रविवार, दि. २४/ ५/ २०२०
मध्यंतरीच्या काळात ई- वृत्तपत्र वाचत असताना मराठी रंगभूमीवरील एका प्रथितयश कलाकाराने कोरोनाच्या संकटामुळे रोजगार धोक्यात आल्याने पडद्यामागच्या कलाकारांना ठोस रकमेची आर्थिक मदत केल्याची बातमी वाचनात आली. रंगभूमीवरील मिळवलेल्या यशात पडद्यामागच्या कलाकारांचाही सिंहाचा वाटा आहे, याची जाणीव ठेवून त्यांना आर्थिक संकटाच्या काळात मदत करून या कलाकाराने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती. या कलाकारास मानाचा मुजरा!
गेल्या ६० दिवसांपेक्षा जास्त दिवस सिनेमा व नाटक या क्षेत्रातील काम पूर्णतः बंद झालेले आहे. दिग्गज नटांपासून ते अगदी स्पाॅटबाॅयपर्यंत, तसेच नेपथ्यकार, लाईटवाले, कॅमेरावाले, मेकअप करणारे, इतर तंत्रज्ञ सर्वच काम ठप्प असल्याने आज घरी आहेत. सिनेमाचं शूटींग म्हणजे हातावरचं पोट! इथे माणसे दैनंदिन रोजगाराच्या हिशेबाने काम करतात. म्हणजे ज्या दिवशी काम त्या दिवसाचाच रोजगार मिळणार. रिकामं राहणं कोणालाच परवडत नाही. दोन महिने काम बंद म्हणजे दोन महिन्याचा रोजगार बंद. छायाचित्रण व संकलनाचे काम झाले की नवीन भाग चॅनलवर दाखवला जातो. तेव्हा त्यात ज्या जाहिराती दाखवल्या जातात ते चॅनलचं उत्पन्न आणि त्यातूनच निर्मात्याला पैसे मिळतात. आणि तेच पुढे काम करणा-या सर्वांना मिळतात. आता टि. व्ही. चॅनल्सची प्रेक्षकसंख्या इतकी कमी झाली आहे की जाहिरातीचे उत्पन्न जवळजवळ शून्यावर आले आहे. मुळात जाहिरातदार जाहिरात करतो ते आपलं ऊत्पादन लोकांनी विकत घ्यावं म्हणून. पण जर दुकानेच बंद असतील तर कोण काय आणि कुठून विकत घेणार? आणि मग जाहिरातीही का कराव्यात?
भारतातील सर्व सिनेमा आणि नाट्यगृहे साथीमुळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रदर्शित झालेल्या सिनेमांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. कोरोना विषाणूमुळे अनेक मोठ्या सिनेमा निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख पुढे ढकलल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्याचप्रमाणे चित्रपटगृह बराच काळ बंद राहणार असल्याने चित्रपटगृह मालकांना पण मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागत आहे. सर्व सिनेमे उशिराने प्रदर्शित होतील. त्यामुळे लहान चित्रपटांचा मोठा तोटा होईल. लहान चित्रपट प्रदर्शित होतील की नाही, याबाबत साशंकता आहे.
कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे मार्च महिन्यापासून नाट्य रसिकांनी नाटकाकडे पाठ फिरवली व नाट्यगृहे ओस पडल्याने नाटकांचे प्रयोग रद्द होऊ लागले व नाट्य रंगकर्मी आर्थिक संकटाच्या खाईत लोटले गेले. त्याचप्रमाणे या दरम्यान परदेश दौ-यावर असलेल्या नाटकांनाही याचा फटका बसलेला आहे. त्याचप्रमाणे वसंत ऋतूनिमित्त आयोजित केलेले निरनिराळे वसंतोत्सवातील कार्यक्रम, व्याख्याने, चर्चासत्रे, परिषदा, पुरस्कार सोहळे यासारखे सांस्कृतिक कार्यक्रमही एकतर कोरोनामुळे रद्द केले गेले किंवा पुढे ढकलण्यात आले आहेत. एकंदरीत काय तर मानवाच्या सर्व प्रकारच्या करमणुकीच्या, मनोरंजनाच्या कार्यक्रमांना सध्यातरी स्वल्पविराम मिळालेला आहे.
प्रत्येक व्यक्ती सामान्यतः आपल्या दैनंदिन जीवनातील काही ठरावीक वेळ उदरनिर्वाह आणि कौटुंबिक जबाबदा-यांच्या व आर्थिक अनुषंगाने विशिष्ट कामकाजामध्ये व्यतित केल्यानंतर निद्रा-आहारादी बाबी पूर्ण केल्यानंतर जेव्हढा फावला वेळ मिळतो तो वेळ ती व्यक्ती आपल्या आवडीनिवडीच्या गोष्टींमध्ये घालवू शकते की ज्यायोगे मनास विरंगुळा वा आनंद मिळू शकेल. अशा प्रकारे श्रमपरिहार, मौज किंवा आत्मप्रगटीकरण यासारख्या सुप्त प्रेरणांनी केल्या जाणा-या फावल्या वेळातील कृतींची गणना मनोरंजन वा करमणूक या सदराखाली करता येईल. यात वेगवेगळे छंद, खेळ, नाटक- चित्रपटादी करमणुकीची साधने, लेखन- वाचनादी सवयी यांचा अंतर्भाव करता येतो. उत्तम प्रतीचे मनोरंजन हे व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यास पोषक असते. रोजच्या चाकोरीबद्ध जीवनातील शिणवटा व कंटाळा दूर करून मनाला नवचैतन्य व ताजेपणा आणि शरीराला जोम व कार्यशक्ती मिळवून देण्याचे प्रयोजन उत्तम मनोरंजनाद्वारे विनासायास साधले जाते. अशा प्रकारे निरनिराळे छंद वा खेळ यांची जोपासना केल्याने व्यक्तीच्या सुप्त गुणांना वाव मिळून व्यक्तिमत्वाचा विकास साधला जातो. त्यामुळे जनतेची अभिरुची संपन्न होऊन त्यायोगे एकूण समाजाचाच सांस्कृतिक स्तर उंचावण्यास मदत होते. सार्वजनिक ठिकाणी मनोविनोदनार्थ अनेक व्यक्तींच्या एकत्र येण्यातून त्यांच्यामध्ये खेळीमेळीचे परस्परसंबंध जोपासले जातात व निकोप स्वास्थ्यकारक समाजजीवनाच्या दृष्टीने ते लाभदायक ठरते. आधुनिक काळात तर मनोरंजनाची गरज वाढत्या प्रमाणावर प्रकर्षाने जाणवू लागली आहे. विसाव्या शतकातील गतिमान व यंत्रबद्ध अशा आधुनिक जीवनातील ताण तणावाचे विसर्जन, कार्यपद्धतीतील विशेषीकरण- यांत्रिकीकरण यामुळे व्यक्तिगत व सामाजिक पातळीवर मनोरंजनाच्या गरजा प्रत्यही वाढत चालल्या असल्याचे निदर्शनास येते. मनोरंजनाचे हे समाजशास्त्रीय- मानसशास्त्रीय महत्त्व आधुनिक काळात अधोरेखित झाले असले तरी दुर्दैवाने आज चित्रपट, नाटक, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम सर्वच ठप्प झाले आहे. हे सर्व कधी सुरू होणार हा गहन प्रश्न आहे. परंतु हे सर्व सुरू होण्याची नितांत आवश्यकता आहे हे नि:संशय!
तेव्हा मंडळी, सध्यातरी आपण घरात राहू या, सुरक्षित राहू या, मनोरंजनाचे कार्यक्रम नव्याने चालू होण्याची वाट पाहू या!
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई