याचसाठी का केला होता अट्टाहास?

Source :    Date :11-May-2020   
|
सोमवार, दि. ११ /५/ २०२०
 
टाळेबंदीमुळे जालना येथील सळई निर्मिती कारखान्यात उत्पादन थांबवण्यात आल्याने मध्य प्रदेशात पायी जाण्यासाठी निघालेल्या सोळा मजुरांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. हे सर्व मजूर मूळ गावी जाण्यासाठी रेल्वे रुळावरून चालत होते. चालून थकल्याने रात्री ते रुळावरच झोपले होते. शुक्रवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास जाणा-या मालगाडीखाली ते चिरडले गेले. अतिशय विचित्र अशा या अपघातात या मजुरांचा दुर्दैवी करुण अंत झाला. हृदय पिळवटून टाकणारी अशी ही घटना!
  

AR_1  H x W: 0
 
जेव्हा या घटनेवर दुःखद अंतःकरणाने विचार केला जातो तेव्हा एकच लक्षात येते की परिस्थितीपुढे प्रचंड हतबलता, अगतिकता दिसून येते. टाळेबंदीमुळे मालाला मागणी नाही, कच्चा माल उपलब्ध नाही, वस्तूंची विक्री नाही, त्यामुळे कारखानदारांनी मजुरांना कामावर येऊ नका, असे सांगितले. काम नाही, त्यामुळे रोजगार नाही, पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. वर साथीच्या रोगाच्या लागणीची मानेवर टांगती तलवार, कुटुंबियांची काळजी, दूरवर असणा-या घराची तीव्रपणे ओढ हे सर्व घटक मजुरांना घरी चालत जायला भाग पाडतात. मी- माझे कुटुंब- माझा गोतावळा या सर्वांवरचे असीम प्रेम आणि त्या सर्वांची काळजी मजुरांना पाऊल उचलण्यास ऊद्युक्त करतात. कारखानदार आणि मजूर दोघांच्या परिस्थितीचा विचार केला तर दोघेही आपापल्या परीने योग्य आहेत. कारखानदारांकडे, छोट्या उद्योजकांकडे भरपूर साठवून ठेवलेली पुंजी नसते. व्यवसायातला पैसा हा खेळता असतो. त्यामुळे कधी कधी इच्छा नसूनसुद्धा व्यवसायाचे गणित न जमल्याने नाईलाजाने कामगारांना कामावर येऊ नका असे सांगावे लागते. त्याचवेळी हातावर पोट असलेले मजूर रोजगार नाही म्हणून विमनस्क अवस्थेत जातात.
 
देशभर मजुरांचे लोंढे गावाकडे निघाल्याने कोरोनाची लागण होण्याची शक्यता बळावली आहे. आपले मजूर परत यावेत, असे मनोमन कोणत्याही राज्यांना वाटत नाही. देशभरातून अशा कितीतरी दुर्दैवी घटना कानावर धडकतात आणि निःशब्द होण्यावाचून पर्याय नसतो. जगण्याचा संघर्ष अन् अविरत कष्ट यातून मजुरांचे आयुष्य तावून सुलाखून निघत असते. स्वतःचे आयुष्य दारिद्र्यात बुडालेले असूनही आपल्या जीवनातला आनंद आपल्या मुलाबाळांच्या रूपातून फुलवण्याच्या आटोकाट प्रयत्न कामगार करीत असतात. आपल्या घासातून घास काढून ठेवून व शिक्षणावाचून आपली आबाळ झाली तशी आपल्या मुलांची दैना होऊ नये म्हणून वेळप्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन काबाडकष्ट करीत असतात. दुर्दैवाने हा संघर्ष भाकरीचा आहे. भाकरीच्या अर्धचंद्राचे दर्शन व्हावे, या इच्छेने व्याकूळ झालेल्या मनाचा आहे. सर्वस्व असणारे निर्मिकांचे हात केवळ भाकरीच्या शोधात गहाण राहिले. ते कधी झुकले तर कधी मोडून पडले. कधी वेदनाच सोबती झाल्या. पण समाजभान सजग ठेवले. वेदनेचा टिळा भाकरीच्या भाळी लावून तिच्या शोधात हरवून गेलेले कामगारांचे संवेदनशील मन करपून गेले. कविवर्य नारायण सुर्वे म्हणतात, "शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली | भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली ||
 
परंतु असे हे कामगार जेव्हा असीम ओढीने कुटुंबाकडे, घराकडे मैलोनमैल चालत परतू लागतात तेव्हा संवेदनशील मन हेलावून निघते. भावनेच्या भरात कित्येक वेळा अगतिकपणे घेतलेला निर्णय हा आत्मघातकी निर्णय ठरतो व सारेच भविष्य उद्ध्वस्त होऊन जाते. पण कामगार बंधूंनो, कृपया असे वागू नका! थोडा धीर धरा! संयम बाळगा! हेही दिवस जातील! सरकार टप्प्याटप्प्याने तुम्हाला घरी सोडण्याची सोय करीत आहे. तेव्हा थोडी कळ काढा! घिसाडघाईने कोणताही निर्णय घेऊ नका! स्वतःला सांभाळा! रोटी प्यारी खरी, पण आणखीही काही हवे आहे! सावध असा, तुफानाची हीच खरी सुरवात आहे!
 
तेव्हा आहात तिथेच रहा! सुरक्षित रहा!!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई