर्वसनातील भूमिकेसाठी या संघाचे स्वयंसेवक अत्यंत समर्पित होऊन मदत करीत असतात. जागृत, सशक्त, संघटित, समर्थ राष्ट्राच्या निर्माणासाठी संघाचे अथक, अविरत प्रयत्न सुरू आहेत. निद्रिस्त भारत पुन्हा जागृत व्हावा यासाठी असंख्य उपसंस्थांद्वारे अनेक माध्यमांतून कार्य सुरू असते. सर्वस्पर्शित, सर्वव्यापी व सर्वग्राही होऊन देशाच्या कणाकणातून राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी संघ सतत प्रयत्नशील असतो. भारतीय मजदूर संघ, सेवा भारती, विद्वत् भारती, स्वदेशी जागरण मंच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, स्वामी विवेकानंद सेवा समिती, जनकल्याण समिती, हिंदू स्वयंसेवक संघ (परदेशात) यासारख्या अनेक संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था आहेत, ज्या जनहितासाठी अविरतपणे झगडत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोरोनाचा मुकाबला करणारी जी अभूतपूर्व यंत्रणा देशभरामध्ये उभी केली आहे तिला तोड नाही. संघाच्या समाजसेवेचा यज्ञ हा देशभर अव्याहत सुरू असून स्वयंसेवक सर्वेक्षणाचे काम, मास्क वाटपाचे काम, औषधे वाटपाचे काम, धनधान्य वाटपाचे काम, कम्युनिटी किचन उभारून जेवण वाटपाचे काम, गरजूंना आवश्यक ती मदत पुरवणे, स्थलांतरित श्रमिकांना गावी जाण्यासाठी मदत करणे यासारख्या शेकडो कामांमध्ये योगदान देत आहेत. स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून झोपडपट्टया, चाळी जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव भरपूर आहे तिथे प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षणाचे काम करून तेथील स्थानिक प्रशासनाला मदत करीत आहेत. एव्हढेच नव्हे तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एक काॅल सेंटर उभारून त्यातून समन्वय साधून मदतीचे काम अव्याहतपणे सुरू आहे. मुंबई शहरातसुद्धा संघाने मोठे सेवाकार्य सुरू केले आहे. दररोज १ लाख ६० हजार नागरिकांना जेवण पुरवले जात आहे. त्यासाठी ३४ कम्युनिटी किचन उभारली आहेत. आतापर्यंत जवळपास ८० हजार धान्य किटस् वाटप केले आहेत. एका किटमध्ये १२ ते १५ दिवस पुरेल इतके धान्य असते. कोरोनाच्या भीतीपायी कर्मचारी येत नसल्याने अनेक दवाखाने, इस्पितळे, प्रसुतीगृहे बंद आहेत. ती सुरू करण्यासाठी संघाने मोठा पुढाकार घेतला आहे. त्या ठिकाणच्या कर्मचा-यांना 'निरामय सेवा फाऊंडेशन'च्या माध्यमातून पीपीई किट आणि अन्य उपकरणांचा पुरवठा केला जात आहे. विविध सेवा पुरवण्यासाठी जवळपास साडेतीन हजार संघ स्वयंसेवक कार्यरत आहेत. विविध सामाजिक संघटनांशी समन्वय राखण्याचे काम केले जात आहे.
 
प्रत्येक शाखेत फडकवल्या जाणा-या ध्वजाला गुरू मानणारा स्वयंसेवक आज जीवाची बाजी लावून शासकीय यंत्रणेबरोबर कोरोना विरुद्धच्या युद्धात उतरला असून दाटीवाटीच्या वस्तीत कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी प्राणपणाने लढत आहे. जगातील सर्वात मोठी संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील प्रत्येक स्वयंसेवक संघशिस्त व अनुशासन यास कटिबद्ध राहून मानवतेच्या कार्ययज्ञात योगदान देत आहे. या सर्व स्वयंसेवकांना शतशः प्रणाम!
 
आणि मंडळी, तुम्हाला आवाहन की आपण सर्व घरात रहा! सुरक्षित रहा! आरोग्याची काळजी घ्या!
 
....डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई