|| अचपळ मन माझे नावरे आवरिता ||

Source :    Date :18-May-2020   
|
सोमवार, दि. १८/ ५/२०२०
 
संचारबंदीच्या काळात रिकाम्या वेळेत संचारबंदीच्या परिणामांचा विचार करता करता जनतेच्या मानसिक आरोग्याचा धोका वाढला आहे, हे लक्षात आले. कोरोनाच्या भीतीने मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होत असून अनेकजण नैराश्याच्या खाईत ढकलले जात आहेत. मुंबईतील प्रख्यात रुग्णालयातील मानसोपचार विभागात मंत्रचळीपणा (ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर) या आजाराच्या रुग्णसंख्येत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती मानसोपचार तज्ज्ञांनी दिली. कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर अनेकांना या आजाराची लागण होईल अशी भीती आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या मतानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जसा वाढतोय, तसा नागरिकांच्या वागणुकीवर परिणाम दिसून येतोय. आर्थिक संकट आणि मूलभूत सोयी- सुविधांचा अभाव यामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी चिंतेपायी अतिप्रमाणात हात धुतले जात आहेत. गरज नसतानाही एखादी गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त करणे, हा एक मानसिक आजार आहे. वैद्यकीय भाषेत त्याला 'ओसीडी' असे म्हणतात. या रुग्णांमध्ये आता वाढ होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे बहुतेक रुग्णांमध्ये उदासीनता, बेचैनी, काम करायला कंटाळा येणे, असुरक्षिततेची भावना, खूप वेळ विचार करण्यात घालवणे, पराकोटीचे नैराश्य व त्यातून घडणारे गुन्हे अशा तक्रारी येत आहेत. असे असताना अनेकांना मानसिक आजार झाला आहे याची जाणीवही झालेली नसते.
 

sea_1  H x W: 0
 
 
टाळेबंदीमुळे दोन- तीन पिढ्या शारीरिकदृष्ट्या घरात एकत्रित राहात असल्या तरी प्रत्येकजण आपापल्या आभासी विश्वात दंग आहे. ई- लर्निंग असले तरी मुले सलग ५- ६ तास त्यात गुंतणार नाहीत. त्यांचे सवंगडी आपापल्या घरात बंद आहेत. पालकांना पाल्य म्हणतील तेव्हा आणि तितका वेळ त्यांच्याबरोबर खेळता येत नाही. त्यामुळे पालक आणि मुले दोघांचीही चिडचिड वाढत आहे. दुसरीकडे वृद्ध पालकांना आलेल्या साध्या शिंक आणि खोकल्यानेही मन धास्तावत आहे. ज्यांच्या घरात अपंग, मतिमंद, गतिमंद, मनोरुग्ण आहेत, त्यांची अवस्था तर खूपच बिकट आहे. अशा परिस्थितीत दिलासा ठरणा-या सामाजिक संस्था, आधार गट, समूह पुनर्वसन केंद्र यांच्यापासून कोरोनाने आपल्याला दूर केले आहे ही भावनाच त्यांच्या मनाला पोखरून काढत आहे. त्यामुळे त्यांच्यातील हिंसक प्रवृत्ती कित्येकदा उग्र रूप धारण करते व कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडते. याचा दृष्य- अदृष्य परिणाम मानसिक शांतीवर होणे, खूपच स्वाभाविक आहे. भविष्यात वेगवेगळ्या वयोगटातील आणि वेगवेगळ्या आर्थिक- सामाजिक स्तरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर मानसिक आरोग्य सेवा- सुविधांची गरज लागणार आहे, हे नक्की! वर्तमानाची 'नांदी' ही क्षीण स्वरूपात आत्ताच ऐकू यायला लागली आहे. परिणामी आत्महत्या, कुटुंब- विघटन, चोरी- दरोडे, मानवी तस्करी, घरेलू हिंसाचार यासारख्या समाज विघातक प्रवृत्ती आक्राळ- विक्राळ स्वरूप धारण करतील.
  
कोरोनाच्या सावटाखाली जर्मनीतील एका राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केलेली आत्महत्या किंवा नाशिक- अकोल्यातील नागरिकांनी केलेल्या आत्महत्या या साथीच्या आजाराचे मानसिक आरोग्यावर झालेल्या दुष्परिणामाचे हिमनगीय टोकच दर्शवत आहेत. हे मानसिक रोगाचे संकट टाळायचे असेल तर आतापासूनच लोकांचे मानसिक आरोग्य संतुलित राखण्यासाठी सर्व स्तरांतून पावले उचलणे गरजेचे आहे. समुपदेशनाचे गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करणे, कौटुंबिक कलह सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्ते निर्माण करून त्यांना प्रशिक्षण देणे, वेळप्रसंगी धाक दाखवून, शिक्षा करून व चांगल्या वर्तणुकीचे कौतुक करून जनतेचे वर्तनाचे संतुलन साधता येईल. जीवन खूप सुंदर आहे आणि ते पूरेपूर उपभोगण्यासाठी कणखर व संतुलित मन हाच उपचार आहे. आजाराच्या भुलभुलैय्यामध्ये मनाने अडकून न पडता, कोणतीही अनामिक भीती न बाळगता, कोरोनाच्या संकटाची अवाजवी चिंता न करता सामर्थ्यवान मनाने मनातील भयगंड व मनाच्या व्याधी दूर सारायला हव्यात.
 
चला तर मग, आजपासून, चंचल असलेल्या नात कुठलाही घसरणीवर नेणारा विचार आलाय, हे जाणवताक्षणी न आवरणारे मन, पर्याय शोधून बदलता येतंय का, ते तपासू या. पण मंडळी, हे सर्व घरातच बसून, सुरक्षित राहून, कोरोनाचा भयगंड दूर सारून!
 
...डाॅ अनुजा पळसुलेदेसाई